Next
पर्यटकांच्या स्वागतासाठी केरळ सज्ज
केरळ टुरिझमतर्फे मुंबईत ट्रेड बैठकीचे आयोजन
प्रेस रिलीज
Saturday, October 13, 2018 | 03:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अलीकडेच आलेल्या पुरातून वेगाने सावरलेल्या केरळ राज्याने पश्चिमेकडील भागात पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगक्षेत्रातील विविध भागीदारांपुढे, अनेक नवीन आकर्षक उत्पादने सादर केली.

याबाबत बोलताना पर्यटन सचिव राणी जॉर्ज म्हणाल्या, ‘केरळ राज्य अलीकडेच ओढवलेल्या पुराच्या संकटातून समर्थपणे तोंड देत उभे राहिले आहे. ‘केरळा ट्रॅव्हल मार्ट (केटीएम) २०१८’ या उपक्रमात तब्बल ६६ देशांमधून एक हजार ५०० खरेदीकार सहभागी झाले होते. हे एक अभूतपूर्व यश आहे आणि हा भक्कम पुरावाही आहे. हे राज्य पर्यटकांचे उत्साहाने स्वागत करेल असा ठाम विश्वास उद्योगातील भागधारकांनी ‘केटीएम’मध्ये दाखवला. सध्याच्या घडीला आम्ही पुन्हा एकदा भक्कमपणे उभे राहिले आहोत आणि आता जगभरातल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांचे पूर्वीसारखेच जोमदार स्वागत करू शकतो हे जगाला दाखवायचे आहे.’

देशांतर्गत प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन उत्पादने आणि अनुभवांची जंत्री सादर करताना जॉर्ज म्हणाल्या, ‘यामध्ये रामायणात महत्त्वपूर्ण आणि जगातील मोठ्या पक्ष्याचे म्हणजेच जटायू पक्ष्याचे शिल्प असलेले दक्षिण केरळमधील जटायू अर्थ सेंटर, आभासी वास्तवाचे संग्रहालय आणि सर्वोत्तम दर्जाचा रोपवे यांचा समावेश आहे. या गोष्टींमुळे राज्यातील पर्यटनाच्या यादीत महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. जटायूचा भव्य पुतळा २० फूट लांब, १५० फूट रूंद आणि ७० फूट उंच आहे. हे पक्ष्याचे जगातील सर्वात मोठे शिल्प आहे.’

‘लंडनमध्ये गेल्यावर्षी झालेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये जबाबदारीचे पर्यटन हा ख्यातनाम पुरस्कार कुमाराकोमने पटकावला, यामुळे आता अधिक जबाबदारीचे पर्यटन मिशन आम्हाला राबवायचे आहे. आमच्या नव्या पर्यटन धोरणात शाश्वत, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटन राबवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ज्यांना साहसी प्रवास आणि पर्यटन अनुभवायचे आहे त्यांच्यासाठी मुन्नारच्या टेकड्यांच्या वळणांवरचा प्रवास करण्याची ही योग्य वेळ आहे; तसेच नीलाकुरिंजी या १२ वर्षांतून एकदा फुलणाऱ्या लायलॅक आणि निळ्या रंगाच्या फुलांचा गालिचा दूरवरपर्यंत पसरलेला पाहण्याची संधीही आहे. शिवाय, तरुण प्रवाशांना ट्रेकिंग, सायकलिंग आणि बाइकिंगचाही आनंद घेता येईल,’ असे जॉर्ज यांनी सांगितले.

याबरोबरच नेहरू ट्रॉफी बोट रेस (स्नेक बोट रेस)चे यंदा १० नोव्हेंबर रोजी अलाप्पुझा येथील पुन्नमाडा लेकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. केरळचे पाणी यापुढेही सुरक्षित आणि थरारक गोष्टींसाठी सुयोग्य असेल हेच यातून सिद्ध होत आहे. राज्यातील थरारक पर्यटनाची साक्ष देणारी चालियार रिव्हर चॅलेंज २०१८ (६८ किमीची कायाकिंग चॅम्पियनशीप)सुद्धा वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येत आहे.

‘नेफेरटिटि या इजिप्तच्या थीमवर आधारित केरला शिपिंग अँड इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशनचे (केएसआयएनसी)  आरामदायी लक्झ्यरी जहाज या महिन्याच्या अखेरीस सादर करण्यात येत आहे आणि यामुळे केरळमध्ये क्रूझ पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

झणझणीत खाद्यपदार्थ आणि संपन्न वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या मलबार या आकर्षक पर्यटन स्थळामधील संभाव्य संधीचा लाभ घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘स्माइल व्हर्च्युअल टूर गाइड’ ही हाय टेक डिजिटल सुविधाही सादर करण्यात आली आहे. याद्वारे मलबारमधील ४० आकर्षक ठिकाणांची माहिती देण्यात येईल, येथे कसे पोचायचे, टूर कशा आयोजित करायच्या आणि अलार्म सूचनांचा ठरलेला रिमाइंडर यांचा समावेश आहे, याबरोबरच पोर्टलवरील माहिती शेअर करणे, वास्तव्यासाठी ठिकाण शोधणे आणि रुमचे आरक्षण करणे आदी गोष्टीही करता येणार आहेत.

‘कन्नूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबरपासून सुरू होत आहे. कुर्ग, कोईम्बतूर आणि मैसूरच्या सीमांपासून जवळ असणारे मलबार ठिकाण अधिकाधिक प्रस्थापित करता येईल, अशी आशा केरळ पर्यटन विभागाला वाटते आहे. कलाप्रेमींसाठी लोकप्रिय कोची-मुझिरिज बिनालेतर्फे १२ डिसेंबर २०१८ पासून चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येईल. हा कार्यक्रम मार्च २०१९ पर्यंत चालेल. या बिनालेने समकालीन भारतीय कलेचे स्वरूप बदलले आहे आणि कोचीला भारताच्या कलेची राजधानी म्हणून स्थान प्राप्त झाले आहे,’ असेही जॉर्ज यांनी नमूद केले.

ज्यांना इतिहास भावतो अशांना वेगळ्याच युगात नेण्यासाठी मुझिरिज वारसा प्रकल्प राबवण्यात येत आहे. एकेकाळी समृद्ध असलेल्या या बंदरांना अगदी पहिल्या शतकापासून अरब, रोमन, इजिप्तशिअन लोक भेट देत असत. अशा या समृद्ध वारसा असलेल्या बंदरांचे अवशेष २५ वेगवेगळ्या संग्रहालयांमध्ये संवर्धित करणे हा भारतातील सर्वात मोठा संवर्धन प्रकल्प आहे. याबरोबरच स्पाइस रूट प्रकल्पातून २००० वर्षे जुन्या आशियाई समुद्री जोडण्या आणि ३० देशांमधील सांस्कृतिक व पाककलेच्या देवाणघेवाणीच्या आठवणी जागवल्या जातात.

‘पर्यटकांना समृद्ध अनुभव प्राप्त होणार आहे. सण, संग्रहालये, प्रदर्शने यातून त्यांना संपूर्ण केरळ समजून घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक संस्थांसोबत आम्ही साहित्य आणि सांगीतिक महोत्सवांची मालिका सादर करणार आहोत,’ असेही जॉर्ज म्हणाल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link