Next
ओमानला हसवणार ‘‘पुलं’ची हास्यनगरी’
‘ग्लोबल पुलोत्सवा’मध्ये ‘आम्ही एकपात्री’च्या कलाकारांना आमंत्रण
BOI
Wednesday, September 18, 2019 | 02:54 PM
15 1 0
Share this article:पुणे :
समस्त मराठी मनांवर ज्यांचे गारूड आहे, त्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने, ‘‘पुलं’ची हास्यनगरी’ हा कार्यक्रम ओमानमधील सलालाह शहरात सादर करण्याचे आमंत्रण पुण्यातील ‘आम्ही एकपात्री’च्या कलाकारांना मिळाले आहे. २० सप्टेंबर २०१९ रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

‘पुलं’चा विनोद हा शाश्वत आणि वैश्विक अवकाश व्यापणारा आहे, याचा अनुभव वारंवार येतो. तोच अनुभव आता ‘आम्ही एकपात्री’च्या कलाकारांना आला. वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, महेंद्र गणपुले, डॉ. कविता घिया आणि अनुपमा खरे या पाच पुणेरी कलाकारांनी ‘पुलं’च्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन ‘‘पुलं’ची हास्यनगरी’ हा कार्यक्रम तयार केला. त्यांना आखातातील ओमानमधील सलालाह या शहरातील मराठी मित्रमंडळाकडून कार्यक्रम सादरीकरणासाठी आमंत्रण प्राप्त झाले आहे. हा कार्यक्रम २० सप्टेंबर २०१९ रोजी ‘ग्लोबल पुलोत्सवां’तर्गत आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी डॉ. सतीश देसाई आणि सचिन ईटकर यांचे सहकार्य लाभले आहे. 

या कार्यक्रमात महेंद्र गणपुले हे ‘चितळे मास्तर’ ही व्यक्तिरेखा साकारणार असून, ‘बिगरी ते मॅट्रिक’ही सादर करणार आहेत. ‘पुलं’नी संगीतबद्ध केलेली गाणी अनुपमा खरे सादर करणार आहेत. संतोष चोरडिया आणि डॉ. कविता घिया ही जोडी सूत्रसंचालकांच्या भूमिकेतून अनुक्रमे चिमणराव आणि कावेरी या पात्रांच्या माध्यमातून ‘पुलं’चा जीवनपट संवादाच्या रूपाने उलगडणार आहेत. तसेच वंदन राम नगरकर हे ‘रामनगरी’तील ‘पुलं’चा आवडता लग्नाचा किस्सा सादर करणार आहेत. एकूण दोन तासांच्या या कार्यक्रमात ‘पुलं’च्या काही दुर्मीळ ध्वनिफिती आणि चलचित्रफितीही दाखविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन संतोष चोरडिया आणि डॉ. कविता घिया यांनी केले असून, संहिता, दिग्दर्शन संतोष चोरडिया यांचे आहे.

‘पु. ल. देशपांडे हे ‘आम्ही एकपात्री’ संस्थेचे प्रेरणास्थान आहे. ‘पुलं’च्या विविधांगी कलागुणांमध्ये त्यांनी एकपात्री या सादरीकरणाचा अधिकाधिक आधार घेतला. तसेच ‘पुलं’चा जन्मदिवस हा ‘एकपात्री दिन’ म्हणून आम्ही साजरा करतो. त्या दृष्टीने ‘पुलं’ आमचे दैवतच आहेत. त्या दैवताच्या नावाने आज आम्हाला परदेशातून आमंत्रण मिळत आहे, हे आमचे भाग्यच असून, आमच्या दैवताविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे, असे आम्ही मानतो,’ अशी भावना वंदन राम नगरकर आणि संतोष चोरडिया यांनी व्यक्त केली. 

(‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्त ‘बुकगंगा डॉट कॉम’ने त्यांची सर्व पुस्तके आणि ई-बुक्स सवलतीत उपलब्ध केली आहेत. खरेदीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search