देवरुख : कोकणातील प्रत्येक गावाला स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. तसेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात आहे आणि त्याचे नाव कासारकोळवण. ध्वजवंदन सर्वसाधारणपणे सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्ये होत असल्याचे आपण पाहतो. कासारकोळवण गावात मात्र या सगळ्या ठिकाणांसोबतच अण्णा मांगले यांच्या घरासमोरही ध्वजवंदन केले जाते. एका खास कारणामुळे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, एक मे रोजी येथे ध्वजवंदन करण्याची परंपरा गावकऱ्यांकडून एकजुटीने गेली ३७ वर्षे पाळली जात आहे. आजही (१५ ऑगस्ट २०१८) येथे ध्वजवंदन झाले.
देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्षे झाली. या कालावधीत अनेक गावे स्वयंपूर्ण होत गेली. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची काही वर्षे गावगाडा गावप्रमुखाच्या घरातूनच चालत असे. त्या वेळी टपाल कार्यालय, सहकारी संघ, रेशन दुकान, दूध संघ, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना, शाळा, समाजमंदिर यांना स्वतंत्र जागा नव्हत्या. अशीच कासारकोळवण गावाची स्थिती होती. गावप्रमुख आणि मानकरी या नात्याने विठ्ठल रामचंद्र तथा अण्णा मांगले यांच्या घरातून सारा शासकीय कारभार चाले. त्यामुळे गावातील एक प्रमुख ठिकाण असल्याने त्या काळी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, एक मे या दिवशी झेंडावंदन मांगले यांच्या घरासमोरच केले जाई. अण्णाच गावचे सरपंच असल्याने त्यांना हा मान मिळे.
साधारण ८०च्या दशकात अण्णांच्या पाठपुराव्याने गावात ग्रामपंचायतीची नवीन इमारत आली. हळूहळू सर्वच शासकीय कार्यालये आपापल्या इमारतीत स्थलांतरित झाली. त्यामुळे मांगले यांच्या घरातील कारभार संबंधित कार्यालयांतून सुरू झाला. त्यामुळे साहजिकच ध्वजवंदनाच्या जागाही बदलल्या; मात्र गावकरी या निर्णयावर खूश नव्हते. म्हणून, इतकी वर्षे आम्ही झेंड्याला ज्या ठिकाणी सलामी दिली, तिथेच हा कार्यक्रम झाला पाहिजे, असे त्यांना वाटत होते. म्हणून १९८०पासून गावकऱ्यांनी मांगले यांच्या घरासमोर ध्वजवंदन पुन्हा सुरू केले आणि तिथे कोणतेही शासकीय कार्यालय नसतानाही...
गावातील पहिले ध्वजवंदन शाळेत होते. नंतर ग्रामपंचायतीत आणि त्यानंतर सोसायटीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यावर सर्व लवाजमा अण्णांच्या घरी येतो. तिथेही रीतसर झेंडा फडकावून सलामी दिली जाते. गावातील ज्येष्ठाला ध्वज फडकवण्याचा मान मिळतो. आज अण्णांच्या पश्चात त्यांचे तरुण नातू सचिन सुभाष मांगले आणि त्यांचे कुटुंबीय हा कारभार सांभाळत आहेत. आजही देशाचा ७२वा स्वातंत्र्यदिन मांगले यांच्या घरातील ज्येष्ठ असलेले विश्वास मांगले यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले.
आजकाल गावागावांत गावकी-भावकी असे वाद आहेत. राजकारणाने तर अनेक गावे पोखरली आहेत. एकाच कुटुंबात अनेक पक्षांचे सदस्य दिसतात. यातून कुटुंबे विभक्त होताहेत; मात्र अशा काळातही कासारकोळवण गावातील आबालवृद्ध, विशेषत: तरुण मंडळी झेंडावंदनाची अनोखी प्रथा एकत्र येऊन जोपासत आहेत, हे विशेष.
संपर्क : सचिन मांगले
७५२२९ ८८८९९