Next
पुणे रोटरी क्लबच्या पुढाकारातून भागली १४ गावांची तहान
दुष्काळग्रस्त, डोंगराळ भागांत स्वच्छ, शुद्ध पाण्याची उपलब्धता
BOI
Thursday, June 13, 2019 | 04:07 PM
15 0 0
Share this article:

भोर तालुक्यात डोंगराळ भागांत अशा पद्धतीच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.

पुणे :
दुष्काळग्रस्त आणि डोंगराळ ग्रामीण भागातील स्वच्छ पाण्याची निकड लक्षात घेऊन ‘रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१’च्या सदस्यांनी राबविलेल्या उपक्रमांमुळे १४हून अधिक गावांमध्ये स्वच्छ पाण्याची उपलब्धता झाली आहे. या अंतर्गत ‘अमृतधारा’ प्रकल्पाद्वारे ‘वॉटर एटीएम’ या फिल्टर आर-ओ प्लांटच्या उभारणीतून सहा गावांची स्वच्छ पाण्याची गरज भागवण्यात आली. तसेच ‘अमृतकुंड’ प्रकल्पाद्वारे डोंगराळ भागातील झऱ्याचे पाणी टाकीद्वारे उपलब्ध करून आठ गावांची तहान भागवण्यात आली आहे. 

‘रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१’च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे यांनी ही माहिती दिली. होतले (ता. मुळशी, जि. पुणे), नसरापूर (पुणे), आटपाडी (सांगली), बुचकेवाडी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांसारख्या सहा गावांत स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘अमृतधारा’ प्रकल्पाद्वारे आर-ओ प्लांट उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रत्येक गावात दररोज चार हजार लिटर पाणी शुद्ध करण्याचे काम होत आहे. गावकऱ्यांसाठी वॉटर एटीएम कार्ड तयार करून देण्यात आले असून, त्यावर वापराची नोंद होते. त्या नोंदीद्वारे गावकऱ्यांकडून वर्गणी स्वरूपात पैसे गोळा केले जातात. गावातील गावकऱ्यांनाच प्रशिक्षण देऊन वर्गणी, प्रकल्प देखभाल, प्रशिक्षण ही कामे केली जातात. पूर्वी ही गावे नदीचे पाणी पीत होती. बोअरवेलमुळे क्षारयुक्त पाणी येते. ७० टक्के आजार अशुद्ध पाण्यामुळे होतात. त्यामुळे ग्रामीण भागात शुद्ध पाण्यासाठी आर-ओ प्लांटचा पर्याय निवडण्यात आल्याचे सतीश खाडे यांनी सांगितले. या प्रकल्पातून पाच रुपयांना २० लिटर याप्रमाणे पाणी मिळते. अशोक भंडारी (रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड) यांच्यासह अनेकांची या प्रकल्पात मदत झाली. प्रत्येक प्रकल्पासाठी रोटरी क्लबने अडीच लाख रुपये खर्च केले आहेत. ‘अमृतकुंड’ या संकल्पनेद्वारे डोंगराळ भागातील टंचाईग्रस्त गावांत टाकी बांधून, जलवाहिनीद्वारे गुरुत्वाकर्षणाने गावात पाणी आणणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. आणखी आठ गावांत हे प्लांट उभारण्यात येणार आहेत. डोंगराळ भागात झऱ्याचे पाणी आणण्यासाठी महिलांचा अर्धा दिवस जात असे. पाच किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. फेब्रुवारी ते जून या काळात पाणीटंचाई होत असे. त्यावर उपाय म्हणून रोटरी सदस्यांनी ‘अमृतकुंड’ प्रकल्प राबवायचे ठरवले. 

या प्रकल्पात डोंगरात झऱ्याजवळ फेरोसिमेंटची १२ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येते. जलवाहिनीद्वारे ते पाणी गावाजवळ दुसऱ्या टाकीत सोडले जाते. पुण्याच्या भोर तालुक्यातील वरोडी, धानवली, कोरले, कोवी आणि मुळशी तालुक्यातील सुसले, गोरे वस्ती, कातकरी वस्ती अशा एकूण आठ गावात अमृतकुंड प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील चार गावांसाठी रोटरीने सात लाख ४० हजार रुपये खर्च केले. मजुरीपोटी गावाचा खर्च अडीच लाख रुपये आला. आता पुढील १० गावांचे काम २५ लाख ३० हजार रुपयांमध्ये होणार आहे. 

सिंजेंटा कंपनीने त्यांच्या सीएसआर निधीतून काही निधी दिला आणि रोटरी क्लबने उर्वरित निधी जमवून हे प्रकल्प पूर्ण केले. गावकऱ्यांनीही श्रमदान केले. त्यामुळे गावकऱ्यांना विनामूल्य पाणी मिळू लागले आहे. या सर्व प्रकल्पांच्या उभारणीमध्ये सिंजेंटा कंपनीचे संजीव रस्तोगी, अमानोरा क्लबचे इंदर सिंघी, भोर-रायगड रोटरी क्लबचे विनय कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. 

‘आगामी पाच वर्षांत पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील सर्व वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याची सोय अमृतकुंड प्रकल्पाद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी मदत उभी केली जाणार आहे,’ असे सतीश खाडे यांनी सांगितले. 

हेही जरूर वाचा :
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search