Next
भूजल पुनर्भरणाची शहरी चळवळ
माधुरी सरवणकर
Thursday, May 31, 2018 | 12:00 PM
15 0 0
Share this article:

भूजल पुनर्भरणाचा उपयोग अशा प्रकारे होतो.पुणे : हवामानबदल किंवा अन्य कारणांमुळे पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच पाण्याचा वापर बेसुमार वाढला आहे. त्यामुळे भूजलाचा उपसाही वाढत चालला आहे; मात्र भूजलसाठा वाढण्यासाठी होणारे प्रयत्न मात्र खूपच कमी प्रमाणात होताना दिसतात. त्यातही शहरी भागात तर अशा प्रयत्नांचे प्रमाण आणखी दुर्मीळ आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील डॉ. विश्राम राजहंस आणि रवींद्र सिन्हा यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून ‘ग्राउंडवॉटर रिचार्ज’ अर्थात भूजल पुनर्भरण ही संकल्पना राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढून पाणीटंचाई कमी व्हायला मदत होऊ लागली आहे. त्यामुळे या मोहिमेचा प्रसार होऊ लागला आहे.

पुण्यातील बाणेर-पाषाण भागात अनेक सोसायट्या आहेत. तेथील रहिवाशांना नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच पाण्याची समस्या नागरिकांसमोर उभी राहते. पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरत नाही. ही नेहमी उद्भवणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी बाणेर-पाषाण लिंक रोड परिसरात राहणारे डॉ. विश्राम राजहंस व रवींद्र सिन्हा यांनी पुढाकार घेतला. या भागात ६० सोसायट्या आहेत. बोअरवेलचे पाणी बंद होत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. या ६० सोसायट्यांना मिळून दिवसाला एक हजार टँकर पाणी लागायचे. अनेकदा टँकरमाफियांची अरेरावीही सहन करावी लागत होती. भूजलाची पातळी वाढली, तर बोअरवेलचे पाणी अधिक काळ मिळू शकेल, असा विचार करून डॉ. राजहंस आणि सिन्हा यांनी ‘ग्राउंडवॉटर रिचार्ज’ या संकल्पनेवर काम करायचे ठरवले.

हायड्रोजिओलॉजिस्ट डॉ. हिमांशू कुलकर्णी आणि शशांक देशपांडे यांचे  मार्गदर्शन त्यांनी घेतले. पावसाचे वाहून जाणारे पाणी, तसेच गच्चीवरचे पाणी पाइपद्वारे पुन्हा भूगर्भात सोडणे, म्हणजे भूजल पुनर्भरण अर्थात ग्राउंड वॉटर रिचार्ज. राजहंस यांनी सुरुवातीला हा प्रयोग स्वतःच्या सोसायटीमध्ये करायचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी ‘ग्राउंडवॉटर सर्व्हे अँड डेव्हलपमेंट एजन्सी’ (जीएसडीए) या भूजल संवर्धनासाठी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेची मदत घेतली. या संस्थेतील डॉ. खंडारे आणि त्यांच्या सहकारी तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीदरम्यान त्या भागातील भूजलसाठा कमी झाला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे भूजल पुनर्भरण हाच पर्याय असल्याचे सिद्ध झाले. 

या खड्ड्यातून पाणी जमिनीत सोडले जाते.

जमिनीमध्ये अंदाजे २५ ते ५० फूट खोलीवर बेसाल्ट हा अच्छिद्र खडक असतो. या खडकाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साठवता येते. म्हणूनच कुमार सहवास सोसायटीच्या आवारात १०० फूट खोलीची एक बोअरवेल खोदली गेली. तिच्या जमिनीवरील तोंडाच्या सभोवती सहा बाय सहा फूट आकाराचा एक खड्डा तयार करण्यात आला. त्यात पाणी जाण्यासाठी पाइप बसवण्यात आला. पाणी गाळले जाण्यासाठी बारीक वाळू, दगड व कोळसा टाकण्यात आला. एवढी सिद्धता झाल्यानंतर गच्चीवरचे, तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी त्यात सोडले जाऊ लागले. त्यामुळे हळूहळू भूजल पुनर्भरण होऊ लागले. त्या भागातील भूजलसाठा वाढू लागला. काही काळानंतर या प्रयोगामुळे सोसायटीतील बोअरवेलला येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यानंतर हे पाहून असाच प्रयोग पेनिन्सुला व पद्मविलास या सोसायट्यांनीही केला. 

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर भूजलावर काम करण्यासाठी २०१६मध्ये डॉ. राजहंस व सिन्हा यांनी ‘भूजल अभियान’ या संस्थेची स्थापना केली. या दोघांनी व अनेक कार्यकर्त्यांनी आजूबाजूच्या परिसरातील सोसायट्यांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी या प्रयोगाबद्दल जनजागृती सुरू केली. सुरुवातीला १०, नंतर २० आणि नंतर ४० सोसायट्यांमध्ये भूजल पुनर्भरण केले जाऊ लागले. आता बाणेर, बालेवाडी व परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग (पर्जन्यजलसंचय) करून भूजल पुनर्भरण केले जाऊ लागले आहे. त्यामुळे परिसरातील भूजलसाठ्यात सुधारणा होऊ लागली आहे.

‘ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हिमांशू कुलकर्णी व शशांक देशपांडे यांच्या व्याख्यानांचे शहराच्या विविध भागांमध्ये आयोजन करतो,’ अशी माहिती डॉ. विश्राम राजहंस यांनी दिली. भूजल पुनर्भरणाची ही चळवळ केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्याच्या आणि देशाच्या सर्व भागांत राबविण्याची गरज आहे. 

संपर्क : भूजल अभियान – ९२२५५ ३६३९७

(सोबतचा व्हिडिओही जरूर पाहा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search