Next
‘पालकांनी स्वतःच्या मोबाइलवापरावर बंधन ठेवावे’
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे पालक समुपदेशन कार्यशाळा
BOI
Monday, August 05, 2019 | 05:30 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे नुकतेच परिसरातील विविध शाळांमध्ये पालक समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समाजसेविका चंचल तैलंग यांनी एकूण ५१४ पालकांशी चर्चा करून त्यांचे समुपदेशन केले. पालक मोबाइलच्या आहारी गेले नाहीत, तर मुलेही जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

ज्ञानमंदिर विद्यालय – आगरनरळ, माध्यमिक विद्यालय - वरवडे भागशाळा खंडाळा, माध्यमिक विद्यामंदिर - जयगड, बळीराम परकर विद्यालय - मालगुंड या शाळांमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. १० जीवनकौशल्ये, आयुष्यातील टप्पे, सुसंवाद, भेदभाव, आहार, किशोरवयीन मुलांचे अधिकार, मित्र-मैत्रिणींचा दबाव, मोबाइलच्या आहारी गेलेल्या पालकांमुळे किशोरवयीन मुलांवर होणारे परिणाम अशा अनेक विषयांवर या वेळी चर्चा व समुपदेशन करण्यात आले. 

‘आपली मुले ज्या वयात आहेत, त्या वयातून आपणही गेलो आहोत. मुलांची होणारी चिडचिड, बदलणारा स्वभाव, होणारे शारीरिक व मानसिक बदल हे आपणच त्यांच्याशी बोलून त्यांना समजावले पाहिजे. १० वर्षांपर्यंतच्या मुलांना आपण जवळ घेतो़, खेळवतो; पण मुले ११ वर्षांची झाली की पुढे आपण त्यांना जवळ घेणे बंद करतो. मुलांना याच वयात मार्गदर्शनाची, पालकांच्या सोबतीची, तसेच मैत्रीची गरज असते. ते मिळाले नाही, तर ती आपल्यापासून दूर जाण्यास सुरुवात करतात. याच वयात त्यांच्याकडून चुका होण्याची जास्त शक्यता असते. वयोगट ११ ते १९ हा ओल्या मातीच्या घड्याप्रमाणे असतो. हा आकार देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आपण जसा आकार देऊ, तसा तो घडत जाईल,’ असे तैलंग म्हणाल्या.

‘१०वी आणि १२वी हे शिक्षणातील महत्तवाचे टप्पे आहेत. ते याच ११ ते १९ वयोगटात पार पडतात. सुसंवाद, मैत्रीमुळे मुले पालकांचे मार्गदर्शन घेतात. पालकांना जशी पाल्याकडून मानाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे पाल्यालाही पालकांकडून मानाची, कौतुकाची अपेक्षा असते. सतत दुर्लक्ष केल्यामुळे या वयापासून मुलांमध्ये मानसिक तणाव, मानसिक खच्चीकरण, अहंकार निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यांना सकस आहार दिला पाहिजे. मुलांना आपल्या घरातील परिस्थितीची जाणीव असली पाहिजे,’ असेही तैलंग यांनी सांगितले. 

‘मोबाइल हा सध्या ज्वलंत विषय आहे. पालकांनी पाल्याच्या समोर मोबाइल न घेता त्याला वेळ दिला तर मुले मोबाइलकडे आकर्षित होणार नाहीत. मोबाइलचे व्यसन कमी झाले नाही, तर आताची पिढी नेत्ररोग, मेंदूचे रोग, मणक्याचे आजार व कर्करोग आदींना बळी पडतील. यासाठी पालकांनी पाल्यासमोर मोबाइल किती वापरावा याचे भान ठेवावे. आपला पाल्य मोबाइलवर काय पाहत आहे, किती वेळ पाहत आहे, याबद्दलही जागरूक असणे गरजेचे आहे,’ असेही तैलंग यांनी सांगितले.  

खंडाळा, जयगड, मालगुंड, आगरनरळ येथील हायस्कूल आणि शाळांचे मुख्याध्यापक अनुक्रंमे श्री. वंजोळे, श्री. मुळगावकर, श्री. राऊत व श्री. जाधव यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाचे व संस्थापकांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. ‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लिमिटेड’चे युनिट हेड कॅप्टन रवी चंदेर व सीएसआर विभागप्रमुख सुधीर तैलंग यांच्या मार्गदर्शनाखाली पालक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सर्इ साळवी यांनी नियोजित केलेल्या या कार्यक्रमाला सनोबर सांगरे व दर्शना रहाटे यांचे सहकार्य लाभले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search