पुणे : पुलोत्सवाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘पुलोत्सव जीवनगौरव सन्मान’ ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना जाहीर झाला असल्याची माहिती पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.
आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पुलोत्सव आयोजित केला आहे. २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे ‘जीवनगौरव पुरस्कारा’चे स्वरूप आहे. जीवनगौरव पुरस्काराबरोबरच अभिनेता अमेय वाघ आणि प्रियंका बर्वे यांना ‘पुल तरूणाई सन्मान’ देण्यात येणार आहे. २१ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या निमित्ताने दिलीप पाडगावकर, गोविंद तळवळकर, अरूण साधू, आणि ह. मो. मराठे या चार संपादकांवर आधारित ‘चार संपादक’ हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात, रविमुकुल, राजीव खांडेकर, आनंद आगाशे, दिनकर गांगल या चार संपादकांचा सहभाग असणार आहे; तसेच ‘शब्दप्रभू पुल’ या परिसंवादामध्ये मुकुंद टाकसाळ, डॉ. मंदार परांजपे, मिलिंद जोशी आणि चंद्रकांत काळे सहभागी होणार आहेत.
‘चार संपादक’ परिसंवादाविषयी :दिवस : ११ नोव्हेंबर २०१७
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, पुणे
‘शब्दप्रभू पुल’ परिसंवादाविषयी :दिवस : १२ नोव्हेंबर २०१७
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभागृह, पुणे
पुरस्कार वितरण कार्यक्रमाविषयी :दिवस : १२ नोव्हेंबर २०१७
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, पुणे