Next
‘चांगल्या आशयाचा सिनेमा जगभर पोहोचतोच’
मानसी मगरे
Tuesday, November 06, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

अक्षय इंडीकर‘उदाहरणार्थ नेमाडे’ या मराठीतल्या पहिल्या डॉक्यु-फिक्शन सिनेमाचा दिग्दर्शक ही अक्षय इंडीकरची ओळख आहे. त्याचा ‘अरण्य’ हा चित्रपटही लवकरच येत असून, प्रदर्शनापूर्वीच तो चित्रपट दोन आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविला गेला आहे; आपण मराठी भाषेतच सिनेमा करणार असल्याचं अक्षयचं म्हणणं असून, विषय-आशय चांगला असेल, तर सिनेमा जगभर पोहोचतोच, असं तो म्हणतो. या तरुण दिग्दर्शकाशी साधलेला हा संवाद...
...........
चित्रपट क्षेत्राकडे कसा वळलास? त्यातही विशेषत्वानं दिग्दर्शन  का निवडलंस?
- मी मूळचा सोलापूरचा. दहावीपर्यंतचं शिक्षण तिथेच घेतलं. थोडे चांगले मार्क्स मिळाले म्हणून आपल्याकडच्या तथाकथित परंपरेनुसार विज्ञान शाखेला प्रवेश घेतला.  या शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आलो; पण अभ्यास, डिग्री, नोकरी हा माझा पिंड कधीच नव्हता. तिथं अपयश आलं, म्हणून मग पुन्हा गावी परतलो. लहाणपनी वाटायचं, आपण जादूगार व्हायला पाहिजे. थोडक्यात, कलेची आवड तेव्हापासूनच होती. बारावी झाल्यावर पुन्हा पुण्यात आलो. एस. पी. कॉलेजमध्ये नाटक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. कालांतरानं त्याचाही कंटाळा आला. पुढे मग ‘स्पंदन’ नावाच्या एका ग्रुपसोबत जोडला गेलो. ते लोक वेगवेगळे विषय घेऊन लघुपट करायचे. त्यांच्यासोबत रमलो आणि हे माध्यम नाटकापेक्षा जास्त प्रगल्भ वाटू लागलं, आवडू लागलं. आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना त्या त्या क्षेत्राचं अधिकृत शिक्षण घेणं बंधनकारक झालं आहे. त्याप्रमाणे चित्रपट क्षेत्रात काम करायचंय, तर या विषयातलं शिक्षण घेतलं पाहिजे, असं वाटून पुढे फिल्म इन्स्टिट्यूटला प्रवेश घेतला. त्या कलेचं प्रत्यक्ष शिक्षण घेतलं. दरम्यानच्या काळात वाचनाची आवड निर्माण झाली होती. पुढे ओघानंच लिहावं असंही वाटू लागलं; पण आपल्याला लेखनाचं अंग नाही, हेदेखील समजलं. शास्त्रोक्त शिक्षण घेतल्यामुळे चित्रपट विषयातल्या तांत्रिक गोष्टी एव्हाना समजू लागल्या होत्या. त्या तांत्रिक बाबींवर काम करणं आवडू लागलं आणि ते जमतही होतं. हे काम करत करत मग दिग्दर्शनात आलो आणि दिग्दर्शन हे क्षेत्र निश्चित झालं. 

‘उदाहरणार्थ नेमाडे’ हा मराठीतला पहिला डॉक्यु-फिक्शन प्रकारचा सिनेमा तू बनवलास. त्याची प्रक्रिया नेमकी काय होती? भालचंद्र नेमाडे यांच्यावर हा सिनेमा बनविण्यामागचं कारण काय?
- भालचंद्र नेमाडे हे सुरुवातीपासूनच माझे आवडते साहित्यिक. त्यातही नेमाडेंच्या कविता मला प्रचंड भावल्या. त्यांच्या कादंबऱ्याही मला सिनेमॅटिक वाटल्या. भालचंद्र नेमाडे, जी. ए. कुलकर्णी, अरुण कोल्हटकर हे आणि यांच्यासारखी कैक थोर माणसं वाचायला मिळतात; पण पाहायला मिळत नाहीत, ही गोष्ट मला नेहमीच त्रास देते. माझ्या हातात कॅमेरा आहे. यातल्या शक्य तेवढ्या जणांना भेटून त्यांचं किमान काही डॉक्युमेंटेशन करून ठेवावं, असं वाटलं. त्यांचं रोजचं जगणं, लेखनाच्या सवयी, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचे प्रवास या गोष्टी कॅमेऱ्यात टिपाव्यात असं वाटलं. नेमाडेंच्या बाबतीत तसा प्रयत्न करून पाहिला आणि हे करत असताना मग पुढे त्यांचं केलेलं शूटिंग आणि त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचं लेखन यांची सांगड घालून काही नवीन तयार करता येईल का, असा विचार केला. यातूनच ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या डॉक्यु-फिक्शन सिनेमाची संकल्पना साकारली गेली. 

सिनेमॅटिक दृष्टिकोनातून नेमाडेंकडे पाहताना एक साहित्यिक व्यक्तिमत्त्व, त्यांची मतं याव्यतिरिक्त वेगळे नेमाडे सापडले का? भालचंद्र नेमाडे म्हणजे एका शब्दात काय सांगशील?
- ‘उदाहरणार्थ नेमाडे’च्या निमित्तानं नेमाडेंना जेवढं पाहता आलं, त्यावरून आता मी त्यांना ‘अनेकवचनी’ असं संबोधतो. माझ्या दृष्टीनं हे त्यांचं परफेक्ट नाव आहे. खरं तर वेगळे नेमाडे शोधणं हा उद्देश नव्हता; पण मी माझ्या दृष्टिकोनातून पाहिलेले नेमाडे किंवा मला दिसलेले नेमाडे असं मांडत गेलो. त्यातला एक पैलू असा, की आधुनिकतेविषयी एक आकस मनात धरून असलेले नेमाडे मला दिसले. मोबाइल फोन वापरताना त्यांची काहीतरी गडबड होते, त्यांना इच्छा नसते तो वापरायची. आजही त्यांना गाणी ऐकण्यासाठी टेपरेकॉर्डर आणि कॅसेट्स हेच पाहिजे असतं. असं काहीतरी मला टिपता आलं आणि मी ते ‘उदाहरणार्थ नेमाडे’मध्ये टिपलं आहे. मला वाटतं या आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व उलगडत जातं, आणखी स्पष्ट होत जातं. हे सगळं करत असताना मी नेमाडे यांच्याकडे तीन दिवस मागितले होते. त्यांना पूर्ण सिनेमात कुठेही अभिनय करायला लावला नाही. ते रोजच्या आयुष्यात जसे आहेत, तसंच मला ते टिपायचं होतं. यादरम्यान त्यांचा प्रतिसाद खूप उत्तम होता. त्यांना हे सगळं खूप आवडलं. सिनेमा पाहिल्यानंतर नेमाडे यांनी मला एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘माझे अंतरंग कोणाला तरी नीट कळले असल्याचा मला अत्यंत आनंद झाला.’

‘उदाहरणार्थ नेमाडे’ किंवा अरण्य चित्रपट करत असताना एक दिग्दर्शक म्हणून तुला तुझी अशी वेगळी शैली सापडली का?
- नक्कीच एक वेगळी शैली सापडली. मुळात डॉक्यु-फिक्शन हा प्रकार मराठीत आजवर कोणीच वापरला नाही. म्हणजे उदाहरणार्थ नेमाडे सिनेमासाठी वापरला गेलेला हा प्रकार मराठीत पहिल्यांदाच वापरला गेला. आजवर मराठीत डॉक्यु-ड्रामा झाले आहेत, परंतु फिक्शन जोडून हा प्रकार पहिल्यांदाच मी वापरला. खरं तर भालचंद्र नेमाडे एक व्यक्ती म्हणून मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले असतील, परंतु ते एक प्रथितयश लेखक आहेत, त्यांची त्या अनुषंगानं एक ओळख आहे, हे विसरून चालणार नाही. त्यांनी त्यांच्या लेखनातून काही पात्रं निर्माण करून ठेवली आहेत, ती अजरामरही केली आहेत. हे लक्षात घेऊन मग मला हा डॉक्यु-फिक्शनचा प्रकार हाताळावा असं वाटलं. त्यानुसार मी त्यांच्या कादंबऱ्यांमधले काही उतारे सिनेमॅटिकली तयार करून ते या सिनेमात घेतले आहेत. 

डॉक्यु-फिक्शन प्रकारात असा चित्रपट आणखी कोणावर करायला आवडेल?
- मला खरं तर अरुण कोलटकर, जी. ए. कुलकर्णी, नामदेव ढसाळ, रा. चिं. ढेरे यांच्यावर असा चित्रपट करायला आवडेल. परंतु यांच्यापैकी आज कोणीच हयात नाहीत. अशा वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक गोष्टी घेऊन ते उभं करावं लागेल. याव्यतिरिक्त म्हटलं, तर मला अशा अनेकांवर चरित्रपट करायला आवडेल. त्या दृष्टीनं माझं कामही सुरू आहे. 

सामाजिक आशय असलेला तुझा ‘अरण्य’ चित्रपट लवकरच येत आहे. त्याबद्दल काय सांगशील?
- ‘अरण्य’मध्ये मी नेमाडे यांच्या कविता घेतल्या आहेत. आता यात गंमत अशी झाली, की खरं तर मी ‘अरण्य’साठी त्यांच्या कविता वापरण्याची परवानगी घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा ‘उदाहरणार्थ नेमाडे’ असं काही माझ्या ध्यानी-मनी नव्हतं. त्यांना भेटल्यावर मी खूप प्रभावित झालो आणि मग ‘अरण्य’ जरा काही दिवस बाजूला ठेवून आधी ‘उदाहरणार्थ नेमाडे’ करू या असं ठरवलं. ‘अरण्य’बद्दल सांगायचं, तर मी करिअरसाठी पुण्यात आल्यानंतर इथे मी जगलेलं आयुष्य म्हणजे ‘अरण्य’, असं मी त्याचं साधं वर्णन करीन. एका स्थलांतरित मुलाचं आयुष्य त्यात चितारलं आहे. त्या काळात मला डायरी लिहायची सवय होती. पुढे चित्रपट विषयात आल्यावर मग त्या माझ्या डायरीनंच मला चित्रपटाचा एक विषय दिला. आयुष्यात प्रत्येकाच्या मनात अशी एक जागा असते, जिथे त्याला जायचं असतं. त्या जागी पोहोचण्याची त्याची धडपड, त्या मुलाचा प्रवास आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष म्हणजे ‘अरण्य’. 

हा चित्रपट सामाजिक आहे का?
- सामाजिक चित्रपट असं मी म्हणणार नाही, कारण मला वाटतं, की प्रत्येक चित्रपट सामाजिकच असतो. आपल्यातला प्रत्येक जण हा समाजाचा घटक आहे. त्यामुळे आपल्यातल्या कोणावरही मी चित्रपट बनवला, तर तो सामाजिकच असेल. हा चित्रपट ‘सोशल रियॅलिझम’ म्हणजे सामाजिक वास्तववाद या प्रकारातला आहे, असं म्हणता येईल. या थीमवर अनेक चित्रपट बनतात. अरण्य हा विशेषतः कवितेच्या धाटणीचा चित्रपट आहे, जो प्रत्येकाला आपला वाटेल. तो अगदी उत्कटपणे अनुभवता येईल. परंतु शब्दांत सांगता येणार नाही. मला स्वतःला ‘अरण्य’मधून जे सांगायचं होतं, ते मला जमलंय, मी त्यात यशस्वी ठरलोय, असं वाटतं. हे खूप मोठं समाधान आहे. 

‘अरण्य’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच युरोपमधला चित्रपट महोत्सव आणि ‘बुसान चित्रपट महोत्सव’ अशा दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलं. ही त्याची पावती वाटते का? तो काय अनुभव होता? 
- खरं सांगायचं, तर माझ्या या चित्रपटाला महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळतो, मराठी लोक याला किती पसंती देतात, यावर मी या चित्रपटाचं यश मोजेन. कारण चित्रपट मराठीत आहे, तर तो आधी मराठी माणसाला आवडला पाहिजे असं मला वाटतं आणि आवडला, तर तेच माझं यश असेल. अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावर माझा हा चित्रपट गौरवला जाणं ही अभिमानाची बाब आहेच, त्याचा आनंद नक्कीच आहे. कारण तेही प्रेक्षकच आहेत. युरोपमधला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि बुसान चित्रपट महोत्सव या दोन्हीही ठिकाणचे अनुभव खूप छान होते. बुसानमध्ये दर वर्षी हा महोत्सव होतो. त्यात तीन भारतीय दिग्दर्शकांना सहभागी होण्याची संधी मिळते. यंदा ती संधी मला मिळाली याचा खूप आनंद झाला. भारतीय सिनेमा आणि त्यातही मराठी सिनेमा घेऊन परदेशात, तिथल्या लोकांमध्ये जाणं, तिथे आपल्या सिनेमाबद्दल बोलायची संधी मिळणं, तिथे आलेल्या विविधभाषक चित्रपट दिग्दर्शकांशी चर्चा करायला मिळणं हे सगळंच खूप संस्मरणीय होतं. खूप काही शिकवणारं होतं. ‘अरण्य’ हा चित्रपट घेऊन मी तिथे गेलो होतो, त्यामुळे त्याविषयी भरभरून बोलता आलं. शिवाय माझ्या ‘उदाहरणार्थ नेमाडे’विषयीही तिथे चर्चा झाली. माझी भूमिका मांडता आली. तिथे जाऊन आणखी एक गोष्ट लक्षात आली, की तिथल्या चित्रपट दिग्दर्शकांचे, निर्मात्यांचे किंवा एकंदरीतच चित्रपटासमोरचे प्रश्न आपल्यासारखेच आहेत. पैसा, जागा, साहित्याची उपलब्धता अशा अनेक अडचणींना तोंड देत ते लोकही चित्रपट बनवत असतात. एकंदरीतच भारतीय चित्रपटाकडे, त्यातही मराठी चित्रपटाकडे ते लोक खूप गांभीर्यानं पाहतात. ‘बुसान’ म्हणजे दक्षिण कोरियातलं एक शहर. हा देश आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, अनेक समस्यांना तोंड देत आहे. तरीही चित्रपटासारख्या माध्यमासाठी काही तरी करण्याची त्यांची ऊर्मी कायम आहे. ते त्यासाठी धडपडत आहेत, हे पाहून कुठे तरी आपली लाज वाटायला लागते. आपल्याकडे आपल्याच चित्रपटासाठी थिएटर उपलब्ध होत नाही आणि हे परदेशातील कित्येक भाषांमधल्या चित्रपटांना तिथे बोलावून ते दाखवतात. चित्रपट हा त्यांच्या अभ्यासाचा एक विषय आहे. त्यांची चित्रपट विषयाबद्दलची तळमळ आणि त्यासाठीची धडपड आपल्याला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते. 

इतर भाषांमध्ये चित्रपट करण्याचा विचार आहे का? आगामी काळात आणखी काय प्रयोजन आहे? तसे काही प्रकल्प हाती आहेत का?
- ‘स्थलपुराण’ म्हणून एक सिनेमा आम्ही शूट करून ठेवला आहे. एका आठ-नऊ वर्षांच्या मुलाची ती गोष्ट आहे. त्यावर सध्या काम सुरू आहे. माझ्या पातळीवर मी असं ठरवलं आहे, की मी चित्रपट मराठीतच करीन. कारण मी मराठीत विचार करतो, मला मराठीत चांगलं लिहिता येतं, मराठीत चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतं, ते मांडता येतं. आजकाल त्या त्या भाषांमधले लोक आपापल्या भाषेत चित्रपट बनवतात आणि तो जगभर पोहोचतोदेखील. शिवाय हल्ली सबटायटल्सचीही सुविधा असतेच. त्यामुळे भाषेचं बंधन येता कामा नये. चित्रपट कोणत्याही भाषेत असो, त्याचा आशय-विषय चांगला असेल, भिडणारा असेल, तर तो सिनेमा जगभर पोहोचतोच. 

(अक्षयशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Surekkha Naik About 162 Days ago
Akshay Khoop abhyasu director ahe. Tyacha sobat Kaam kartana hya gosti janavtat. Udaharnarth nemade Marathi cinema madhe Kahi Navin prayog Karun Prekshakan sathi Khoop Kahi Navin ani uttam denyacha prayatna Kela ahe.
1
0

Select Language
Share Link
 
Search