Next
नर्मदा परिक्रमेचं प्रांजळ आत्मकथन!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Saturday, March 24, 2018 | 01:57 PM
15 0 0
Share this story

नर्मदामाईला पायी चालत सव्य प्रदक्षिणा (नदीचा प्रवाह सतत उजव्या हाताला ठेवून) घालणे म्हणजे ‘नर्मदा-परिक्रमा’ आणि वाहनात बसून रस्त्यावरून केलेला प्रवास म्हणजे ‘नर्मदा-परिभ्रमण’ असं आपलं मत पुस्तकाच्या सुरुवातीलाच व्यक्त करून, सुहास डासाळकर यांनी १२५ दिवस पायी चालून पूर्ण केलेल्या सव्य-परिक्रमेची रंजक कहाणी म्हणजे ‘नर्मदा तारक सर्वदा’ हे पुस्तक... त्या पुस्तकाचा हा परिचय... 
..............
दैनंदिनी स्वरूपात लिहिलेलं ‘नर्मदा तारक सर्वदा’ हे पुस्तक वाचताना आपल्याला भावतो तो त्यातला प्रांजळपणा. एकीकडे जे आवडलं ते लिहीत असतानाच, जे खटकलं किंवा ज्याचा त्रास झाला तेसुद्धा डासाळकर यांनी अत्यंत स्पष्टपणे, विनासंकोच सहजच कथन केलं आहे. त्यामुळे पुस्तक हातात घेतल्यावर डासाळकारांबरोबर यात्रेला सुरुवात करून, आपणही ते ते भलेबुरे अनुभव जगत जातो. 

नर्मदा परिक्रमाच का? तर नर्मदा ही ‘आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक असं त्रिविध ‘नर्म’ म्हणजे सुख देणारी पवित्र नदी आहे. तिच्या केवळ दर्शनानेसुद्धा पापक्षालन आणि पुण्यप्राप्ती होते, असं मानतात. मुळात नर्मदेच्या शास्त्रसंमत आणि विधिवत परिक्रमेची संकल्पना म्हणजे तीन वर्षं, तीन महिने आणि तेरा दिवस (चातुर्मासाचे चार महिने मुक्काम आणि जप, तप, अनुष्ठान, प्रवचनसेवा, पुराणकथनासह), दररोज फक्त चार-पाच किलोमीटर अनवाणी आणि लज्जारक्षणासाठी फक्त कौपिन धारण करून केलेली सव्य-प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्रमा. मुळात, मार्कंडेय ऋषींनी ही परिक्रमा २७ वर्षं केली होती. कारण त्यांनी केवळ नर्मदेच्या उगमापासून मुखापर्यंतच नव्हे, तर तिला मध्ये येऊन मिळणाऱ्या ९९९ उपनद्यांच्याही उगमापर्यंत जाऊन पुन्हा नर्मदेपर्यंत येऊन ही परिक्रमा केली होती, हे वाचून थक्क व्हायला होतं. 

दैनंदिनी स्वरूपात लिहिलेलं हे पुस्तक ओंकारेश्वराहून सुरुवात झालेल्या परिक्रमेच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ३० ऑक्टोबर २००९पासून सुरुवात होऊन १२५व्या दिवशी अंजरुंद या गावापाशी आणि तिथनं पायी दोन तासांवर असणाऱ्या ओंकारेश्वरी तीन मार्च २०१०ला संपतं, तेव्हा आपणही ती विलक्षण रोमांचक परिक्रमा अनुभवत (डासाळकरांचं हे पुस्तक वाचत) त्यांच्याबरोबरच होतो याची जाणीव होते. 

अत्यंत साधी, सोपी, प्रवाही, वर्णनात्मक भाषा आणि मधूनच ‘दूध प्यायलो’ऐवजी ‘गोरस ग्रहण केला’ किंवा ‘धुळवड’ म्हणजे ‘सार्वत्रिक तळीराम डे’, रात्रीच्या मुक्कामासाठी ‘रैन बसेरा’, पटापट पायी चालणेसाठी ‘विनोबा भावे एक्स्प्रेस’ असे शब्द योजून केलेली गंमत यांमुळे पुस्तकाच्या रंजकतेत भर पडते. 

परिक्रमेदरम्यान तब्येतीचे झालेले हाल, भेटलेल्या माणसांचे नमुने, त्यातही बहुतकरून आलेले चांगलेच अनुभव, परिक्रमा मार्गात लागणाऱ्या गावांची, परिसराची, निसर्गाची वर्णनं; मार्गाची वर्णनं कधी पायवाट, कधी कच्चा रस्ता, कधी बैलगाडी मार्ग, कधी हिरवळ, कधी चिखलमय निसरडा रस्ता, कधी ओढ्याची वाट, कधी छातीवर येणारी चढण, कधी घोटा बुडेल एवढी वाळू, तर कधी चक्क डांबरी रस्ता; विविध ठिकाणच्या वस्त्यांमधली गरिबी, हलाखीचं जिणं; ‘नर्मदे हरऽऽ’ हा परवलीचा शब्द उच्चारल्यावर अनोळखी माणसांकडूनही होणारी विचारपूस आणि शक्य होईल ती मदत, एके ठिकाणी चालून आल्यावरही, आपण किती दमलो त्याचं कौतुक न करता, परिक्रमा करणाऱ्या काही महिलांकडून तिथे होणारी स्वयंसेवा, हाफेश्वराच्या शिवलिंगाला वेढलेल्या वटवृक्षाची फांदी, जिची मुळं हवेतच असूनही ती फांदी हिरवीगार आणि मूळ इतकी वर्षं जिवंतच असल्याचा चमत्कार, नेमावर या ठिकाणी नदीच्या पात्रात मध्यभागी गोलाकार पोकळी असणारा पिवळसर खडक, ज्याला नर्मदामैयाचं ‘नाभिस्थान’ मानतात तो खडक, मराठी लोकांचं प्रचंड अभिमानाचं आणि आदराचं स्थान असणाऱ्या पेशवे बाजीरावांच्या रावेरखेडच्या समाधीची दुरवस्था पाहून येणारी विषण्णता, तीन ठिकाणी आलेले बंगाली आश्रमचालकांचे विक्षिप्त अनुभव, काही ठिकाणच्या मठांना लोकांकडून मिळणाऱ्या चांदी-सोन्याच्या देणग्या, पण त्यांचा विनियोग समाजातल्या वंचितांच्या आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी न होता ‘हपापाचा माल गपापा’ या वृत्तीने चाललेली लूट... असे विविध, स्तिमित करणारे अनुभव वाचत वाचत आपण शेवटच्या म्हणजे १२५व्या दिवशी कधी येऊन पोहोचतो ते कळतही नाही. 

ही परिक्रमेची कहाणी निश्चितच रंजक आणि माहितीपूर्ण आहे. विशेषतः डासाळकरांनी शेवटच्या परिशिष्टाच्या १३ पानांमध्ये त्यांच्या स्वानुभवावरून तयार केलेल्या परिक्रमेच्या पूर्ण मार्गाची, वाटेत लागणाऱ्या गावांची आणि एका ठिकाणाहून पुढल्या ठिकाणी जाताना पायी लागणाऱ्या वेळेची दिलेली माहिती आणि कुठल्या ठिकाणी निवासाची किंवा भोजनाची सोय आहे ते सांगणारा तक्ता म्हणजे या पुस्तकाची मोठीच मौलिक बाजू!

जरूर वाचावं आणि वाचल्यावर यातल्या शेवटच्या तक्त्याच्या साहाय्यानं आणि पुस्तकातल्या अनुभवांच्या वर्णनावरून आपणही नर्मदा परिक्रमा पार करण्यासाठी उद्युक्त व्हावं, असं हे पुस्तक! 

पुस्तक : नर्मदा तारक सर्वदा  
लेखक : सुहास डासाळकर  
प्रकाशन : श्री महालक्ष्मी पब्लिकेशन्स, कोल्हापूर
संपर्क : (०२३१) २५२१९८६ 
पृष्ठे : ३४४ 
मूल्य : ३०० ₹ 

(‘नर्मदा तारक सर्वदा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link