Next
आहार, की औषध..?
BOI
Wednesday, May 23, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:


आज आपण वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर अनेक प्रकारच्या औषधांच्या जाहिराती बघतो. वजन वाढवणे, वजन कमी करणे, केस गळणे, उंची वाढवणे अशा समस्यांशी संबंधित जाहिरातींमध्ये दाखवलेले सुडौल बांधे, लांबसडक केस, पीळदार शरीर बघितले, की साहजिकच अनेक लोक या औषधांच्या मोहात पडतात आणि मग आहार-विहार यांच्यापेक्षा शरीरावर औषधांचा मारा जास्त प्रमाणात करतात... ‘पोषणमंत्र’ सदरात आज पाहू या औषधाचे काम करत असलेल्या आहारशैलीबद्दल...
....................
या लेखात पोषकतत्त्वे म्हणजेच जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने इत्यादी असलेली औषधे, सरसकट सामान्य शारीरिक तक्रारी जसे, डोकेदुखी, पित्त, पोट बिघडणे यांसाठी घेतली गेलेली औषधे, या सगळ्यांचा विचार करणार आहोत. अशी अनेक औषधे बाजारात उपलब्ध असतात, ज्यात मल्टिव्हिटॅमिन, खनिजे हे घटकच नसतात. अत्यंत गरज असल्यास डॉक्टर ह्याच गोळ्या लिहून देतात, तेव्हा तो डोस पूर्ण करावा. अनेक वेळा एकमेकांचे ऐकून किंवा स्वतःच्या अनुभवावरून इतरांना परस्पर औषधांची नावे सांगितली जातात. ‘मला बरे वाटते, म्हणून तू पण घे..’, असेही सल्ले दिले-घेतले जातात. या सगळ्यामुळे एक वेळ अशी येते, की कोणतीच गोळी आपल्याला लागू पडत नाही. आपण या अवस्थेपर्यंत का पोहोचलो याचा विचारच होत नाही. रोजच्या जीवनात अनेकांच्या सरसकट याच तब्येतीच्या तक्रारी असतात. त्याचे मूळ कारण असंतुलित आहार, जेवण्याच्या वेळा न पाळणे, निकृष्ट आहार इत्यादी आहेत.

आजकाल जीवनसत्त्व ‘ब १२’ची कमतरता अनेक लोकांमध्ये आढळते. अगदी शाळेतील मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत ‘ब’ व ‘क’ जीवनसत्वाची कमतरताही खूप लोकांमध्ये दिसून येते. हे लक्षात आल्यानंतर मग यावर उपाय म्हणूनच परस्पर ‘बी-काँप्लेक्स’च्या गोळ्या घेतल्या जातात. या बहुतांश लोकांच्या सरधोपट सवयी बदलणे गरजेचे आहे.   

पोषणमूल्यांची कमतरता हे या सर्व तक्रारींमागचे कारण आहे. ही पोषक मूल्यांची कमतरता होण्याची नेमकी कोणती कारणे आहेत..? 
आहारातील न्यूनता : विविध पोषक मूल्यांच्या कमतरतेमुळे वजन कमी व इतरही पोषणात कमतरता जाणवते. ही न्यूनता कदाचित पाककला न आवडणे, त्यात दोष असणे, खूप आवडी-निवडी असणे, अशा काही कारणाने निर्माण होऊ शकते.

अवशेषण दोष : पचनसंस्थेतील एखाद्या अवयवाचे कार्य नीट नसणे, जठर विकृती, आतड्यात दोष इत्यादींमुळे अवशेषण दोष निर्माण होतो.

अकार्यक्षम अवयव : दारूचे व्यसन असलेल्या लोकांचे यकृत अकार्यक्षम  होते व त्यामुळे पोषकतत्त्वे शोषली जात नाहीत. 

वाजवीपेक्षा जास्त निचरा होणे : स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्राव होणे किवा वरचेवर शौचास जावे लागणे  यांमुळे पोषक तत्त्वांची कमतरता होऊ शकते.

पोषक तत्त्वांची दैनंदिन गरज लक्षात न आल्यामुळेही कमतरता निर्माण होते. उदाहरणार्थ, गरोदरपणामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह इत्यादींची गरज वाढते. शिवाय कर्करोगासारख्या आजारांत तुमचा आहार योग्य, पूरक व उत्तम असणे गरजेचे असते; पण त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही. सगळा भर औषधांवर दिला जातो. अशी सर्व परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्यापेक्षा अशी परिस्थिती निर्माणच होणार नाही, याची काळजी घेणे जास्त श्रेयस्कर आहे. औषधे गरजेची असतील, तर ती घेतलीच पाहिजेत; पण अनावश्यक औषधे घेणाऱ्यांची संख्याही कमी नाही. औषधे का टाळावीत व त्याऐवजी संतुलित आहारावर का भर द्यावा, ते आपण बघू या. 

आहार व औषध यांची तुलना :  

आहा

औषध

आहार द्रव्ये रस, आस्वाद आणि गंध या दृष्टीने मनाला आनंद देणारी असतात.

औषधी द्रव्ये बहुधा अशी नसतात.

आहार द्रव्ये शरीराचे घटक बनतात. म्हणजे द्रव्यत: कार्य करतात

औषधी द्रव्ये शरीराचे घटक बनतातच असे नाही. ही द्रव्ये क्वचित द्रव्यत: कार्य करतात

आहार द्रव्ये रस, वीर्यादी गुणकर्मांनीही कार्य करतात

 औषधी द्रव्ये रस, वीर्य, विपाक, प्रभाव इत्यादी गुणकर्मांनीही प्राधान्याने कार्य करतात

शरीराची घटक बनणारी ही आहार द्रव्ये शरीराच्या झिजलेल्या घटकांची परिपूर्ती करण्याइतकी शरीरात घेतली जातात.

औषधी द्रव्ये शरीराच्या झिजलेल्या घटकांची पूर्ती होण्याला ते अनुरूप बनविण्यासाठी वाढलेले घटक (दोष) शरीरातून काढून टाकण्यास  (शोधन) वा पचनादी कार्ये करून ते आत्मसात करण्यास मदत करतात.

आहार हा शरीर घटकांचे पोषण करणारा व शरीर घटक वाढविणारा असतो.

औषध हे शरीर वर्धन व पोषण या आहार कार्याला मदत करीत असते.

आहार हा रोज घ्यावा लागतो.

औषध हे नैमित्तिक आहे. जरूरीप्रमाणे घ्यावे लागते.

आहाराचे प्रमाण पुष्कळ असते

आहाराच्या मानाने औषधाचे प्रमाण अल्प असते. सिद्धौषधींचे प्रमाण तर फारच अल्प असते

आहार शरीराला सवय वा सात्म्य असलेल्या द्रव्यांचाच घेणे श्रेयस्कर असते.

औषधे बहुधा शरीराला सवयीची नसतातच.

 

आहार संस्कारार्ह असतो.

औषध हे आहारावर संस्कार करणारे असते.

आहार हे एक प्रकारचे औषधच आहे

परंतु औषध हे आहार नसते.

(संदर्भ : मराठी विश्वकोश, खंड दोन)

हा आहार व औषधे यांच्यातील फरक आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची उकल करून देतो. सात्त्विक आहार निसर्गनिर्मितच असतो. उदाहरणार्थ  वरण, भात, भाजी, पोळी असे रोजचे जेवण आहे. या सगळ्याचे मूळ वनस्पतीच आहेत. डाळ, तांदूळ, गहू, फळे, भाज्या. इत्यादी, तसेच दूध व दुधाचे पदार्थ गायीपासून मिळत असतील, तरी गाय सर्वसाधारणपणे शाकाहारी आहे. त्यामुळे ज्या घटकांचे हे अन्न बनलेले आहे, तेच घटक आपल्या शरीराचे घटक बनतात व काम करतात. 

आरोग्य उत्तम ठेवण्यास उत्तम आहार व व्यायाम याशिवाय पर्याय नाही. आयुर्वेदात असे म्हटले आहे, की आहार चुकीचा असल्यास औषधाचा काही उपयोग नाही. आहार योग्य असेल तर औषधाची गरजच नाही. तेव्हा चला..! आपल्या आहाराच्या योग्य सवयी ठेवून औषध घेण्याची गरजच निर्माण होणार नाही, यासाठी प्रयत्न करू या..   

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search