Next
‘राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्याचे बळ दे’
कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विठोबाला साकडे
BOI
Monday, November 19, 2018 | 10:58 AM
15 0 0
Share this storyपंढरपूर : ‘राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले आहे,’ अशी माहिती महसूल, कृषी, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरमध्ये दिली.

महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते आज (१९ नोव्हेंबर २०१८) कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील,  दीपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, ‘मंदिर समितीची रचना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप विचार केला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. भक्त निवासाची सुरुवात करा. वारीच्या निमित्ताने वारकरी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. राज्यात यंदा खूपच तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाय योजना केल्या आहेत; पण फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आता एक पाऊस झाला, तर या समस्येवर उपाय निघू शकेल.’

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल,’ असे पाटील यांनी या वेळी सांगितले.डॉ. भोसले यांनी प्रास्ताविकात मंदिर समितीने गेल्या दोन वर्षांत केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधाला शासनाने मंजुरी द्यावी. याबाबतचा कोणताही आर्थिक बोजा शासनावर पडणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

शासकीय पूजेचा मान मिळालेले मेंगाणे गेली २५ वर्षे पंढरीची वारी करत आहेत. शेती करणाऱ्या मेंगाणे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि एसटीचा पास देण्यात आला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link