Next
पुणेकर भिजले ‘नामाच्या गजरा’त
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 11:07 AM
15 0 0
Share this story

संगीतातील योगदानाबद्दल देवकी पंडित यांना ‘वैष्णव पुरस्कार’ प्रदान करताना जे. व्ही. इंगळे, मेघा इंगळे, डॉ. माधुरी कुलकर्णी. शेजारी सुधाकर चव्हाण, श्रीनिवास जोशी, माधुरी कुलकर्णी आदी मान्यवर. ​​

पुणे : ‘जय जय राम कृष्ण हरी...’, ‘लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा...’, ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली...’, ‘या पंढरीचे सुख...’, ‘अवघा रंग एक झाला...’  या आणि यांसारख्या अनेक संतरचना आणि अभंगांच्या सादरीकरणाने पुणेकरांना वारी पुण्यात येण्याआधीच नामाच्या गजरात चिंब भिजविले. निमित्त होते कलाश्री संगीत मंडळ व एबीआयएल यांच्यातर्फे आयोजित चौथ्या ‘नामाचा गजर’ या संतरचना आणि अभंग यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे.

‘नामाचा गजर’कार्यक्रमादरम्यान भजन सादर करताना बाळासाहेब वाईकरभक्तीरसाचा भाव वारीच्या काळात पुणेकरांना अनुभवता यावा या उद्देशाने ‘नामाचा गजर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या कार्यक्रमात भजनसम्राट बाळासाहेब वाईकर यांनी वारकरी संप्रदायातील काही रचना सादर केल्या. त्यांनी सादर केलेल्या चक्री भजनाने पुणेकरांना एक वेगळाच अनुभव मिळाला. याबरोबरच त्यांनी संत तुकारामांचा ‘दिंड्या पताका झळकती जे गर्जती हरीनामे...’ व ‘लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा...’ हा संत चोखामेळा यांचा अभंग देखील सादर केला. यानंतर किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक व पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली...’ हा अभंग सादर केला. ‘आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले...’, ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल...’ या रचेनेने त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली.

देवकी पंडितत्यानंतर सुप्रसिद्ध पार्श्वगायिका देवकी पंडित यांनी या ‘पंढरीचे सुख पाहता डोळा...’ हा अभंग सादर केला...त्यांनी सादर केलेल्या ‘अबीर गुलाल उधळीत रंग...’च्या सादरीकरणाने वारीचा गजर संपूर्ण सभागृहात दुमदुमला. ‘अवघा रंग एक झाला...’ या अभंगाने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.    

याबरोबरच कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने ह.भ.प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल यावर्षी देवकी पंडित यांना प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. जे. व्ही. इंगळे, मेघा इंगळे, डॉ. माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार पंडित यांना प्रदान करण्यात आला. कलाश्री संगीत मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, श्रीनिवास जोशी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), गंभीर महाराज अवचार (पखवाज), सदाशिव महाराज (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. पराग पांडव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link