Next
कथकलीच्या सादरीकरणाने रंगला सिंधू नृत्य महोत्सव
BOI
Monday, March 04, 2019 | 02:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : कथकली हा आपल्याकडे सहसा पाहायला न मिळणारा नृत्यप्रकार शनिवारी, तीन मार्च २०१९ रोजी सिंधू नृत्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुणेकरांना पाहायला मिळाला. या नृत्यात सामावलेली भव्यता दर्शवणारी कलाकारांची वेशभूषा, वेगळ्या प्रकारचे संगीत आणि तुलनेने कमी हालचाली करूनही अभिनयातून गोष्ट अचूक पोहोचवण्याची कलाकारांची हातोटी यांनी प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.


सांख्य डान्स क्रिएशन आणि मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात शनिवारी पारंपरिक भरतनाट्यममधील ‘मार्गम’चे ही सादरीकरण प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार कीर्ती रामगोपाल यांनी केले. त्यांनी लालित्यपूर्ण नृत्य आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.  


सांख्य डान्स क्रिएशनचे संस्थापक प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार वैभव आरेकर, कथक कलाकार सुशांत जाधव, मुद्रा सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका पूनम गोखले आदि या वेळी उपस्थित होते.

‘दुर्योधनवधम’ या कथकलीमधील सर्वांत लोकप्रिय नाटकातील दुःशासनाच्या वधाचा भाग सुप्रसिद्ध कथकली कलाकार गुरु कलाश्री कलामंडलम सी. गोपालकृष्णन यांनी व सहकाऱ्यांनी सादर केला. जोपर्यंत दुःशासनाच्या रक्ताने आपला केशसंभार सावरला जात नाही तोपर्यंत केस मोकळे सोडण्याची प्रतिज्ञा द्रौपदी करते आणि भीम रौद्र रूप धारण करून तिची ही प्रतिज्ञा पूर्ण करतो ही गोष्ट कथकलीतून उलगडली. विशेषतः रौद्रभीम आणि दुःशासनाचे युद्ध होते आणि भीम त्याचे पोट फाडून रक्त प्रश्न करतो या प्रसंगात कलाकारांनी केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांचा थरकाप उडाला.

यात स्वतः कलामंडलम सी. गोपालकृष्णन यांनी रौद्रभीमाची भूमिका सादर केली, तर दिव्या नंदगोपालन (द्रौपदी), प्रिया नंबुद्री (दुर्योधन), नारायण एन. एन. (दुःशासन) आणि रेंजीश नायर (कृष्ण) यांनी त्यांना समर्थ साथ दिली, तर ‘मार्गम’ भरतनाट्यममध्ये कीर्ती रामगोपाल यांनी नटेश कौत्वम, कृष्ण कर्णामृतम आणि राधा-कृष्णाच्या पहिल्या भेटीची कथा सांगणारी अष्टपदी सादर केली. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search