Next
पां. वा. काणे, गणेश तारळेकर, उर्मिला पवार
BOI
Monday, May 07 | 03:45 AM
15 0 0
Share this story

संस्कृतचे महापंडित भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे, प्रसिद्ध संगीतज्ञ गणेश तारळेकर आणि ग्रामीण दलित स्त्रीचं जिणं प्रभावीपणे मांडणाऱ्या उर्मिला पवार यांचा सात मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी'मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.......   
पांडुरंग वामन काणे 
सात मे १८८० रोजी परशुराममध्ये (जि. रत्नागिरी) जन्मलेले पांडुरंग वामन काणे हे अत्यंत प्रगल्भ बुद्धीचे, प्रकांडपंडित म्हणून ख्यातकीर्त असणारे भारतीय संस्कृतीचे महान संशोधक! त्यांना वडील आणि आजोबांकडून वेदशास्त्रांचा वारसा लाभला होता. ते एकपाठी होते आणि अगदी लहान वयातच त्यांना अमरकोशाच्या ४०० श्लोकांसह कित्येक स्तोत्रं तोंडपाठ होती. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांचं लेखन ‘महाराष्ट्र कोकीळ’मध्ये प्रसिद्ध झालं होतं. 

त्यांचं इंग्लिश आणि संस्कृतव्यतिरिक्त फ्रेंच आणि जर्मन भाषांवरही प्रभुत्व होतं. सुरुवातीला त्यांनी शिक्षक आणि वकील म्हणून काम पाहिलं होतं. त्यांचा धर्मग्रंथांचा अभ्यासही सुरू होता. १९४१ साली त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी देऊन गौरवण्यात आलं. पुढे १९४६ साली त्यांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे व्हाइस चॅन्सेलर म्हणूनही काम केलं होतं. पॅरिस, इस्तंबूल आणि केंब्रिजमध्ये झालेल्या पौर्वात्य विषयांवरच्या आंतरराष्ट्रीय परिषदांना त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. 

बाणभट्टाची ‘कादंबरी’ आणि भवभूतीचं ‘उत्तरराम चरित’ हे त्यांचे खास अभ्यासाचे विषय होते. त्यांचं प्रचंड योगदान म्हणजे जवळपास तीस वर्षं खपून त्यांनी लिहिलेला ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा पाच खंडी ग्रंथ! 

१९५६ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 

त्यांनी जातिभेदाला कायम विरोध केला आणि आंतरजातीय आणि विधवा विवाहाला कायम पाठिंबा दिला होता. 

१९६३ साली त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च भारतीय सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. 

१८ एप्रिल १९७२ रोजी त्यांचं निधन झालं.
........

गणेश हरी तारळेकर 
सात मे १९१४ रोजी जन्मलेले गणेश हरी तारळेकर हे संगीतज्ञ आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. 

त्यांना आदर्श संस्कृत शिक्षक, स्वरसाधनारत्न, तसंच राष्ट्रपती पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आलं होतं. 

भारतीय वाद्यांचा इतिहास, स्टडीज इन नाट्यशास्त्र, संगीत रत्नाकर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

११ डिसेंबर २००२ रोजी त्यांचं निधन झालं. 
.......

उर्मिला हरिश्चंद्र पवार 

सात मे १९४५ रोजी जन्मलेल्या उर्मिला हरिश्चंद्र पवार या कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

‘आयदान’ हे त्यांचं आत्मचरित्रपर लेखन गाजलं आहे. त्यातून ग्रामीण दलित स्त्रीचं जिणं समोर येतं. 

त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार, तसंच कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. 

सहावे बोट, आम्हीही इतिहास घडवला!, उदान, चौथी भिंत, मॉरिशस : एक प्रवास, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

(उर्मिला पवार यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link