Next
देव खरंच आहे का..??
BOI
Saturday, November 04 | 10:00 AM
15 0 0
Share this story


संतांनी म्हटलं आहे, की ईश्वर आपल्या आतच असतो.. म्हणजे काय..? गणपती अथर्वशीर्षात म्हटलंय ‘त्वं मूलाधारस्थितोसी नित्यम्..’ म्हणजे गणपती शरीराच्या आत मूलाधार, म्हणजे शेवटच्या मणक्यात स्थित असतो. असं असेल तर मग लोक मंदिरात का जातात..?.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकानं लिहिलेला अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा दुसरा भाग... 
............................................
पाऊस दिवसभर सुरूच होता. तरीही लोक येत होते. कोणी  व्हरांड्यात बसलेले, कोणी दाटीवाटीने बसून रात्र काढण्यासाठी तिथेच प्लास्टिक अंथरून पाय जवळ घेऊन झोपपेले.. असं चित्रं होतं. पावसाचं पाणी अगदी तिथपर्यंत येत होतं. आजूबाजूला हा सगळा गोंधळ सुरू असताना माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं, का हे सगळे इकडे येतात? इतका त्रास सहन करत, जीव धोक्यात घालून का, कशासाठी येतात..? काय मिळतं यातून त्यांना..? खरंच देवासाठी हे सगळे येतात, तर देव काय फक्त हिमालयातच आहे का? शिव, शंकर, महादेव हा फक्त घराबाहेरच उंच पर्वतावर, आत गुहेतच असतो का..?

संत लोकांनी म्हटलं आहे, की ईश्वर आपल्या  आतच असतो.. म्हणजे काय..? गणपती अथर्वशीर्षात म्हटलंय ‘त्वं मूलाधारस्थितोसी नित्यम्..’ म्हणजे गणपती शरीराच्या आत मूलाधार, म्हणजे शेवटच्या मणक्यात स्थित असतो. असं असेल तर मग मंदिरात का जातात लोक.? अमरनाथ यात्रेत दरवर्षी लोक मारतात. केदरनाथला शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. वैष्णोदेवीला किंवा हिमालयात दर्शनाला जाताना गाड्यांना अपघात होतात. काही वर्षांपूर्वी साताऱ्याजवळील काळूबाई मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेक लोक मेले होते. अशा वेळी वाटतं, देव यांना वाचवत का नाही..? अशा घटना नेहमीच घडत असल्या, तरीही लोक कुटुंबापासून दूर शेकडो किमी अंतर पार करून त्याच्यासाठी का जातात..? मी तरी का आलो इथे..? फक्त निसर्ग बघायला.? का त्याचा अनुभव घ्यायला.. आणि शेवटी तो नेहमीचा प्रश्न, देव खरंच आहे का?

या प्रश्नांची उत्तरे व्यक्तिपरत्वे, काळपरत्वे आणि दृष्टिकोनपरत्वे कदाचित वेगवेगळी असू शकतात. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजताच्या बसचं आरक्षण मला मिळालं होतं. मी ती आरक्षणाचा क्रमांक असलेली पावती काळजीपूर्वक पाकिटात ठेवली आणि शरीर जरा वेळ टेकवण्यासाठी डॉर्मिटरी शोधत गेलो. जम्मू-काश्मीरच्या या तीन मजली मोठ्या अमरनाथ यात्रीनिवासात अवाढव्य सभागृहं आहेत. मी वातानुकूलित सभागृहामध्ये आरक्षण केलं होतं. ते तिसऱ्या मजल्यावर होतं. सर्व जण आपापल्या कुटुंबीयांसोबत, सहकाऱ्यांसोबत जागा राखून झोपले होते. काही बसले होते. प्रचंड मोठ्या अशा तीन मजल्यांवर एकूण १० सभागृहं होती आणि ती गच्च भरली होती. आपापले फोन चार्ज करण्यासाठी प्रत्येकाची कसरत सुरू होती. खाली जवळच्या एका हॉलमधून घोषणा झाली, यात्रेकरूंनी जेवायला यावं. सतत उत्साहानं, प्रेमानं एक व्यक्ती जेवण्यासंबंधी सूचना देत होती. मुसळधार पावसात शेडमध्ये सर्वजण रांगेत लागून हॉलमध्ये प्रवेश करत होते. अत्यंत चविष्ट असे उत्तर भारतीय गरम जेवण, साजूक तुपातील गोड शिरा खाऊन सर्व जण तृप्त होत होते. पाऊस अजूनही कोसळतच होता. अगदी सततधार. क्षणाचीही उसंत नाही. मी सर्वांत वरच्या मजल्यावर व्हरांड्यात बसून सावळ्या राखाडी आभाळाच्या पोटातून खाली झेपावणाऱ्या सहस्रधारा शांतपणे बघत होतो; पण मन अजूनही शांत नव्हतं, स्थिर नव्हतं. नकरात्मक विचारांचं वादळ आत सुरूच होतं.

संध्याकाळी समोरच्या हॉलमधून आरती सुरू झाल्याचा आवाज येऊ लागला. ‘बम बम भोले..’ या नादाने यात्रीनिवास भाग निनादून गेला. आरतीनंतर पुन्हा रात्रीच्या जेवणाचं प्रेमळ आवाहन सुरू झालं. पाऊस कोसळतच होता. लोकांमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे उठण्याच्या गोष्टी सुरू होत्या; पण आधी त्या भागात येऊन गेलो असल्यानं तिथल्या रस्त्यांच्या परिस्थितीची मला कल्पना होती. पावसाच्या काळात राष्ट्रीय महामार्ग एकची स्थिती नाजूक होते. त्यामुळे उद्या बस निघणं मला अवघड वाटत होतं. इथे कधीही दरडी कोसळू शकतात, हा माझा काश्मीरचा पर्यायाने हिमालयाचा अनुभव होता. याच विचारात असताना झोप लागली. 

पहाटे जाग आली तेव्हा पाऊस थांबलेला होता. अंधारात आकाशाकडे पाहताना काहीच कळत नव्हतं. अंधारात तसंही सत्य कळत नाही, म्हणून प्रकाशाचं महत्त्व अधोरेखित असतं. पहाटे लोक तयार होऊन, आपापलं सामान घेऊन खाली जमू लागले. मी गॅलरीतच बसून निवांतपणे खाली चाललेली लोकांची धावपळ बघत होतो. मला काश्मीरचा अनुभव असल्याचा हा फायदा. थोड्याच वेळात माझ्या अपेक्षेप्रमाणे घोषणा झाली, की काश्मीर खोऱ्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग दरडी कोसळल्यामुळे बंद झाला आहे. त्यामुळे आज बसेस, जथ्था निघणार नाही आणि पुन्हा उत्साहावर पाणी पडणारी गोष्ट घडलीच. पाऊस बंद झालाय ही मनाला दिलासा देणारी एक गोष्ट होती, त्यावरही पाणी फिरलं. पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. सर आली धावून आशा गेली वाहून! अशी काहीशी अवस्था झाली. शक्तिशाली हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशात पुन्हा पावसाच्या जोरदार धारा स्पष्ट दिसू लागल्या.

बस निघण्याचा बेत रद्द झाल्यानं आकाशातील कृष्ण ढग आणि मनावरील निराशेचे काळे ढग आणखी गडद होऊ लागले. मला कदाचित यात्रा रद्द करावं लागणार असं पुन्हा वाटू लागलं. कारण दोन दिवस उशिरा तारीख मिळाल्याने परतीचं आरक्षण अगदी तंतोतंत होणार होतं. शिवाय इथे आदल्या दिवशीचा एक दिवस वाया गेला होता आणि पुन्हा त्या दिवशीही जथ्था निघणार नाही अशी घोषणा झालेली. पाऊस थांबला नाही, तर अजून किती दिवस इथे अडकून राहावं लागेल सांगता येणार नव्हतं. याशिवाय आणखी एक अत्यंत काळजीची गोष्ट होती जी हिमालयात वा कोणत्याही यात्रेत खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे आपली प्रकृती. माझी तब्येत दिल्लीपासूनच अस्वस्थ झाली होती. पोटानं असहकार, अस्वीकार मोहीम चालवली होती. सगळं काही झिडकारून टाकत होतं. अन्नाचा नॉशिया जाणवत होता. अशक्तपणाही जाणवत होता.

फोनमधील ऊर्जेचं चैतन्य संपल्यानं तोही बेशुद्ध झाला होता. लोक फोन चार्ज करायला अगदी संडास-बाथरूममधील सॉकेटसुद्धा तपासून पाहत होते. गर्दी वाढतच होती. या वर्षीही अमरनाथला जाणं इथे येऊन रद्द होतंय असं आता वाटू लागलं होतं, नव्हे खात्री होऊ लागली होती. एकाएकी खूप एकाकी, निराश वाटू लागलं. पाऊस सुरूच होता.

सकाळचे सहा वाजले होते. गडद काळ्या ढगांची चादर अंधुक उजेडात दिसू लागली. निराशेने मी आत डॉर्मिटरीध्ये माझ्या जागी गेलो. माझी मिलिटरी प्रकारातील दहा किलोची अवाढव्य बॅग माझ्या बेडिंगवर पडली होती. रात्रभर झोप झाली नाही आणि मनात कुठेतरी नकळत आपोआप प्रार्थना सुरू होती की पाऊस थांबावा. या सगळ्यात पुन्हा कधी झोप लागली कळलंच नाही. जाग आली तेव्हा मनगटावरील  काटे आठ वाजल्याचे दर्शवत होते. उठून बाहेर आलो, बाल्कनीतून समोर बघितलं आणि आनंदाचा आशेचा किरण दिसला. क्षितिजावरील काळे ढग दूर होऊन निळसर पिवळं आकाश दिसत होतं. त्यातून प्रकाश येत होता. प्रकाशाचं असं असतं, तो कधीच नष्ट होत नाही जिथून जागा मिळेल तिथून बाहेर येतो. चिवट असतो. सकारात्मक असतो.

सकाळी नऊ वाजेपर्यंत छान ऊन पडलं. जम्मूला आल्यापासून सतत पाऊस, दमट वातावरण अनुभवल्यावर चार दिवसानंतर आकाश जरा स्वच्छ होऊन, सूर्यप्रकाश दिसत होता. आल्हाददायक वाटलं, उत्साह दाटला. लोक खाली येऊ लागले. आजचा दिवस रिकामा होता. खाली सभागृहात कीर्तन, प्रवचन सुरू होतं. तेथील भांडारात सकाळचा चहा, दुपार-रात्रीचं जेवण मिळत होतं; पण मी माझ्या पोटाच्या असहकार मोहिमेत भरडला जात होतो. दिवसभर मी काहीच खाल्लं नाही. रात्री संध्याकाळी स्टेजवर काही स्थानिक कलाकारांनी शंकर-पार्वती वेशात सुंदर नृत्य सादर केले. दिवसभर न्यूज चॅनलचे पत्रकार येत होते; पण अजूनही दुसऱ्या दिवशीबद्दल साशंकता होतीच.

दिवस असाच काढला. रात्रीचे साडेआठ झाले. मी गळून गेलो होतो; पण रात्री एक चक्कर मारायला खाली उतरलो. तेव्हाच लाउडस्पीकरवर घोषणा झाली, की सगळ्या यात्रेकरूंनी तयार असावं. आज रात्रीच अडीच वाजता बसेस पहलगामला निघतील. ती घोषणा ऐकली आणि लोकांमध्ये एकच कल्ला झाला. लोक उत्साहात बम बम भोले असा गजर करू लागले. वातावरण उत्साहपूर्ण झालं. मी ताबडतोब जिथे मिळेल तेथे मोबाइल चार्ज करण्यासाठी सॉकेट शोधू लागलो. लोक रात्री अकरा वाजल्यापासूनच आंघोळी करू लागले. बरेच जण जितका आराम करता येईल तितका घेण्यासाठी झोपले. कारण हा जम्मू ते पहलगाम दहा-अकरा तासांचा असणार होता. मी एकटा असल्यानं झोपण्याचा धोका पत्करणार नव्हतो.

रात्री पाऊण वाजताच मी तयार होऊन बाहेर पडलो; पण माझा त्रास काही संपणार नव्हता. शंभू अमरनाथ सतत, प्रत्येक ठिकाणी माझी परीक्षा घेत होता. पुन्हा एका त्रासदायक, काळजीचा अनुभव समोर उभा होता. त्याला मला सामोरं जायचं होतं...
(क्रमशः) 


- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या  https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sharvari Kulkarni About
Awesome...😄😄😄 Tooo goood☺️🙌 Can't wait for next 💐
2
0

Select Language
Share Link