Next
‘पार्किंग पॉलिसी’ विषयावर सर्वपक्षीय चर्चा
प्रेस रिलीज
Saturday, March 31, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this article:


पुणे : पुणेकर जनतेचे हित डावलणार नाही, असा सूर ‘पार्किंग पॉलिसी’ या विषयावरील सर्वपक्षीय महाचर्चेत उमटला. ३० मार्च रोजी ‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेने ‘पार्किंग पॉलिसी’ या सध्या गाजत असलेल्या विषयावर सर्वपक्षीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. शनिवारवाडा पटांगणावर झालेल्या या महाचर्चेला मोठा प्रतिसाद मिळाला. या चर्चासत्राला पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, शहराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी व तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते. 
 
माजी महापौर अंकुश काकडे, योगेश गोगावले, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी महापौर प्रशांत जगताप, श्रीनाथ भिमाले, चंद्रकांत मोकाटे, अरविंद शिंदे, वसंत मोरे, संजय भोसले, रुपाली ठोंबरे, प्रांजली देशपांडे, संतोष शिंदे आदी मान्यवर या चर्चेत सहभागी झाले होते.
 
‘पुणे महानगर परिषद’चे निमंत्रक अॅड. गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक केले. ‘पुणे शहर आता विस्तारले आहे, त्यात ग्रामपंचायती, पीएमआरडीएमुळे जिल्हाही समाविष्ट झाला आहे. या विस्तारित भागाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, मांडण्यासाठी एकत्रित संवाद करता येणाऱ्या व्यासपीठाची आवश्यकता होती, म्हणून पुणे महानगरपरिषद या व्यासपीठाची निर्मिती करण्यात येत आहे. हे व्यासपीठ अराजकीय आहे,’ असे सातपुते यांनी सांगितले.

आय. टी. डी. पी. संस्थेच्या प्रांजली देशपांडे यांनी पार्किंग पॉलिसीची माहिती दिली. ‘वाहने प्रचंड वाढत असल्याने पादचारी धोरण, सायकल प्लॅन आणि पार्किंग पॉलिसी अमलात आणण्याची गरज आहे. पार्किंगसाठी कमीत कमी मोबदला दिला जावा असा प्रयत्न आहे,’ असे त्या म्हणाल्या. 

योगेश गोगावले म्हणाले, ‘प्रशासनाने त्यांच्या अधिकारात मांडलेल्या प्रस्तावात पुणेकरांच्या हितासाठीच भाजपने उपसूचनेद्वारे बदल केला. आम्ही पुणेकरांना जाचक होणाऱ्या पार्किंग कराऐवजी सार्वजनिक वाहतूक धोरणावर लक्ष देत आहोत. विधानसभा क्षेत्रनिहाय नागरिकांच्या सूचना मागविण्याची आणि सर्वपक्षीय समितीत चर्चा करण्याची भाजपची तयारी आहे. सीसीटीव्हीसारख्या माध्यमातून पार्किंग व्यवस्था पाहू, माफियाराजला पाठिंबा देणार नाही.’ 

श्रीनाथ भीमाले म्हणाले, ‘पार्किंग शुल्क आधुनिक तंत्रज्ञानाने पारदर्शकरित्या निश्चित होईल आणि अनुभवींना त्याचा ठेका दिला जाईल. तज्ज्ञ, गटनेते, महापौर आणि वाहतूक पोलिसांचा अभिप्राय पार्किंग पॉलिसी ठरवताना घेतला गेला. पुणेकरांना त्रास होईल, अडचण होईल, अशा बाबींचे निराकरण केले जाईल.’ 

सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘२००९पासून पार्किंग पॉलिसीचा विचार होत होता, तो आता अमलात येत आहे; कारण लोकसंख्येपेक्षा वाहने जास्त झाली आहेत.’ 

अंकुश काकडे म्हणाले, ‘पार्किंगसाठी शुल्क घेतले, म्हणजे वाहने कमी होणार नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, हा उपाय आहे.’

प्रशांत जगताप, अरविंद शिंदे यांनी पार्किंग पॉलिसीला विरोध दर्शविला. तर, गटनेत्यांना डावलून पार्किंग पॉलिसीचा निर्णय झाला, असा आरोप वसंत मोरे यांनी केला. ‘जप्त गाड्यांची, पार्किंगमधील गाड्यांची पालिका जबाबदारी घेणार का?’ असा प्रश्न चंद्रकांत मोकाटे यांनी विचारला. शिवसेनेचा या पॉलिसीला विरोध असल्याचे, गटनेते संजय भोसले यांनी सांगितले. पार्किंग पॉलिसी हा तुघलकी निर्णय असल्याची टीका, संतोष शिंदे यांनी केली 

या कार्यक्रमात ‘भारत विकास ग्रुप’चे संस्थापक हणमंत गायकवाड यांच्या हस्ते संस्थेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महेश महाले यांनी आभार मानले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search