Next
स्वरांजलीने पं. श्रीकांत देशपांडेंच्या आठवणींना उजाळा
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ज्येष्ठ गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या ७१ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पुण्यात ‘संगीत संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पं. श्रीकांत देशपांडेंच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या स्वरांजलीमुळे पुणेकरांची संध्या संगीतमय झाली. 

पं. देशपांडे यांच्या पत्नी शीला व पं. श्रीकांत देशपांडे मित्रमंडळ यांच्यातर्फे हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रंगला. कार्यक्रमाचे पहिले सत्र पंडिता पद्मा तळवलकर यांच्या शिष्या यशस्वी सरपोतदार यांच्या सुरांनी सजले. त्यांनी राग मुलतानीने मैफलीला सुरुवात केली. ‘गोकुल धाम...’ या रचनेने रागाचा विस्तार केला. सुरांची सुंदर बांधणी करत भारावून टाकणारी वातावरण निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या ताना व आलाप यांनी रसिकांची मनसोक्त दाद मिळवली. त्यांनतर राग देसमध्ये मध्यलयीतील ‘सखी घन गरजत’ ही बंदिशकी ठुमरी व तराणा पेश केला. ‘पियाजी म्हारे नैना गे...’ या बंदिशीने त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), वैदेही अवधानी व श्रुती घळसासी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.


मैफलीचा उत्तरार्ध गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने सजला. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, ‘पं. देशपांडे यांनी १९८२ मध्ये जेव्हा युवा संगीत समारोह आयोजित केला. त्यावेळी त्यांनी आवर्जून किशोरीताईंना तेथे गाण्यासाठी मला पाठवण्यास सांगितले. ते जेवढे उत्तम गायक होते. तेवढेच चांगले किस्सेही सांगत. त्यांनी सांगितलेले किस्से मला आजही आठवतात.’

पं. पणशीकर यांनी राग यमनने गायनाची सुरुवात केली. ‘मो मन लगन लागी...’ या बंदिशीने रागाचा विस्तार केला. आपल्या भारदस्त आवाजातील धीरगंभीर सुरांनी किशोरीताईंची रसिकांना आठवण झाली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), शुभम खंडाळकर, सौरभ काडगावकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

रवींद्र खरे यांनी निवेदनातून पं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. पं. देशपांडे यांची १२ जूनला जयंती असते. त्यानिमित्त दर वर्षी जून महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात आतापर्यंत जुन्या पिढीतील व नव्या पिढीतील अनेक दिग्गजांनी आपली सुरांजली अर्पण केली आहे. यात ज्येष्ठ गायिका पंडिता प्रभा अत्रे, अश्विनी भिडे, पं. उल्हास कशाळकर, पं. उपेंद्र भट, व्यंकटेश कुमार, गणपती भट, चंद्रशेखर वझे, आनंद भाटे, कलापिनी कोमकली, संजय गरुड, सुधाकर चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search