Next
त्यांची जीवनशैली जवळून पाहिली...
BOI
Friday, April 13, 2018 | 11:13 AM
15 0 0
Share this story


हाफलांगला राहून फावल्या वेळात किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी मी उगाच आजूबाजूला फेरफटका मारत असे. या वेळी येथील आदिवासी मुलींची जीवनशैली जवळून पाहायला मिळाली. सुट्टीच्या दिवशी सगळ्या मुली सकाळी उन्हांत बसत; पण जमिनीवर नाही, तर तीन लाकडे एकमेकांत जुळवून स्टँड करून त्यावर बसत. तसे करायचा मी खूप प्रयत्न केला, पण मला जमायचे नाही. मग त्यांच्यापैकी एकजण येऊन मला ती लाकडे जमवून द्यायची. तेव्हा इतर मुली खूप हसायच्या.... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’या लेखमालिकेचा हा तिसरा भाग...
....................................
पाऊस व राजकीय बंद यामुळे बऱ्याचदा शाळा बंद पडायच्या. माझा वेळ वाया जात असे. त्यामुळे जरा उघडीप मिळाली, की मी माझ्या कामाला लागत असे. दुसऱ्या दिवशी मुलांच्या हॉस्टेलवर आलो. तिथे प्रसन्नजींना फक्त नववी व दहावीतील मुलांना हॉलमध्ये आणायला सांगितले. तेव्हा दहावीतील पाच जण व नववीतील चार जण होते. त्यांना पुस्तकातून शिकवलेले विद्युत व चुंबकांचे प्रयोग करून दाखवले. ही मुले आयुष्यात पहिल्यांदाच पुस्तकात शिकवलेली माहिती प्रत्यक्षात पाहत होती. चुंबक व त्याचे साहित्य स्वतः हाताळत होती. अशा वेळी त्यांचे कुतूहलमिश्रित भाव पाहण्यासारखे होते. 

माझ्याकडे भरपूर वेळ होता, म्हणून विचार केला, की दुसऱ्या शाळेमधून हे प्रयोग करून दाखवावे. अजयला माझा विचार पटला; पण त्याने यासाठी ‘इन्स्पेक्टर ऑफ स्कूल’ची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यांना भेटून मी माझे प्रपोजल सांगितले त्यांनाही ते आवडले व त्यांनी हाफलांगच्या सर्व शाळांमधून प्रयोग दाखवण्याची परवानगी दिली. ते अजयचे मित्र असल्यामुळे माझे काम लवकर झाले. मला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुला-मुलींना गोळा करून त्यांच्याकडून सौर मंडळाची प्रतिकृती तयार करून घेतली. मायक्रोस्कोप सेट करून कोवळ्या फांद्यांना आडवे छेद देऊन, सेलची रचना दाखवली. मीठ व साखरेचे स्फटिक दाखवले. एका ग्रुपला गणिताची सापशिडी खेळायला दिली, तर दुसऱ्या ग्रुपकडून आर्यभट्ट उपग्रहाची प्रतिकृती करून घेतली. संपूर्ण वर्ग विज्ञानमय झाला होता. माझे उद्दिष्ट हळूहळू सफल होत होते.  

दुसऱ्या दिवशी दुपारी मुलांच्या सरकारी शाळेत गेलो. माझ्या कामासाठी त्यांनी एकच तास देण्याचे मान्य केले. सर्व शिक्षक व अंदाजे ५०-६० विद्यार्थी एका हॉलमध्ये जमा झाले. जसे जसे चुंबक, विद्युतचे प्रयोग त्यांना करायला दिले, तसे सर्वजण त्यात हरवून गेले. मुलांच्या व शिक्षकांच्या बऱ्याच शंका दूर केल्या. एक तास संपला. असे सलग तीन तास चालले. मला त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले. अशा प्रकारे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, सेंट अॅग्नेस कॉन्व्हेंट, विश्व हिंदू परिषदेचे विवेकानंद विद्यालय आणि बडा हाफलांगमधील सरस्वती विद्यालय याठिकाणी विज्ञानाची प्रात्यक्षिके करून दाखवली. तिथे असे प्रयोगाचे साहित्य मिळत नाही, हे माहित असल्यामुळे मी सोबत घेऊन गेलेले सर्व साहित्य त्या त्या शाळांना दान करून टाकले. कारण एवढेच, की त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवावी. एव्हाना मला सर्वजन ‘पुणे का मामा’ म्हणून ओळखू लागले होते. 

एकदा मुलींच्या हॉस्टेलवर संध्याकाळी कागदाच्या वस्तू करून दाखवत होतो. याठिकाणी असलेल्या मुली दूरदूरच्या आदिवासी खेड्यातून आलेल्या होत्या. कोणाकडेही पैसे नसायचे. म्हणून नित्य गरजेच्या वस्तूसुद्धा त्यांना घेता येत नसत. त्या सगळ्या आता माझ्याशी मोकळेपणाने बोलत होत्या. त्यामुळे मग कुणाला जेठ, टूथपेस्ट, पावडर अशा त्यांच्या गरजेनुसार काही वस्तू मी आणून देत असे. सरस्वती विद्यामंदिरचे शिक्षक श्रीवास्तव यांनी तिथे येण्याचा निरोप दिला. रात्री तिथेच मुक्काम करायला सांगितले. त्याप्रमाणे मी व प्रेम तिथे गेलो. तिथे ‘गोकुळ’ म्हणून ‘राणी माँ गायरेन्स्यू कन्या छात्रवास’ आहे. त्याच्या प्रमुख सुनिता नांदेडकर होत्या. योगायोगाने त्यांचे पती केशवजी नांदेडकरही तिथे आले होते. नांदेडकर कुटुंब पुण्याला सिंहगड रस्त्यावर राहतात. श्रीवास्तव यांना विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी काही मॉडेल करून पाहिजे होती. त्यांना मोटारचे मॉडेल दिले व ते कसे जुळवायचे हे त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. रात्री हॉलमध्ये मुला-मुलींकडून पेपर क्राफ्ट व कोलंबिया यानाची प्रतिकृती करून घेतली. सर्वजण आपल्या हाताने वस्तू करण्यात दंग झाले होते. 

नांदेडकरांनी गरम गरम फुलके तयार करून, त्या थंड पावसाळी हवेत ऊब आणली होती. खूप दिवसांनी पुण्यासारखे घरचे जेवण मिळाल्याचे समाधान मिळाले. पाऊस चालू होता. नांदेडकर व आमच्यात छान गप्पा रंगल्या होत्या. रात्री झोपल्यावर पावसाचा जोर वाढला होता. विजाही कडाडत होत्या. रात्रभर पत्रावर पावसाचे नगारा वादन सुरू होते. सकाळी प्रार्थनेसाठी सगळे विद्यार्थी हॉलमध्ये जमले होते. मुलांनी एका सुरात गणपती अथर्वशीर्ष म्हटले. ते इतके शुद्ध, स्पष्ट व लयीत म्हटले, की आपल्या पुण्यातल्या एखाद्या वेद पाठशाळेतील वेदघोष ऐकत आहोत, असे वाटले. ओंकार उच्चारणाने तर सर्व हॉल भरून गेला होता. नांदेडकर वहिनींनी या मुलांची तयारी करून घेतली होती. आता पावसाला अजून वेग चढला होता. नंतर पुरामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्ते व सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली होती. मी पुण्याला परतण्याचे ठरवले. या छात्रवासाच्या शेजारी नाग लोकांची वस्ती आहे. आपली पूर्वापार संस्कृती जपत ते येथे राहतात. नागा जमात नरभक्षी असते, असे पूर्वी वाचले होते. म्हणून नाग जमातीविषयी थोडी भीती वाटत असे. लांबूनच त्यांच्या पारंपरिक रंगीबेरंगी पोशाखात वावरणारे स्त्रिया आणि पुरुष, तसेच मुले- मुली पाहून त्यांची सांस्कृतिक जीवनशैली पाहण्याची उत्सुकता जागी झाली होती.

पुण्याला परत आल्यावरही हाफलांगमध्ये आणखी काय शैक्षणिक सुधारणा करता येतील, अभ्यासातील अडचणी कशा सोडवता येतील, याबद्दल विचारमंथन सुरू होते. मुक्तांगणमध्ये नवीन काय तयार होत आहे, हे पाहण्यासाठी जात असे. तर डंकेशी संपर्क करून नवीन कोणते संच करत आहेत, याची माहिती घेत होतो. पुढे आठवी, नववी आणि दहावीच्या गणित व विज्ञान विषयांच्या सीडी  उपलब्ध करता येईल का, असा विचार करू लागलो. त्यासाठी सीडी प्लेअर आणि टीव्हीपण घेण्याचा विचार केला. आसाममध्ये शैक्षणिक वर्ष मार्च ते डिसेंबर असते. मार्चमध्ये शाळा सुरू होतात. जुलै महिना पावसाळ्याची सुट्टी. डिसेंबरमध्ये वार्षिक परीक्षा. जानेवारीत परत सुट्टी. फेब्रुवारीत नवीन प्रवेश व मार्चपासून अभ्यास असा क्रम असे. सर्व शाळा सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत. जानेवारी व जुलै महिन्यात छात्रावासातील मुले आपापल्या गावी जातात, त्यामुळे या दोन महिन्यांत छात्रावासामध्ये फक्त दहावीचे विद्यार्थी असत. माझी शिकवण्याची पद्धत त्यांना खूप आवडली. म्हणून रामानंदजी व सुनिताजी तिथेच कायमचे राहून शिकविण्याची विनंती करत असे; पण माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे ते शक्य नव्हते. जेव्हा त्यांना माझी गरज भासेल तेव्हा मी नक्की येईन असे आश्वासन मात्र दिले होते.

सप्टेंबर २००७ मध्ये अचानक सुनिताजींचा फोन आला, की शाळेचे सर्व शिक्षक सत्याग्रह करून निघून गेले आहेत. तुम्ही येऊन मुलींना शिकवा, म्हणजे त्यांचे वर्ष वाया जाणार नाही. मी लगेच निघायची तयार केली व ऑक्टोबर अखेर बडा हाफलांगला आलो. छात्रावासाजवळ एका खोलीत माझी राहण्याची सोय केली होती. सकाळी पाच ते सात आणि दुपारी चार ते सहा व मध्ये जसा वेळ मिळेल, तसा शिकविण्याची तयारी केली. त्याप्रमाणे सकाळी पाच वाजता नववी व दहावीच्या मुलींना गणित शिकवत असे, व संध्याकाळी विज्ञान. वेळ मिळेल तसे त्यांच्या इतर विषयांमधील अडचणी सोडवत असे. माझ्या खोलीशेजारी एक बिहारी शिक्षक कुटुंब व नाग शिक्षकाचे कुटुंब होते. छात्रावासाहून आल्यावर तिथल्याही मुलांची गणित व विज्ञान उजळणी करून घेत असे. येथे आदिवासी मुलींची दिनचर्या व सवयी जवळून पाहायला मिळाल्या. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक घरातील सरपण आल्यावर मुली त्यांच्या अचलादिदी किंवा मंदिरादिदी यांच्याबरोबर शेजारील जंगलात सरपण गोळा करायला जात. परत येताना प्रत्येकीच्या पाठीवरील बांबूची टोपली लाकडांनी भरलेली असे. एवढ्या छोट्या मुली इतके वजन कसे सांभाळतात, याचे नवल वाटे; पण आजीलने म्हणाली, ‘मामा, पहाडी लडकी है, इतना तो बोझा लानाही ही पडेगा.’ मग आणलेली लाकडे तोडून वाळायला ठेवत.

सुट्टीच्या दिवशी सगळ्या मुली सकाळी उन्हांत बसत; पण जमिनीवर नाही, तर तीन लाकडे एकमेकांत जुळवून स्टँड करून त्यावर बसत. तसे करायचा मी खूप प्रयत्न केला, पण मला जमायचे नाही. मग त्यांच्यापैकी एकजण येऊन मला ती लाकडे जमवून द्यायची. तेव्हा इतर मुली खूप हसायच्या. काही मुली एका मोठ्या लाकडाचा ओंडका घेऊन त्याला शेजारच्या मोठ्या वृक्षाच्या जमिनीवर आलेल्या मुळीवर बॅलन्स करून ‘सी-सॉ’ खेळायच्या. छोट्या मुली जमिनीत बांबूच्या काड्या रोवून त्या भोवती लोकर गुंडाळून कापड विणण्याचा प्रयत्न करायच्या. अशा वेळी मोठ्या मुली त्यांना मार्गदर्शन करायच्या. मोठे झाल्यावर त्या मुलींना आपले कपडे घरीच विणायचे असतात. त्याची ही प्राथमिक तयारी. या मुली स्वयंपाकासाठी तांदूळ इतक्या कलात्मक रीतीने बांबूच्या मोठ्या चाळण्यातून पाखडतात, की ती लय नुसते बघत राहावेसे वाटे. या मुलींना पतंग तयार करून उडवायला शिकवले. त्यांना खूप मजा वाटायची. त्यांच्याकडे पाण्याचे, ट्यूबलाइटचे, शिवणाच्या मशीनचे असे खूप प्रश्न होते. ते सर्व मी एक एक करून मार्गी लावून दिले.
(क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Girish Saraswate About 335 Days ago
खूपच सुंदर वर्णन. प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात व आपणही त्यातला एक भाग आहोत असं वाटायला लागतं. तुझी कामातली आत्मीयता तर विलक्षण आहे. तुझ्याकडून आनुभवलं व शिकलो सुध्दा. तुझं हे कार्य नक्कीच अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
0
0

Select Language
Share Link