Next
आई होणं सोपं नाही...
BOI
Sunday, July 15, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this story


जगभराच्या पुरुषी मानसिकतेनुसार आईपणाची जबाबदारी स्त्रियांना कमकुवत करते, अशीच आहे. तिच्या कर्तृत्वाचं मोजमाप करताना तिच्या मातृत्वाचं परिमाण वापरलं जातं. एक तर ती ‘आई’ होऊ शकते किंवा ती ‘कर्तृत्व’ करू शकते. दोन्ही गोष्टी तिला एका वेळी साधता येत नाहीत. येणारच नाहीत, अशी एक धारणा खोलवर रुजली आहे. त्यामुळेच बाईच्या जगण्याचं पॉलिटिक्स तिच्या मातृत्वातून घडवण्याची वृत्ती टिकून आहे. ‘प्रेग्नन्सी अँड पॉलिटिक्स’ या आजही जगभर चालणाऱ्या पद्धतीबद्दल वाचा ‘हॅशटॅग (##) कोलाज’ मध्ये...
..................................
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डन यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. पंतप्रधानसारख्या महत्त्वाच्या पदावर असताना ते न लपवता सहजपणे मातृत्व स्वीकारणं हा धाडसी निर्णय होता. पंतप्रधानपदी असताना बाळाला जन्म देणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याआधी १९८८मध्ये बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना मुलाला जन्म दिला होता.

जैसिंडा अर्डनजैसिंडा अर्डन या न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वांत कमी म्हणजे  ३७ वर्षे वयाच्या पंतप्रधान आहेत. ऑक्टोबर २०१७मध्ये त्या निवडणूक जिंकून पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. शपथविधीच्या अवघ्या सहा दिवस आधी त्यांना प्रेग्नन्सीची बातमी समजली होती. बाळाच्या जन्मानंतरही त्यांनी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. जैसिंडा अर्डन यांनी आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा जगभरातून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. जगभराच्या पुरुषी मानसिकतेनुसार आईपणाची जबाबदारी स्त्रियांना कमकुवत करते, अशीच आहे. तिच्या कर्तृत्वाचं मोजमाप करताना तिच्या मातृत्वाचं परिमाण वापरलं जातं. एक तर ती ‘आई’ होऊ शकते किंवा ती ‘कर्तृत्व’ करू शकते. दोन्ही गोष्टी तिला एका वेळी साधता येत नाहीत. येणारच नाहीत, अशी एक धारणा खोलवर रुजली आहे. त्यामुळेच बाईच्या जगण्याचं पॉलिटिक्स तिच्या मातृत्वातून घडवण्याची वृत्ती टिकून आहे. यातून जैसिंडादेखील वाचल्या नाहीत तिथं सर्वसामान्य महिलांचं दुखणं किती भयंकर असेल, याची कल्पना न केलेलीच बरी.

मातृत्वाचं कोलित वापरून कौटुंबिक आणि तिच्या व्यावसायिक आयुष्याचा खेळखंडोबा करण्याची आयती संधी पितृसत्ताक समाजाला मिळते. अशी कैक उदाहरणं सापडतील जिथं करिअरमध्ये पुढे जाणाऱ्या पत्नीला लगाम घालण्यासाठी तिच्यावर आईपण लादलं गेलं. एकदा का ती आई झाली, की तिने मूल आणि घरकाम यांत स्वत:ला गाडून घ्यायचं अशीच कुटुंबीयांची आणि समाजाची अपेक्षा असते. करिअरिस्टिक आई मुलांकडे दुर्लक्षच करणार असा समज असतो. त्यामुळे तिच्यापुढे एक तर करिअर कर नाहीतर मुलाकडे लक्ष दे, असे पर्याय ठेवले जातात आणि तिला कात्रीत पकडलं जातं. 

मातृत्वाचा स्वीकार केल्यानंतर पुन्हा एकदा करिअरसाठी धडपडणाऱ्या एका मैत्रिणीचं मोडून पडणं तर प्रत्यक्ष पाहिलं. तिने मूल वर्षाचं होईपर्यंत पूर्ण वेळ मुलाच्या संगोपनात घालवला. त्यानंतर तिला तिचं माध्यमातलं क्षेत्र खुणावू लागलं. बऱ्याच हालचाली केल्यानंतर तिला एका कंपनीत नोकरीही मिळाली; मात्र ती नोकरी तिला केवळ महिन्याभरात सोडावी लागली. ती घराबाहेर राहू लागल्याने मुलाने धसका घेतला व तो आजारी पडला. त्याच्या मनावर फार मोठा परिणाम होण्याची भीती तिला दाखवली गेली आणि तिची नोकरी सुटली. विशेष म्हणजे तिचं एकत्रित कुटुंब आहे. इथं खरं तर किती स्वाभाविक होतं, की ज्या बाळाला दिवस-रात्र आई दिसायची ती अचानक सात-आठ तास दिसत नाही म्हटल्यावर तो जरा घाबरणारच; पण जर कुटुंबीयांनी थोडासा आधार दिला असता आणि मुलालाही आई नसण्याच्या सवयीसाठी थोडा वेळ दिला असता, तर प्रश्न अलगद सुटला असता; मात्र इथं मुलाच्या भल्याची वा त्याला काही झालंच तर त्याची दोन्हींची जबाबदारी आईवर ढकलून बाकी सर्वांनी हात वर केले.
 
एका खासगी शाळेत शिक्षिकेच्या जागेसाठी एका तरुणीला बोलावलं. ती बारामतीहून पुण्यात मुलाखतीसाठी आली. त्यात तिला तिचं फॅमिली प्लॅनिंग काय आहे विचारलं आणि तिने उत्तर देण्याआधी त्यांनीच सांगितलं, की नोकरी स्वीकारल्यावर किमान दोन वर्षं तरी पाळणा लांबवावा लागेल. तिच्या लग्नाला आधीच तीन वर्षं झाली होती, त्यामुळे घरच्यांचा दबाव होता आणि इथं या विचित्र अटीमुळे तिच्यापुढे पेच निर्माण झाला; मात्र कुटुंबाची आर्थिक गरज, तिच्यासाठी मिळणारी चांगली संधी हा विचार करत तिने नोकरी स्वीकारली. आज तिच्या लग्नाला पाच वर्षं झाली आहेत; मात्र आता वाढत्या वयामुळे गर्भधारणेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलेला नोकरीवर न घेण्याचा अलिखित नियम असतो. बाई विवाहित असेल, तर ती सतत तिचं घर, सणवार, पैपाहुणे, मुलंबाळं अशा सबबी देऊन कामाची टाळाटाळ करते, असा जावईशोध या कंपन्यांना लागला आहे. शिवाय गर्भवती महिलेला सहा महिन्यांची पगारी सुट्टी देण्याचा धसकाही यांनी घेतलेला असतो. अनेकदा ऑफिसमध्ये एखादी गरोदर स्त्री असेल, तर तिला मिळणाऱ्या प्रसूती रजा, प्रसूती रजांचा मिळणारा पगार अशा गोष्टींवरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या तिला सुनावले जाते. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सुषमाने तिचा अनुभव सांगितला. तिला केवळ तीन महिन्यांच्या सुट्ट्या मिळाल्या. त्याही प्रसूतीच्या अंदाजे तारखेच्या अलीकडे दीड महिना व पलीकडे दीड महिना घेण्याची जबरदस्ती केली गेली. त्यामुळे प्रत्यक्ष प्रसूतीनंतर केवळ दीड महिना रजा. त्यातही तिची प्रसूतीची वेळ आणि काँट्रॅक्ट रिन्यू होण्याची एकच वेळ होती. तिच्याशिवाय कंपनीने परस्पर तिचं काँट्रॅक्ट रिन्यू  करणं अपेक्षित होतं; मात्र तसं न झाल्याने ओली बाळंतीण असलेल्या तिला कंपनीच्या प्रशासनाशी हुज्जत घालावी लागली. कसंबसं तिचं काँट्रॅक्ट रिन्यू झालं. यानंतर तिने पुन्हा दोन महिन्यांची बिनपगारी सुट्टी घेतली; पण तिच्या प्रसूतीच्या सुट्ट्यांवरून तिला आजही कंपनीकडून उपकारवजा भाषा ऐकून घ्यावी लागते. वैद्यकीयदृष्ट्या खरं तर बाळाला किमान दोन वर्षं स्तनपान देणं आवश्यक असतं. पहिल्या वर्षभरानंतर आईच्या स्तनपानातून मुलांना पोषण मिळत असतं; मात्र बहुतांश आया त्यांच्या मुलांचं हे पोषण हिरावून कंपन्यांना वेळ देत असतात. त्याचं मोल का बरं मग या कंपन्या करत नाहीत..?
 
आयांचा जीव मुलांसाठी कासावीस होत राहतो आणि म्हणून मग त्या प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, अशीही एक ओरड असते; मात्र जन्माला आलेलं मूल जितकं आईचं असतं तितकंच बाबांचं आणि कुटुंबातील सर्वांच असतं. ते मूल भविष्यातील आपल्या देशाचं नागरिक असतं. त्या अर्थी बालसंगोपन ही समाजाचीही जबाबदारी बनते; पण याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं आणि मग एखाद्या बाईचा ‘आई’ असण्याचा संबंध जोडून तिला घरातच बांधून ठेवलं जातं. आजही आपल्याकडे आई मुक्तपणे, निर्धास्तपणे कामावर जाऊ शकेल अशी व्यवस्थाच नाही. सपोर्ट सिस्टिमच नाही, तर त्या आईचा जीव थोडा-थोडा घरात मुलांमध्ये गुंतणार हे स्वाभाविकच आहे. यावरून तत्काळ तिच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्याची गरजच नाही.
 
कंपन्यांची भांडवलशाही वृत्ती माणसांच्या नसानसांत उतरली आहे. म्हणून मग गर्भवती स्त्रीकडे इतक्या असंवेदनशीलपणे पाहण्याचं धाडस त्यांच्यात येतं. या पार्श्वभूमीवर जैसिंडा अर्डन यांनी इतक्या खुलेपणाने मातृत्वाचा स्वीकार करणं ही संकुचित वृत्तीला चांगलीच चपराक आहे. याबाबत महिलांनीही सजग होण्याची नितांत जरूर आहे. कामाच्या वाटणीपासून ते बालसंगोपनाच्या जबाबदारीपर्यंत त्यांनी आपल्या जोडीदारासोबत संवादी राहण्याची गरज आहे. वैयक्तिक पातळीवर ही समज वाढीस लागल्यास तीच समज कंपन्यांच्या पॉलिसीतही उतरेल.

इथं ‘प्रेग्नंट वूमन इन ऑफिस’ ही अगदी साडेतीन मिनिटांची एक व्हिडिओ स्टोरी आठवते. एक गरोदर महिला नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये येते. पायऱ्या चढून ती तिच्या डेस्कपर्यंत जाते, तर तो रिकामा असतो. तिचं सर्व सामान हलवलेलं असतं. तिचा एक सहकारी तिला एचआरला भेटायला सांगतो आणि तिच्या मनात धस्स होतं. आपल्याला कामावरून काढल्याची शंका तिच्या मनात येते. ती व्यवस्थापकाकडे जायला निघते, तर तळमजल्यावर तिच्या नावाची पाटी असलेलं एक छोटी केबिनच तिला दिलेली असते. ऑफिसमधील प्रत्येक सहकाऱ्याने तिला कम्फर्टेबल वाटेल याची काळजी घेऊन तिच्या केबिनची रचना केलेली असते. तिचा वरिष्ठ अधिकारी स्वत: तिला भेटायला येतो आणि विचारतो, की कसं वाटतंय? ‘बिकमिंग मदर इज नॉट इझी, वुई जस्ट ट्राय टू मेक इट लेस डिफिकल्ट.’ (आई होणं सोपं नाही; आम्ही फक्त ते कमी कठीण व्हावं, यासाठी प्रयत्न करतोय.) वरिष्ठांची ही संवेदना आणि गर्भवती स्त्रीच्या कामावरचा विश्वास, घर असो वा कंपन्या यांत रुजेल तेव्हाच बाईच्या मातृत्वाचं पॉलिटिक्स आपोआप बाजूला पडेल. 

प्रेगन्सी अँड पॉलिटिक्स
जैसिंडा अर्डन यांच्या मातृत्वाबाबत बोलताना बेनझीर भुत्तो यांच्याबाबत काय घडलं होतं, तेही समजून घ्यायला हवं. १९८७मध्ये बेनझीर भुत्तोंचा देशातील सैन्यशासन उलथवून टाकण्याचा लढा सुरू होता. १९८८मध्ये त्या गर्भवती राहिल्या. पाकिस्तानचे सैन्यशासक जनरल झिया उल-हक यांनी लोकशाही पद्धतीनं निवडणुका घेण्याचं जाहीर केलं. भुत्तो गरोदर असल्यानं निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाहीत, अशी हक यांची धारणा होती. निवडणूक नाट्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन करू, असा झिया उल-हक यांचा डाव होता. पण बेनझीर कणखर होत्या. त्यांना वडील झुल्फीकार अली भुत्तोंना हरू द्यायचं नव्हतं. बेनझीर यांनी निवडणुकीत सहभाग घेतला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. परंतु विरोधकांनी मॅटर्निटी लीव्हवरून बेनझीर यांचा छळ सुरू ठेवला. या त्रासात बेनझीर यांनी एका प्री-मॅच्युअर बाळाला जन्म दिला. ‘प्रेग्नन्सी अँड पॉलिटिक्स’ या बीबीसीने केलेल्या रिपोर्टनुसार बेनझीर यांनी विरोधकांचे मनसुबे हाणून पाडत मातृत्व स्वीकारलं होतं. 

अपत्यहीन आणि अविवाहित म्हणून अनेक राजकारणी महिलांना जगभर छळण्यात आलं आहे. २००५मध्ये जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल यांच्यावर मूल जन्माला न घातल्यामुळे चिखलफेक झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या एका बड्या राजकीय नेत्यानं २०१०मध्ये देशाच्या पंतप्रधान राहिलेल्या जुलिया गिलार्ड यांना वांझोटी म्हणून हिणवलं होतं. वांझ महिला शासन करण्यास अनफिट असतात, अशा गलिच्छ भाषेत त्यांच्यावर टीका झाली होती. भारतातही एकट्या राजकीय महिलांना छळण्याचा काळाकुट्ट इतिहास आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, जयललिता, मायावती, शीला दीक्षित, उमा भारती आणि वसुंधरा राजे यांच्यावर अनेकदा चिखलफेक झाली आहे...

- हीनाकौसर खान-पिंजार 
ई-मेल : greenheena@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार असून, ‘हॅशटॅग (##) कोलाज’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/zHfVVt या लिंकवर उपलब्ध आहेत. )
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link