Next
‘किरकसाल गावाचे काम आदर्शवत’
BOI
Tuesday, May 23, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

सातारा : ‘जलसंधारणात किरकसाल गावाचे काम आदर्शवत असून, तो एक मैलाचा दगड आहे; मात्र जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जलनियोजनाबरोबरच पीकपद्धतीचे नियोजनही आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी माण तालुक्यातील किरकसाल गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच केली. त्या वेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत श्रमदानही केले. या वेळी गावाचे सरपंच अमोल काटकर, उपसरपंच शीतल कुंभार यांच्यासह अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘दुष्काळ जितका निसर्गनिर्मित असतो, तितकाच मानवनिर्मितही असतो. निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टींची आपण निसर्गाला परतफेड केली, तर तो आपल्याला समृद्ध करतो, दुष्काळमुक्त करतो; मात्र निसर्गाला आपण ओरबाडले तर आपली हानी होते. दुष्काळ पदरी येतात. त्यामुळे जलसंधारणाच्या विविध उपचार पद्धतींच्या साह्याने आपण दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. गावाच्या शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपण अडवला पाहिजे, तो जमिनीत जिरवला पाहिजे. किरकसाल गावाने अत्यंत दर्जेदार पद्धतीने जलसंधारणाचे काम केले आहे. राज्यातील इतर गावांसाठी हे प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. 

‘गटशेतीला चालना देण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारच्या सर्व कृषी योजना शेतकरी गटांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे किरकसाल ग्रामस्थांनी गटशेतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधावा. जलसंधारणाच्या कामाबरोबरच गावकऱ्यांनी गावातील पीकपद्धतीतही बदल करणे आवश्यक आहे. पाण्याचा अनिर्बंध वापर टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावागावांत समृद्धी येणार आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहणार आहे,’ अशी ग्वाही फडणवीस यांनी या वेळी दिली.

किरकसाल गावातील सातकीच्या मळ्याशेजारील गुरवकीच्या परिसरात सुरू असणाऱ्या सामूहिक श्रमदानाच्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी कामाची पाहणी केली. श्रमदानासाठी जमलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनीही ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search