Next
रात गयी, फिर दिन आता है...
BOI
Sunday, July 08, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न कवी, लेखक, गीतकार सरस्वतीकुमार दीपक यांची काल, सात जुलै रोजी जन्मशताब्दी झाली. आणि आज, आठ जुलै हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘सुनहरे गीत’मध्ये आज घेऊ या ‘रात गयी, फिर दिन आता है...’ या गीताचा आस्वाद...
........
‘सिनेमा डायरी’ हा संदर्भग्रंथ तयार करताना सिनेकलावंतांच्या जन्मतारखा व स्मृतिदिन शोधत गेलो. तेव्हा काही विलक्षण योगायोग आढळून आले. या जुलै महिन्यात तर असे अनेक योगायोग आहेत. त्यापैकी एक योगायोग म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील कवी, लेखक, गीतकार सरस्वतीकुमार दीपक यांचा जन्म सात जुलै १९१८चा! काल सात जुलै रोजी त्यांची जन्मशताब्दी झाली. आणि या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाने या जगाचा निरोप घेतला. ती तारीख होती आठ जुलै १९८६! म्हणजे आज त्यांचा स्मृतिदिन आहे.

१९४३ ते १९७८ या काळात ते चित्रपटसृष्टीत कार्यरत असल्यामुळे सध्याच्या चित्रपटप्रेमींना त्यांचे नांव माहीत असण्याची शक्यता कमी आहे. कारण एक तर त्यांचा काळ संपून ५० वर्षे झाली आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे चित्रपटाचा ‘गीतकार’ हा तसा पहिल्यापासून दुर्लक्षितच राहिला आहे. परंतु १०५ वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीची नोंद घेताना अशा कोणत्याच कलावंतांना विसरता येत नाही. गीतकारांची गीते एके काळी किती आशयसंपन्न होती, हे जाणून घेतले तर त्यांच्या प्रतिभेने मन थक्क होते.

उत्तर प्रदेशातील नवस्थला हसनपूर या गावी जन्मलेल्या सरस्वतीकुमार दीपक यांचे मूळ नाव राम गोपाल शर्मा असे होते. ते गीतकार, कवी, लेखक तर होतेच; पण त्याखेरीज ते पत्रकार, डबिंग विशेषज्ञ व बालसाहित्यकारही होते. जयंत देसाई प्रोडक्शनच्या ‘जबान’ (१९४३) या चित्रपटात त्यांनी लिहिलेले गीत घेण्यात आले होते. तोच त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेश होता. त्या चित्रपटाचे संगीतकार सी. रामचंद्र होते व ते गीत कौशल्या व ईश्वरलाल यांनी गायले होते. त्यानंतर ‘बडी बात’ व ‘स्वर्णभूमी’ (१९४४) ‘पिया मिलन’ (१९४५) या चित्रपटांकरिताही त्यांनी गाणी लिहिली होती. १९४६मध्ये तर त्यांनी गीते लिहिलेले चार चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि ते चारही भक्तिप्रधान चित्रपट होते. ‘भक्त प्रल्हाद’, ‘देवकन्या’, ‘मान सरोवर’, ‘उत्तरा अभिमन्यू’ अशी त्या चित्रपटांची नावे होती.

त्यामुळे त्यांच्यावर ‘धार्मिक चित्रपटांसाठी गाणी लिहिणारा गीतकार’ असा शिक्का बसला. पुढील काळात त्यांना सामाजिक आशयाचे काही चित्रपट गीते लिहिण्यासाठी मिळाले; पण धार्मिक चित्रपटांची निर्मिती म्हटले, की त्यांचे नाव निर्मात्याला आठवायचे! वस्तुस्थिती तशी नव्हती, याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज कपूरचा पहिला चित्रपट ‘आग’ (१९४८). त्यामधील त्यांनी लिहिलेले ‘देख चाँद की ओर मुसाफिर....’ हे गीत लोकप्रिय झाले. त्याच राज कपूरने १९५३च्या ‘बूट पॉलिश’ चित्रपटासाठी एक आशयसंपन्न गीत लिहून घेऊन त्याचा समावेश फार सुंदरपणे आपल्या चित्रपटात केला होता. याव्यतिरिक्त त्यांनी १९५३च्या ‘नया रास्ता’करिता लिहिलेले ‘तुम समय की रेत पर...’ हे गीत, तसेच १९४४च्या ‘बडी बात’ चित्रपटातील ‘सोती हूँ अब चंदा मुझे जगा देना....’ हे गीत अशी काही गीते धार्मिक चित्रपटांसाठीची नव्हती.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी ९८ चित्रपटांसाठी अंदाजे तीनशे गीते लिहिली. काही चित्रपटांच्या डबिंगचे काम केले. रेडिओ कार्यक्रम लिहिले. लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तकेही लिहिली. अशा या प्रतिभासंपन्न गीतकाराचे सुनहरे गीत आज पाहू या! चित्रपट बूट पॉलिश. संगीतकार शंकर जयकिशन, गायक मन्ना डे, आशा भोसले व ससकारी. पडद्यावर बेबी नाझ, रतनकुमार या बालकलाकारांबरोबर चरित्र अभिनेता डेव्हिड!

‘बूटपॉलिश’ची कथा झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांची व्यथा सांगणारी आहे. गरिबी, दु:ख, अडचणी ज्यांच्या पाचवीला पुजले आहे, अशी ती मुले! झोपडपट्टीतील दादा लोकांचा त्रास, पोलिसांची वक्रदृष्टी आणि बालसुलभ भावना! अंगभर कपडा व पोटभर जेवण मिळणे म्हणजे फार मोठा आनंदाचा क्षण! पण तेही वाट्याला येत नाही.

आणि अशा त्यांच्या जीवनात त्यांना आशेचा किरण दाखवणारा जॉन चाचा! ‘तुमचे नशीब एक ना एक दिवस बदलेल, सुखाचे दिवस आज नाही तर उद्या येतील,’ असा आशावाद त्यांच्या मनात जागवताना तो एक दिवस हे गाणे म्हणतो. तो गात असताना पुढे मुलेही त्यामध्ये सामील होतात. दिग्दर्शक प्रकाश अरोराची ही कल्पना; पण त्या चित्रपटाचा निर्माता राज कपूर होता, हे आपण विसरू शकत नाही! राज कपूरचा हा चित्रपट म्हणजे तो त्यात लक्ष घालणार नाही, असे घडले नव्हते ना!
असो! चित्रपटातील या पार्श्वभूमीवर सरस्वतीकुमार दीपक लिहितात -

इसी तरह आते जाते ही
ये सारा जीवन जाता है 
ओऽऽऽ रात गयी 

रात्र संपली, की दिवस उजाडतो आणि असे रोज घडत जाते व त्यातूनच संपूर्ण जीवन पुढे जात राहते.

मानवी जीवनाची वाटचाल अशा साध्या-सोप्या शब्दांत मांडताना कवी पुढे लिहितो -

कितना बडा सफर दुनियाका एक रोता एक मुस्काता है 
कदम कदम रखता है राही कितनी दूर चला जाता है 
एक एक तिनके तिनके से पंछी का घर बन जाता है

या विश्वाचा हा केवढा पसारा आहे, येथे एक जण दु:खाने अश्रू ढाळत असतो, तर एक जण त्याच वेळी सौख्याने आनंदी असतो. एक एक काडी जमवत पक्षी जसे घरटे बांधतो तद्वत माणूसही एक एक पावलाने वाटचाल करीत हा जीवनाचा केवढा प्रवास पार पडतो नाही का?

मानवी जीवनाची वाटचाल सांगताना कवी पुढे म्हणतो -          

कभी अंधेरा कभी उजाला, 
फूल खिला फिर मुरझाता है,
खेल बचपन हँसी जवानी, 
मगर बुढापा तडपता है, 
वही नसीबा कहलाता है

कधी दुःखाचा अंधार, कधी सौख्याचा प्रकाश, फुले उमलतात व नंतर कोमेजून जातात. तसेच मानवी जीवनाचे होते. बालपण खेळण्यात जाते, मौजमजा करण्यात तारुण्य जाते आणि नंतर येणारे वृद्धत्व मात्र त्रासदायक ठरते. सुख-दुःखाची चक्रे मानवी जीवनात फिरत असतात. किंबहुना मानवी जीवन म्हणजे सुख व दु:ख फिरून येणारे चक्र आहे आणि त्यालाच माणसे ‘नशीब’ म्हणतात.

जॉन चाचाने मानवी जीवन कसे असते, हे अशा शब्दांत समजावून सांगितल्यावर त्या मुलांच्या मनात काही प्रश्न उभे राहतात व गाण्याच्या माध्यमातून ती मुले विचारतात -

जॉन चाचा तुम कितने अच्छे, 
तुम्हे प्यार करते सब बच्चे 
हमे बता दो ऐसा काम 
कोई नही करे बदनाम 
चाचा क्या होती तकदीर?
क्यों है एक भिखारी, चाचा क्यों है एक अमीर?
चाचा हम को क्यों काम नही ?
भिक माँगकर जीने में कुछ नाम नहीं!

जॉन चाचा, तुम्ही किती चांगले आहात! आम्ही सर्व मुले तुमच्यावर प्रेम करतो! (पण) चाचा, आम्हाला असे एखादे काम सांगा, की जे आम्हाला बदनाम करणार नाही! चाचा, नशीब म्हणजे नेमके काय असते हो? या जगात एक श्रीमंत असतो, तर एक गरीब असतो, हे असे का? चाचा, आम्हाला काही काम का मिळत नाही आणि हे भीक मागून जगणे आम्हाला योग्य वाटत नाही.

मुलांच्या या अशा प्रश्नांवर जॉन चाचा सांगतात -

बढता चल, बढता चल, बढता चल 
तू एक है प्यारे लाखों में तू बढता चल, बढता चल, बढता चल 
तुझे रुकना नहीं, तुझे झुकना नहीं, घबराना नहीं
तेरी है जमीं तू बढता चल,
तारों के हाथ पकडता चल, फूलों के हाथ पकडता चल 
तू एक है प्यारे लाखो में तू बढता चल 
ये रात गयी वो सुबह नयी...

गरिबी, बेकारी यांनी हैराण झालेल्या मुलांना दिलासा देण्यासाठी या अखेरच्या कडव्यात जॉन चाचा सांगतात, की तू पुढे पुढे चालत रहा! तू लाखात एक असा आहेस, कोणी सामान्य नाहीस, म्हणूनच पुढे पुढे चालत रहा! तू थांबू नकोस, कोणापुढे लाचार होऊ नकोस आणि कोणाला घाबरूही नकोस. ही भूमी तुझी आहे. आकाशातील ताऱ्यांना पकडण्याच्या जिद्दीने पुढे पुढे जात राहा! तुझ्या कष्टामुळेच यशाची फुले तुझ्या हातात येतील. तू लाखात एक आहेस, हे विसरू नकोस! ती बघ, दुःखाची काळोखी रात्र संपली व नवीन आशा-आकांक्षांची, यशाची पहाट उगवत आहे.

बूट पॉलिश हा चित्रपटच मुळात वेगळ्या कथानकाचा आणि त्यातील हे गीतही वेगळ्या प्रकारचे! पण त्यातील भावार्थ आशय लक्षात घेऊन शंकर जयकिशनने त्याला संगीत देऊन ही तत्त्वज्ञानाची कडू गोळी शर्करावगुंठित केली होती. त्यासाठी संगीताबरोबर मन्ना डेंचा आणि आशा भोसले यांचा स्वर, आवश्यक तो कोरस आणि पडद्यावरील बालकलाकारांसमवेत ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड यांचा अभिनय! सारेच ‘सुनहरे!’

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link