Next
परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरात विद्यार्थ्यांनी रचले मानवी मनोरे
BOI
Saturday, March 16, 2019 | 06:30 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात १६ मार्च रोजी इयत्ता तिसरी व चौथीतील ३५० विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती सादर केल्या आणि मानवी मनोरे रचले. विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले, लेझीमप्रकारही सादर केले आणि सामुदायिक कवायतीही सादर केल्या. परशुरामपंत अभ्यंकर स्मृतिदिन आणि शाळेच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.शनिवारी सकाळी झालेल्या या अडीच तासांच्या कार्यक्रमाचा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त शिक्षिका सुधा घाणेकर, श्रीमती वैदेही अभ्यंकर, माजी मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, माजी मुख्याध्यापिका विजया टिकेकर, निवृत्त शिक्षिका सविता बर्वे, कौन्सिल मेंबर विशाखा भिडे, शाळा व्यवस्थापक दिलीप भातडे, मुख्याध्यापक विनोद नारकर आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘किलबिल’ या हस्तलिखिताचे प्रकाशन सुधा घाणेकर यांनी केले.दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यामंदिर अशी ओळख असलेल्या या शाळेचे नामकरण डॉ. रामचंद्र अभ्यंकर यांच्या देणगीनंतर परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिर असे करण्यात आले. कै. अभ्यंकर हे विद्यार्थिप्रिय व शिस्तप्रिय प्राथमिक शिक्षक होते, अशी माहिती या वेळी मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी दिली.श्रीमती घाणेकर यांनी मुलांचे खूप कौतुक केले, गोष्ट सांगितली. ‘विद्यार्थ्यांनी शाळेला विसरू नये, आई-वडील, मोठ्यांचा मान राखावा,’ असे आवाहन त्यांनी केले. मुलांनी चपळपणा दाखवत, सांघिक एकतेचे दर्शन घडवले. त्यांचे मानवी मनोरे, आसने, सूर्यनमस्कार आणि साधन कवायती पाहून कौतुक वाटले, असे त्यांनी सांगितले. कौन्सिल मेंबर विशाखा भिडे यांनी मुलांचे अभिनंदन केले.या वेळी इयत्ता तिसरीच्या डॉ. होमी भाभा, जगदीशचंद्र बोस व सावित्रीबाई फुले या वर्गांतील आणि इयत्ता चौथीच्या केशवसुत, कुसुमाग्रज व बालकवी या वर्गांमधील विद्यार्थ्यांनी लेझीम, सूर्यनमस्कार, साधन कवायती, घुंगुरकाठी हे प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी रचलेले तीन थरांचे मानवी मनोरे लक्षवेधी ठरले. पालक प्रतिनिधी आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. लहान वयातच शरीर वळते, सूर्यनमस्कारांमुळे बुद्धी प्रगल्भ होते व शरीर मजबूत होते. शाळेत दररोज विद्यार्थ्यांना याचे योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीमध्ये सहभाग घेतला.शाळेच्या वाढदिवसानिमित्त हस्ताक्षर, बौद्धिक, तसेच धावणे, लंगडी, मारचेंडू अशा मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिके देण्यात आली. पालक संघ, व्यवस्थापन समिती, माता पालक संघाचे सदस्य या वेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्यासह शिक्षक प्रकाश कदम, कांचन शिंदे, गीताली शिवलकर, शिवानी मोहिते, ज्योती शेंडगे, नेहा भातडे, संपदा सावंत, महेश साळुंके, प्रणोती सिनकर, उदय आरेकर, सुनील डांगे व सेवक प्रकाश बाणे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search