Next
‘खल्वायन’च्या मासिक संगीत सभेत आज एकल तबला, बासरीवादन
BOI
Saturday, July 13, 2019 | 11:27 AM
15 1 0
Share this article:



रत्नागिरी :
रत्नागिरीतील खल्वायन या संस्थेची सलग २६१वी मासिक संगीत सभा शनिवारी, १३ जुलै रोजी सायंकाळी होणार आहे. गुरुवर्य एम. जी. पटवर्धन व पी. जी. पटवर्धन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या या मैफलीमध्ये दापोलीचे प्रसिद्ध तबलावादक देविदास दातार यांचे एकल तबलावादन व रत्नागिरीचे प्रसिद्ध बासरीवादक मंदार जोशी यांचे बासरीवादन सादर होणार आहे.

ही सभा नेहमीप्रमाणेच रत्नागिरी एसटी स्टँडसमोरच्या गोदूताई जांभेकर विद्यालयात सायंकाळी सात ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

देविदास दातार यांचे तबल्याचे प्राथमिक शिक्षण अनिल देशपांडे यांच्याकडे झाले. त्यानंतर पंडित सुरेश सामंत व आमोद दंडगे यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले. संगीताची परंपरा असलेल्या घराण्यामध्ये देविदास यांचा जन्म झाला असल्यामुळे बालपणापासूनच त्यांना शास्त्रीय संगीताचे बाळकडू मिळाले. तबलावादनातील संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली असून, दापोलीचे प्रसिद्ध गुरुवर्य पंडित केळकर गुरुजी यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. संगीत नाटकांना तबलासाथ, संगीत दिग्दर्शन व गायन यामध्येही त्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे. ते अनेक विद्यार्थीही घडवत आहेत. ऑर्गनवादन, तबलासाथ, संगीत नाटक आणि गायन या चारही क्षेत्रांत त्यांची संगीत साधना अव्याहतपणे सुरू आहे. अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी तबलासाथ केलेली आहे. उत्कृष्ट संगीतकार पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. या कार्यक्रमात दापोलीचे अमेय आखवे त्यांना हार्मोनियमवर लेहरा साथ करणार आहेत.

मंदार जोशी यांचे संगीतातील प्राथमिक शिक्षण रत्नागिरीचे प्रसिद्ध गुरू विजय रानडे यांच्याकडे झाले. त्यांनी बासरीवादनाचे शिक्षण हिमांशू नंदा आणि रूपक कुलकर्णी यांच्याकडे घेतले. विविध संगीत कार्यक्रम आणि संमेलनात त्यांनी एकल वादन केलेले आहे. या कार्यक्रमात त्यांना केदार लिंगायत तबलासाथ करणार आहेत. 

सर्व रसिक श्रोत्यांनी या संगीत सभेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ‘खल्वायन’चे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search