Next
..आणि ‘पिस्सू टॉप’चा माथा दिसला..
BOI
Saturday, March 17, 2018 | 09:45 AM
15 1 0
Share this story


शेषनाग कानावर पडताच मी सावध झालो. कारण मुळातच मला उशीर झाला होता. लवकर निघणं गरजेचं होतं. थोडा वेग वाढवला. दोन वळणं पार केली आणि तेव्हा एक दिलासा मिळाला. आता पिस्सू टॉपचा माथा दिसत होता. खूप वेळ अंधाऱ्या गुफेतून चालत जाताना, धीर खचताना शेवटी प्रकाश दिसावा तशी अवस्था झाली. चेहऱ्यावर हसू उमटले... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा विसावा भाग.. 
....................................
रस्त्यात चालताना एका वळणावर एक घोडा मरणासन्न अवस्थेत पडला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता. डोळे पांढरेफटक पडले होते. घोडा आयुष्यात कधीही खाली बसून झोपत नाही म्हणतात. त्यावेळी तो पाहिलं आणि शेवटचं खाली झोपला होता. मान बाजूला कलंडली होती. त्याची संपूर्ण चाकरी त्याने इमाने-इतबारे केली असणार.. त्या घोड्याने त्याच्या मालकाच्या कुटुंबाचा प्रपंच चालवला होता. शेकडो वेळा हिमालय भूमीतून फिरला असेल, पाठीवर बसवून यात्रेकरूला, आपल्या मालकाला घेऊन अमरनाथ गुहेपासून ये-जा केलं असेल. 

आता त्याचा कार्यभाग संपला होता. त्याचे शेवटचे काही क्षण उरले होते. त्याच्याजवळ कोणी नव्हतं. त्याचा मालक दुसऱ्या कोणत्या तरुण घोड्यासोबत कामावर गेलाही असेल.., पण हा जीवनाचा खेळ कोणासाठी थांबत नसतो. ‘शो मस्ट गो ऑन..’ लोक त्याच्याकडे बघत समोर जात होते. मी ही समोर गेलो. त्याचा मृत्यू शांतपणे व्हावा आणि सद्गती मिळावी ही मनातल्या मनात प्रार्थना केली.

खूप साऱ्या शिळा, दगडं आजूबाजूला होते. त्याच्या आधाराने सर्वजण वर चढत होते. वृद्ध, तरुण, स्त्री-पुरुष सगळे चालत होते. सगळ्यांचा दम निघत होता. कोणीही जास्त बोलत नव्हते. पिस्सू टॉप सुरू होताना लोक जल्लोषात बम बम भोलेचा गजर करत होते. नंतर मात्र सगळ्यांची शक्ती खूप खर्च होत होती. होळीच्या अग्नीत आहुती, लाकडं, काड्या तडतडत जळाव्यात तशा कॅलरीज भरभर जळत असणार.. लठ्ठ माजलेली चरबी हरलेल्या सैन्याप्रमाणे माघारी पळत असणार.. मी फक्त दहा पावलं चालण्याचं लक्ष ठेवत होतो. कारण तितकंच चालू शकत होतो.

समोरील एक दगड लक्षात ठेवायचो आणि तिथपर्यंत चालायचो. त्याच दगडावर बसून श्वास घायचो. लांब श्वास घेता यायचा नाही. जोरजोरात छोटे श्वास घेत होतो. छातीचा भाता फुलला होता. थोडा वेळ बसून पुन्हा चालू लागायचो. सरळसोट रस्ता दिसतच नव्हता. सगळीकडे दगडं.. त्यातून आपला रस्ता शोधायचा. मध्येच वरून एक जमिनीलगत पाण्याचा प्रवाह खाली येत होता. पायातले जोडे त्यात भिजू नयेत म्हणून काळजीने दगडांवर पाय देत चालत होतो; पण अचानक मागून एक घोडेवाला वेगात आला त्यामुळे माझा तोल जाऊन पाण्यात पाय पडलाच.. श्या..! दोन्ही जोड्यात पाणी गेलं..मोजे ओले पाय ओले झाले. बर्फासारखं थंड पाणी होतं ते. वातावरणात तेव्हा तरी थंडी नव्हती, पण पायातील जोडे भिजल्याने फार अस्वस्थ वाटत होतं. भिजलेल्या मोज्याने चालणं सोपं नाही. 

समोर बघितलं तेव्हा खालून दिसत होती ती पाणी, सरबत विकणारी मुलं जवळ दिसत होती. तिथे जाऊन विश्रांती घ्यावी, असं ठरवलं. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडे आणि मोजे वाळवता येणार म्हणून मी न थांबता तिथपर्यंत जायचं ठरवलं. तरीही दोन ठिकाणी थोडं थांबून मी तिथपर्यंत पोहचलो. एक मोठ्ठं झाड होतं. त्याच्या सावलीत दोन काश्मिरी माणसांनी नामांकित ब्रँड्सच्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेये असं सगळं मांडलं होतं. एका प्लास्टिकच्या मोठ्या बादलीत लिंबू सरबतही विकायला ठेवलं होतं. मी एक लिटरची एक पाण्याची बाटली विकत घेतली. किंमत शंभर रुपये...! पाचपट जास्त. 

एक पेला सरबत घेतलं, तर त्यात आधीच संपूर्णपणे पिळलेलं लिंबू पुन्हा पाण्यात पिळल्यावर जितकी लिंबाची चव त्याला येईल तितकी चव येत होती. साखर तर नव्हतीच. सकाळी उठून डायटिंग करणारे लोक लिंबूपाणी पितात तसा फील मला येत होता. जोडे आणि मोजे उन्हात वाळवत ठेवले. मोकळ्या पायांनी छान वाटलं. खूप वेळाने पाय जोड्यातून बाहेर काढले होते. हवेतील गारवा, उन्ह मोहक होतं. पाणी विकत घेणारे काही लोक गप्पा करत बसले होते. तिथला काश्मिरी माणूस म्हणाला आता काही दिवस तरी पाऊस येणार नाही. कोरडं वातावरण राहील. तुमची यात्रा चांगली होइल. शेषनागला लवकर पोहचा. 

शेषनाग कानावर पडताच मी सावध झालो. कारण मुळातच मला उशीर झाला होता. लवकर निघणं गरजेचं होतं. जोडे बऱ्यापैकी कोरडे झाले होते. बॅगेतून नवे मोजे काढून ते घातले आणि तिथून निघालो. थोडा वेग वाढवला. दोन वळणं पार केली आणि तेव्हा एक दिलासा मिळाला. आता पिस्सू टॉपचा माथा दिसत होता. खूप वेळ अंधाऱ्या गुफेतून चालत जाताना, धीर खचताना शेवटी प्रकाश दिसावा तशी अवस्था झाली. चेहऱ्यावर हसू उमटले. वर लोक दिसत होते. दूर कुठेतरी लाऊड स्पीकरवरून गाण्याचा किंचितसा आवाज येत होता. त्यामुळे उत्साह संचारला. आणखी अंतर बाकी होतं पण लक्ष किमान दृष्टीपथात आलं होतं. एका पिस्सू टॉपनेच ही अवस्था केली होती. पुढे तर संपूर्ण यात्रा शिल्लक होती.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link