Next
सवाईच्या स्वरसोहळ्याची सुरेल सांगता
पं. बिरजू महाराज आणि प्रभा अत्रे यांच्या गायनाने रसिक तृप्त
BOI
Monday, December 17, 2018 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

डॉ. प्रभा अत्रे

पुणे : ज्येष्ठ कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांचा लालित्यपूर्ण मुद्राभिनय आणि गायन; तसेच किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या सुश्राव्य गायनाने ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरेल सांगता झाली. रविवारी सकाळी सुरू झालेल्या या स्वरसोहळ्यात अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. सकाळच्या सत्रात सहगायन आणि सहवादनाने रसिकांची मने जिंकली,तर दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणाने यावर कळस चढला. रसिकांची अवस्था तर किती घेशील दो कराने ... अशी झाली होती. सारे वातावरण भारून गेले होते. अशा भारलेल्या वातावरणातच, गेले पाच दिवस रंगलेल्या या स्वरसोहळ्याच्या  अविस्मरणीय आठवणींचा ठेवा मनात साठवत रसिक हुरहुरत्या मनाने बाहेर पडले.    

अर्शद अली आणि अमजद अली

पहिल्या सत्रात किराणा घराण्याचे युवा गायक अर्शद अली आणि अमजद अली यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग ‘शुद्ध सारंग’ने केली. त्यानंतर त्यांनी ‘बाजे रे मुरलिया बाजे’ हे लोकप्रिय भजन सादर केले. त्यांनी आपल्या गायनाचा समारोप करताना सादर केलेल्या ‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव’ या संत तुकारामांच्या अभंगास रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), दीपक गलांडे व सत्यवान पाटोळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी

अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी या गायिका भगिनींनी आपल्या सहगायनात राग ‘गौड सारंग’ सादर केला. त्यांना स्वप्नील भिसे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) आणि अमृता शेणॉय कामत व प्रियांका मयेकर भिसे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिनवादक इंद्रदीप घोष

त्यांच्यानंतर प्रसिद्ध वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिनवादक इंद्रदीप घोष यांचे सहवादन झाले. कर्नाटक व हिंदुस्थानी संगीताचा सुरेख मिलाफ असलेल्या त्यांच्या वादनाने रसिकांची उदंड दाद मिळवली. त्यांनी राग ‘हंसध्वनी’मधील ‘वातापि गणपती भजेहं’ या गणेशवंदनेने आपल्या वादनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राग ‘चारुकेशी’मधील काही रचनाही सादर केल्या. त्यांना पं. रामदास पळसुले (तबला), तंजावुर मुरगा भूपती (मृदंगम्) आणि दिगंबर शेडुळे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

संजीव अभ्यंकर

त्यानंतर मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘पूर्वी’ सादर केला. भक्तीरसातील काही स्वरचित रचना त्यांनी प्रस्तुत केल्या. त्यांनी राग ‘शुद्ध बराडी’ देखील सादर केला. संत तुकारामांचा ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’ हा अभंग स्वरचित चालीत सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अश्विनी मिसाळ (तानपुरा), धनंजय म्हसकर व बिलिना पात्रा (गायनसाथ) , अपूर्व द्रविड (टाळ) यांनी साथसंगत केली. 

प्रतीक चौधरी

दुसऱ्या सत्राची सुरुवात पं. देबू चौधरी यांचे पुत्र व शिष्य प्रतीक चौधरी यांच्या सतारवादनाने झाली. त्यांनी राग ‘मारवा’ आपल्या शैलीत सादर केला. त्यांनी सतारीवर सादर केलेल्या ‘हनुमंत ताल’ या सव्वापाच मात्रांच्या तालासही रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यांना उस्ताद रफीउद्दीन साबरी (तबला) आणि वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.    

पं. बिरजू महाराज

त्याननंतर ज्येष्ठ कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांचे मंचावर आगमन झाले. त्यांनी राजदरबारात सादर केला जाणारा कथक नृत्यातील ‘बैठक का भाव’ सादर केला;तसेच ‘जाने दे मैंका सुनो सजनवा’ या रचनेवर अभिनय सादर केला. ‘मोहे छेडो ना’, ‘तूच कर्ता आणि करविता’ या रचना त्यांनी गायिल्या. 

शाश्वती सेन
बिरजू महाराज यांच्या ज्येष्ठ शिष्या शाश्वती सेन आणि बिरजू महाराज यांची नात रागिणी महाराज यांनी या वेळी बिरजू महाराजांनी रचलेल्या काही नृत्यरचना सादर केल्या; तसेच कथक नृत्यातील विविध तालबद्ध रचना त्यांनी उलगडून दाखवल्या. त्यांना अनिर्बान भट्टाचार्य (हार्मोनियम व गायनसाथ), गायत्री जोशी (सतार), विश्वजीत पाल (तबला), अझरुद्दीन शेख (बासरी) यांनी साथसंगत केली. 

रागिणी महाराज
या वेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते पं. बिरजू महाराज यांचा विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.    

सवाई गंधर्व
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने या पाच दिवसांच्या संगीतोत्सवाची सांगता झाली. त्यांनी राग ‘जयजयवंती’ सादर केला. त्यांना माधव मोडक (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), डॉ. अतींद्र सरवडीकर (स्वरमंडळ), अश्विनी मोडक, आरती ठाकूर कुंडलकर व चेतना बनावत (तानपुरा व गायनसाथ) यांनी साथसंगत केली. 

सरतेशेवटी सवाई गंधर्व यांची ध्वनिमुद्रिका लावून महोत्सवाची सांगता करण्यात आली.

(विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 


(पं. बिरजू महाराज यांच्या सादरीकरणाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(अर्शद अली आणि अमजद अली यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(वीणावादक निर्मला राजशेखर आणि व्हायोलिनवादक इंद्रदीप घोष यांच्या सहवादनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(संजीव अभ्यंकर यांच्या गायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांच्या सहगायनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(प्रतीक चौधरी यांच्या सतारवादनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search