Next
‘टीव्ही, मोबाइलऐवजी मुलांना चांगला पर्याय द्या’
महिला दिनी ‘जीजीपीएस’मध्ये सुखदा सारोळकर यांचे मार्गदर्शन
BOI
Tuesday, March 12, 2019 | 03:07 PM
15 0 0
Share this article:

महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात बोलताना लर्निंग पॉइंटच्या संचालिका सुखदा सारोळकर. शेजारी डावीकडून शिक्षिका शिल्पा प्रभू, प्राथमिक विभागप्रमुख विजया पवार आदी.

रत्नागिरी : ‘आपण मुलांना नेहमी हे करू नका, ते करू नका असे सांगतो; पण त्याऐवजी त्याने काय केले पाहिजे हे सांगायला हवे. मुले सतत टीव्ही, मोबाइल पाहतात अशी हल्लीच्या पालकांची तक्रार असते. मुलांना केवळ टीव्ही, मोबाइल पाहू नका असे सांगितले, तर ते ऐकणार नाहीत, पण ते का पाहू नका, त्याचे किती वाईट परिणाम होतात हे त्यांना समजावून सांगा, ती निश्चित ऐकतील; तसेच पालकांनी टीव्ही, मोबाइलच्या बदल्यात मुलांना चांगला पर्याय दिला, तर ती त्यात गुंततील,’ असा सल्ला येथील लर्निंग पॉइंटच्या संचालिका सुखदा सारोळकर यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम शाळेत (जीजीपीएस) पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांसाठी नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात सारोळकर यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेच्या प्राथमिक विभागप्रमुख विजया पवार उपस्थित होत्या.

सारोळकर म्हणाल्या, ‘स्त्री म्हणून आपण स्वतःला, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी किती वेळ देतो हे पहिल्यांदा पाहा. आपण एकतर आई म्हणून जगतो किंवा मग स्वतःसाठी मुलांकडे दुर्लक्ष करतो. याचा मध्य साधणे खूप गरजेचे आहे. मुले ही केवळ बाईचीच जबाबदारी नाही, तर पालक म्हणून तुम्ही आणि तुमचा नवरा असे दोघेही यात अपेक्षित आहेत. आई-वडिलांनी व्यवस्थित समतोल साधला तरच मुले छान पद्धतीने जगू शकतात. हल्ली खूप काळजी करणारे पालक दिसतात. त्यात आई म्हटल्यावर जास्तीच घाबरते. त्यामुळे आपण मुलांची अति काळजी घेतो. त्यांना आपल्यावर अवलंबून ठेवतो. आपणही त्यात गुंतून जातो. पण ही गुंतवणूक नंतर जड जाते.’

‘मुलांनी कोणती गोष्ट मागितली की लगेच ती त्याच्या हातात देण्यापेक्षा त्यांना नाही मिळणार हे ऐकायला आणि पचवायला शिकवा. मुलांनाच उलट प्रश्न विचारून त्या वस्तूचा प्राधान्यक्रम ठरवायला शिकवा, ती वस्तू आत्ता खरच गरजेची आहे का, हा निर्णय त्यांना घ्यायला शिकवा. यातून त्यांची निर्णयक्षमता वाढेल आणि वस्तूंची गरजही लक्षात येईल. सध्या लहान मुलांमध्ये मानसिक आजारांचे प्रचंड प्रमाण वाढत आहे आणि ही काळजीची गोष्ट आहे. यासाठी पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. मुलांशी बोला, सातत्याने संवाद साधत राहा,’ असे सारोळकर यांनी सांगितले.

पालकांमध्ये असलेले मतभेद मुलांसमोर उघड करू नका, याचा मुलांवर परिणाम होत असतो. मुले मोबाइल बघत असतील, तर मी तुझ्याकडून मोबाइल का काढून घेतला त्याची कारणे त्याला सांगा. मुलांना आपण चुकतोय हे त्याचवेळी सांगितले नाही, तर नंतर सांगून उपयोग नाही. आत्ताच्या मुलांवर प्रचंड ताण आहे. तो पालक म्हणून आपण कसा कमी शकतो, याचा विचार करा. आई-बाबा, मुले आणि शाळा या त्रिकोण खूप महत्त्वाचा असल्याचे सारोळकर यांनी नमूद केले.

‘मुलांशी मोकळेपणाने गप्पा मारा. त्यांना कुठल्याही बाबतीत गृहीत धरू नका. मुलांची मैत्रीण व्हा, पण उगाच ‘सुपर मॉम’ होण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःकडेही लक्ष द्या,’ असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.

शिक्षिका शिल्पा प्रभू यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर तिसरी ते पाचवीतील विद्यार्थ्यांच्या माता पालकांना अॅड. रुची महाजनी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search