Next
जे क्षेत्र निवडाल, त्यात सर्वोत्तम काम करा
डॉ. श्रीविजय फडके यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
BOI
Tuesday, July 02, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

डॉ. श्रीविजय फडके

रत्नागिरी :
‘समाजात प्रत्येक क्षेत्रातील कुशल व्यक्तींची गरज आहे. त्यामुळे केवळ डॉक्टर, वकील, इंजिनीअर होणे, म्हणजेच कोणी मोठे होणे असे नव्हे. कोणतेही क्षेत्र निवडा; पण जे निवडाल, त्यात सर्वोत्तम काम करा,’ असा कानमंत्र न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय फडके यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

रत्नागिरीतील फाटक हायस्कूल व गांगण-केळकर कनिष्ठ महाविद्यालयात दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. फडके बोलत होते.

डॉ. फडके म्हणाले, ‘दहावी, बारावीचा टप्पा हा मैलाचा एक दगड होता. येथून पुढे तुमच्या वाटा विस्तारणार आहेत. शिकण्यासाठी बाहेरगावी गेलात, तरी मूळ गावाला विसरू नका. मिळविलेल्या ज्ञानाचा फायदा समाजासाठी होईल, अशा पद्धतीने कार्यरत राहा,’ असे आवाहन डॉ. श्रीविजय फडके यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. श्रीविजय दापोलीचे असून, त्यांनी कोलकाता विद्यापीठातून न्यूरोसर्जरीत सुवर्णपदक मिळविलेले आहे. एवढे उत्तुंग यश मिळवल्यानंतर ते आपल्या भागातील रुग्णांची सेवा करण्यासाठी परत आले असून, रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.

दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर म्हणाले, ‘संस्था लवकरच शतकमहोत्सव साजरा करणार आहे. व्यावसायिक, कौशल्यविकास आणि विविध प्रकारचे शिक्षण संस्था देत आहे. प्रगतीकरिता पालकांच्याही साथीची गरज आहे.’

मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ‘यंदा नव्या नियमांनुसार दहावीची परीक्षा झाली व शाळेचा सर्वाधिक निकाल लागला. दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे २२ विद्यार्थी असून, संस्कृतात सात, गणितात दोन, इतिहासात सहा, तर भूगोलात ११ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले,’ असे त्यांनी सांगितले. 

मिहिर माईणकर

दहावीतील मिहिर माईणकर (प्रथम), दूर्वांकुर दिवाडकर, वर्धमान पाटणकर (द्वितीय), मैथिली करमरकर व शार्दूल सप्रे (तृतीय) या विद्यार्थ्यांचा विविध बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. बारावीतील सोनाली गोगटे, मयुरेेेश जायदे यांना गौरवण्यात आले. या वेळी शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. 

मिहिर माईणकर म्हणाला, ‘मी खासगी शिकवणीशिवाय यश मिळवले. बऱ्याच जणांना मी पहिला आल्याचे आश्चर्य वाटले. कारण मी नेहमी फिरताना, सायकलिंग करताना अनेकांना दिसत होतो. सहामाही परीक्षेपर्यंत गुण कमी मिळत होते. मग अभ्यास वाढवला.’ 

पालकांनी मनोगतामध्ये फाटक हायस्कूलची प्रगतीची धुरा शिक्षक व संस्थेने कायम राखल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सौ. माईणकर म्हणाल्या, ‘मी १९९०मध्ये दहावीत टॉपर होते व आज याच व्यासपीठावर माझा मुलगाही प्रथम आलाय.’ सौ. करमरकर म्हणाल्या, ‘फाटक हायस्कूल हा एक ब्रँड आहे. मी ग्रामीण भागातून आले असून, तेव्हापासून फाटक हायस्कूलचा दबदबा ऐकून आहे. मैथिलीला बालवाडीत प्रवेश घेतला, तेव्हा शिक्षकांनी येथे बारावीपर्यंत शिक्षण मिळेल, असे सांगितले.’
 
सूत्रसंचालन श्री. गावडे, पद्मश्री आठल्ये यांनी केले. आनंद पाटणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेच्या सीईओ सुमित्रा बोडस, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, पर्यवेक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फाटक हायस्कूलमध्ये डॉ. श्रीविजय फडके यांचा सत्कार करताना संस्था उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर. शेजारी मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ आणि विद्यार्थी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search