Next
‘अनादि मी, अनंत मी’ ध्वनिनाट्याचे मोफत प्रसारण; ‘ऑडिओ बुकगंगा’वरही उपलब्ध
सावरकर जयंतीच्या औचित्याने २८ मेपासून १२ भागांत प्रसिद्ध होणार
BOI
Tuesday, May 21, 2019 | 03:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होण्याच्या उद्देशाने पुण्यातील ‘रिव्हर्ब प्रॉडक्शन्स’ने ‘अनादि मी अनंत मी’ या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे. हे ध्वनिनाट्य २८ मे म्हणजेच सावरकरांच्या जयंतीपासून १२ भागांत प्रसिद्ध होणार आहे. ते डिजिटल माध्यमांवर मोफत उपलब्ध होणार असून, ‘ऑडिओ बुकगंगा’वरही ऐकता येणार आहे. 

या ध्वनिनाट्याचा ट्रेलर २१ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्या वेळी ध्वनिनाट्याचे निर्माते ओंकार खाडिलकर यांनी ही माहिती दिली. १९८३ साली सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या औचित्याने ज्येष्ठ रंगकर्मी माधव खाडिलकर यांनी ‘अनादि मी, अनंत मी’ या नाटकाचे लेखन केले. दिग्दर्शन आणि रंगमंच निर्मितीची धुराही त्यांनीच सांभाळली होती. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. २६ फेब्रुवारी १९८४ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. 

आता नव्या पिढीला सावरकरांची ओळख व्हावी आणि नव्या पिढीच्या माध्यमांवर सावरकर चरित्र उपलब्ध व्हावे, या हेतूने उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि रिव्हर्ब प्रॉडक्शन्सने या नाटकाचे ध्वनिनाट्य रूपांतरण केले आहे.

ओंकार खाडिलकर म्हणाले, ‘ओघवत्या निवेदनाद्वारे सावरकरांच्या धगधगत्या आयुष्याचे नाट्यपूर्ण कथन करतानाच, आरती, देशभक्तिपर गीते, भाषणे, ओव्या, फटके, पोवाडे, नाट्यप्रवेश, अंदमानातील विविध प्रसंग अशा पैलूंनी सजलेले हे ध्वनिनाट्य तरुणांना, इतिहासतज्ज्ञांना आणि काही सावरकर अभ्यासकांना माहीत नसलेले अनेक पैलू प्रकाशात आणेल. सुप्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ध्वनिसंयोजक मंदार कमलापूरकर या कलाकारांच्या तांत्रिक परीसस्पर्शाने उजळून निघालेले नव्या स्वरूपातील ‘अनादि मी, अनंत मी हे ध्वनिनाट्य सर्व रसिकांना आवडेल याची खात्री आहे.’

‘हे ध्वनिनाट्य उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आणि ‘रिव्हर्ब कट्टा’ या डिजिटल मनोरंजन मीडियाच्या सहकार्याद्वारे संपूर्णत: विनामूल्य स्वरूपात www. revebkatta.in या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. http://audio.bookganga.com/ या वेबसाइटवरही ते मोफत ऐकता येणार आहे. त्याशिवाय ‘अनादि मी अनंत मी’ यू-ट्यूब चॅनेलवर आणि स्नोव्हेलसारख्या ऑडिओ अॅपवरही ते उपलब्ध असेल. मूळ नाटक अडीच तासाचे आहे आणि ते सलग ऐकणे सर्वांना शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन, सुमारे १५ मिनिटांच्या १२ भागांत एखाद्या नाट्यपूर्ण गोष्टीसारखे हे ध्वनिनाट्य रसिकांना त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार घरबसल्या किंवा प्रवास करताना अनुभवता येईल. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन मुलांनी ही नाट्यपूर्ण गाथा आवर्जून ऐकावी आणि आत्मसात करावी यासाठी पार्श्वसंगीताचा प्रभावी वापर यात केला गेला आहे,’ असेही खाडिलकर यांनी सांगितले.  

या ध्वनिनाट्याचा पहिला भाग २८ मे रोजी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी प्रसिद्ध होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी रेडिओवर (१०.७.४ एफएम) २८ मेपासून रोज दुपारी दीड वाजता हे नाटक ऐकता येणार आहे. याबद्दलची अधिक माहिती www.facebook.com/AMAMSavarkarDarshan या फेसबुकवर पेजवर उपलब्ध होईल, असेही सांगण्यात आले आहे. ‘ऑडिओ बुकगंगा’वर याचे भाग २८ मेपासून दर मंगळवारी प्रसिद्ध होणार आहेत.

(या ध्वनिनाट्याचा ट्रेलर सोबत देत आहोत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search