Next
‘समाजासाठीचे काम हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’
प्राची गावस्कर
Monday, October 22, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती, इरावती कर्वे, दिनकर कर्वे यांची नात आणि डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी असा समृद्ध वारसा लाभलेल्या डॉ. प्रियदर्शिनी कर्वे पर्यावरणाशी निगडित सामाजिक प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनातून सोडविण्यासाठी काम करतात. सर्वसामान्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबता येण्यासाठी आवश्यक उत्पादने बनवण्याच्या कामात त्यांनी झोकून दिले असून, स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांसाठी करत असलेले काम हाच त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. ‘बी पॉझिटिव्ह’ सदरात आज डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांची मुलाखत...
............

- तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचा स्रोत काय?
- आपल्याला आजूबाजूचे जग कसे हवे आहे, याची एक स्पष्टता येते तेव्हा त्यात बदल करायचा असेल तर आपणच केले पाहिजेत याचीही जाणीव होते. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न केले जातात. अशा प्रेरणेतूनच माझ्या कामाची सुरुवात झाली. कामाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो. तेच सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असतात. मी जेव्हा धूरमुक्त चुलीवर संशोधन करून तशा चुली तयार केल्या, तेव्हा खेड्यापाड्यातील बायकांनी कौतुक केले. त्यांची मोठ्या त्रासातून सुटका केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. त्यातून पुढील काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यालाही लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि मी नवनवीन संशोधन प्रकल्प राबवत गेले. माझे काम, त्याला मिळणारा प्रतिसाद हाच माझ्या सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे.

- संशोधन क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा काय?
- याला कारणीभूत माझा आळशीपणा आहे. मी फर्ग्युसन महाविद्यालयात पदार्थविज्ञानात पदवीचे शिक्षण घेत होते, तेव्हा एक प्रकल्प करायचा होता. त्या वेळी दुसऱ्या कुठल्या तरी संस्थेत जाऊन काम करायची इच्छा नव्हती. माझे वडील डॉ. आनंद कर्वे ज्या संस्थेत काम करत होते, तिथे धूरविरहित चुलींच्या निर्मितीबाबत संशोधन सुरू होते. हाच एक प्रकल्प पदार्थविज्ञानाशी काही अंशी निगडित होता. त्यामुळे मी धूरविरहित चुलींच्या कामात ओढली गेले. तिथे मी चुलींसाठी धूर न करणारे इंधन विकसित करण्याचा प्रकल्प केला. त्यावर संशोधन करत असताना मला स्वतःला धुराचा इतका त्रास सहन करावा लागला, की ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात, त्यांना धुराचा किती त्रास होत असेल, याची अगदी प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून महिलांची या त्रासातून सुटका होईल, असे काहीतरी केले पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली. एमएस्सी करताना ऊर्जा (एनर्जी स्टडीज) हा विषय होता. पीएचडीसाठी मात्र मला वेगळा विषय निवडावा लागला. ही एक दुर्दैवाची बाब आहे, की ज्या देशात सर्वाधिक लोक जी गोष्ट वापरतात, त्यावर मूलभूत विज्ञान विषयाच्या विभागात कोणतेही संशोधन होत नाही. पीएचडी झाल्यानंतर पुन्हा मी पर्यावरणपूरक, धूरविरहित इंधननिर्मिती आणि चूल या कामाकडे वळले.  

वडील डॉ. आनंद कर्वे यांच्यासमवेत चर्चा करताना.
- निराशेचा प्रसंग आला तर त्यावर कशी मात करता?
- संशोधन करणे खूप सोपे असते. प्रयोगशाळेत काहीतरी विकसित करणे सोपे असते; पण ते उत्पादन व्यावसायिकदृष्ट्या लोकांपर्यंत पोहोचवणे कठीण असते. आपण केलेली वस्तू लोकांनी वापरावी, यासाठी त्यांना ती आवडणे आवश्यक असते. २००५ मध्ये समुचित एन्व्हायरो टेक प्रा. लि. ही पर्यावरणपूरक कमी खर्चातील उत्पादने निर्माण करणारी कंपनी सुरू केली आणि काही निर्धूर चुली बाजारात आणल्या तेंव्हा; त्यांना अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. खूप नुकसान झाले. तो दोन वर्षांचा काळ कठीण होता. त्या वेळी लक्षात आले, की आपली उत्पादने व्यावसायिकदृष्ट्या लोकांपर्यंत पोहोचवायची  असतील, तर त्यात बदल करणे आवश्यक आहे. लोकांना जी साधने सहज उपलब्ध होतात, त्यापासूनच बनणारी उत्पादने दिली, तर त्यांना ती वापरावीशी वाटतील. एकाच उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. अशा अनेक गोष्टी या फसलेल्या उद्योगातून शिकलो आणि मग आवश्यक ते बदल करत गेलो. चुलीचे डिझाइन बदलले. आणखी नवीन उत्पादने विकसित केली. पर्यावरणपूरक जगण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात त्यावर लक्ष दिले. तशा सेवा आणि उत्पादने तयार करण्यावर भर दिला आणि आर्थिकदृष्ट्याही व्यवसाय यशस्वी करण्यात यश मिळाले. निराश होऊन न बसता त्यावर योग्य दिशेने विचार केल्याने बाहेर पडता आले.

- अन्य छंद कोणते आणि त्यांचे कार्यक्षेत्रातील योगदान काय आहे?
- मला वाचनाचा छंद आहे; पण माझ्या कामात त्याचे फार योगदान नाही. ताणतणाव दूर करण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते. यामुळे कथा, कादंबऱ्यांचे वाचन होते; पण कामाचा भाग असलेल्या विषयांबाबत फार पुस्तके नाहीतच. असली तरी ती कालबाह्य होतात. त्यापेक्षा इंटरनेटचा उपयोग अधिक झाला. जगभरात या विषयावर काय संशोधन सुरू आहे, कोणते मतप्रवाह आहेत याची माहिती किंवा या संदर्भात काम करणाऱ्या लोकांशी संपर्क साधणे याकरिता इंटरनेटचा उपयोग अधिक झाला. दुसरे म्हणजे आज पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी आवश्यक गोष्टी तयार करताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे लोक फार कमी आहेत. बहुतांश लोक पर्यावरणाचा व्यावसायिक उपयोग करून घेणारे आहेत. त्यामुळे जे मूठभर लोक विचार मांडतात, ते विचारमंथनातून एकमेकांपर्यंत पोहोचतात. 


(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search