Next
दिल्ली हाटच्या धर्तीवर ‘फ्लो पुणे हाट’
पूना क्लब क्रिकेट मैदानावर प्रदर्शनाचे आयोजन
BOI
Monday, February 18, 2019 | 06:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : देशाच्या कानाकोपऱ्यातील हस्तकला कारागिरांनी बनवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू पुण्यातील ग्राहकांना पाहायला मिळाव्यात आणि या निमित्ताने ग्रामीण कलाकारांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘फ्लो’ (फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन) या महिलाकेंद्री संस्थेच्या पुणे शाखेतर्फे ‘फ्लो पुणे हाट’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी कारागीरांच्या कलावस्तूंचे एकत्रित प्रदर्शन आणि त्यातही महिला उद्योजकांना विशेष प्राधान्य असे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.

‘बंडगार्डन रस्त्यावर असलेल्या पूना क्लब क्रिकेट मैदानावर येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ९ या वेळात हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. शुक्रवारी, २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या वेळी ‘फिक्की फ्लो पुणे’च्या उपाध्यक्ष क्रीस्टीन खालसा आणि ‘फ्लो पुणे हाट’च्या समन्वयक स्मिता पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित असतील,’ अशी माहिती ‘फिक्की फ्लो पुणे’च्या अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी दिली. 

‘दिल्लीत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणाऱ्या ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर या ‘फ्लो पुणे हाट’चे आयोजन करण्यात आले आहे. बाजारात सहसा मिळणार नाहीत, अशा वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलावस्तूंच्या खरेदीबरोबरच या ठिकाणी पुणेकरांना मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येणार आहे. तांब्याच्या वस्तू, वारली व गोंड चित्रे, बांबूच्या वस्तू, बंजारा एम्ब्रॉयडरीने सजवलेल्या वस्तू, ज्यूट, कागद व कापडाच्या पिशव्या, चामड्याच्या चपला, दागिने, विणलेल्या साड्या, गोधडी, सौंदर्यप्रसाधने आणि सेंद्रिय अन्नपदार्थदेखील या ठिकाणी विकत घेता येणार आहेत. काश्मीरी एम्ब्रॉयडरीचे प्रात्यक्षिकही कलाकारांकडून दाखवले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी प्रवेशशुल्क असून,या माध्यमातून जमा होणारा पैसा संस्थेतर्फे गरजू स्त्रियांच्या प्रशिक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये वापरला जाणार आहे,’ असे संगीता ललवाणी यांनी सांगितले.

‘आर्मी वाईव्हज् वेलफेअर असोसिएशन, स्माईल फाऊंडेशन, वूमन आर्टिसान्स फ्रॉम काश्मीर, अंजुमन ए इस्लाम चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन, आश्रय, महाखादी, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि आयटीआय औंध या संस्थांचा या प्रदर्शनात समावेश आहे,’ अशी माहिती उपक्रमाच्या प्रमुख स्मिता पटवर्धन यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search