Next
गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा
BOI
Wednesday, August 23, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

‘देणाऱ्याने देत जावे...’ या आपल्याच कवितेत सांगितल्याप्रमाणे स्वतःला पुरस्काराच्या रूपाने मिळालेल्या लक्षावधी रुपयांचे अत्यंत सहजपणे सत्पात्री दान करणारे विंदा हे महाराष्ट्राचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे कवी. आज, २३ ऑगस्ट रोजी त्यांचा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्या काही आठवणी...
..........................

२३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील धालवलीमध्ये जन्मलेले गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पारितोषिकप्राप्त उत्तुंग व्यक्तिमत्त्व! लहानपणी वार लावून जेवण्याची वेळ आलेले आणि पुढेपुढे स्वतःला ‘कंजूष कोकण्या’ म्हणवून घेणाऱ्या विंदांनी प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यांच्या काव्यप्रतिभेमुळे मिळालेल्या लक्षावधी रुपयांचे पुरस्कार निरनिराळ्या संस्थांना दान म्हणून देऊन टाकले होते हे आवर्जून नोंद घेण्यासारखेच!

कॉलेजमध्ये असताना माधव जूलियन यांच्यासारखे विद्वान कवी गुरू म्हणून लाभल्यामुळे विंदांची कवी म्हणून जडणघडण झाली. मराठी कविता छंदामधून मुक्त करून एक नवीन भाषा त्यांनी कवितेला दिली. त्यांच्यात मार्क्सवाद पुरेपूर होता. ‘तेच ते तेच ते...’ सारख्या कवितेतून त्यांनी मांडलेलं सामान्य माणसाचं आयुष्य वर्षांमागून वर्ष गेली तरी अजूनही तस्संच असल्याचं जाणवतं हे त्यांच्यातलं द्रष्टेपण सिद्ध करतं. मराठी कविता सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पाडगांवकर आणि बापट यांच्याबरोबर कविता सादरीकरणाचे प्रयोग गावोगावी केले.

अस्सल कोकणी बाणा अंगात मुरलेल्या विंदांच्या अनेक कवितांमधून आपल्याला नावीन्यपूर्ण कल्पना आणि जोडीला विनोदाची पेरणी दिसते. विंदा प्रचंड मिश्कील होते...आपल्या कोल्हापुरात घालवलेल्या तरुणपणातल्या आठवणींवरची त्यांची ही कविता पाहा –

असेच होते म्हणायचे तर - अशी अचानक भ्यालीस का?
अर्ध्या वाटेवरती  जाऊन, पुन्हा परत तू आलीस का?
असेच होते म्हणायचे तर - वरवर फसवे हसलीस का?
स्वप्नाला चुरडून मिठीतच, पुन्हा तयावर रुसलीस का?
असेच होते म्हणायचे तर - उगाच खोटे रडलीस का?
भरात येऊन भलत्या सलत्या, करांत माझ्या शिरलीस का?
असेच होते म्हणायचे तर - अशी जिवाला डसलीस का?
केस मोकळे ओले घेऊन, वणव्यामध्ये घुसलीस का?..’


.......या जन्मात ‘तिला’ ‘पटवणे’ जमले नाही तरी पुनर्जन्मावर विश्वास ठेवून लिहिलेली ही गझल पाहा –

माझी न घाई काहीही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी...
तू झुंजूमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी
मी वेंधळा मग सांडतो, थोडा चहा बाहीवारी...
तू बोलता साधेसुधे, सुचवून जाशी केव्हढे
मी बोलतो वाचाळसा, अन् पंडिती काहीतरी...
होशी फुलासह फूल तू, अन् चांदण्यासह चांदणे
ते पाहणे इतकेच मी बघ, मानले माझ्या करी...  
म्हणतेस तू मज आवडे, हा रांगडा सिधेपणा  
विश्वास मी ठेवू कसा, या हुन्नरी शब्दावरी......
लिहिता बटा भालावारी, उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला, ती वाचताना शायरी......

.....आणि कवींची खिल्ली उडवणारी ही त्यांची विरूपिका –

तरुणपणी त्याने एकदा,
दर्यामधे लघवी केली
आणि आपले उर्वरित आयुष्य,
त्यामुळे दर्याची उंची किती वाढली -
हे मोजण्यात खर्ची घातले!..........

विंदांच्या कित्येक ओळी मिश्कील अंगाने जाताजाता जबरदस्त तत्त्वज्ञान  सांगून जातात-
शेक्सपियर आणि तुकारामाच्या भेटीत त्यांनी हे किती सुंदर मांडलंय –

‘...तुका म्हणे विल्या, ‘तुझे कर्म थोर, अवघाचि संसार उभा केला’-
शेक्सपियर म्हणे ‘एक ते राहिले, तुवां जे पाहिले विटेवरी!’
तुका म्हणे, ‘बाबा, ते त्वां बरे केले, त्याने तडे गेले संसाराला;
विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पाटी कोरी लिहोनिया-’....
आणि शेवटी लिहितात – ‘....दोघे निघोनिया गेले दोन दिशा – कवतिक आकाशां आवरेना!’

विंदा हे श्रेष्ठ कवी तर होतेच; पण समीक्षक आणि लघुनिबंधकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांनी लिहिलेल्या सर्वोत्तम बालकविता. ‘पिशी मावशी आणि तिची भुतावळ’  कोण विसरेल?

विंदा यांना कबीर पुरस्कार, कालिदास पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, मसाप पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

स्वेदगंगा, जातक, विरुपिका, अष्टदर्शने, संहिता इत्यादी काव्यसंग्रह; स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ, परी गं परी, राणीचा बाग, किंग लियर, फाउस्ट असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

१४ मार्च २०१० रोजी त्यांचं निधन झालं.

(विंदा करंदीकरांच्या ‘... पण हे श्रेय तुझेच आहे’ या कवितेचे ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांनी केलेले रसग्रहण वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search