Next
चांद्रयान दोन - विक्रम लँडर सुस्थितीत; संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच
BOI
Monday, September 09, 2019 | 03:20 PM
15 0 0
Share this article:बेंगळुरू :
चंद्रावर उतरण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात असताना संपर्क तुटलेला विक्रम लँडर चंद्रावर पडल्यानंतरही सुस्थितीत असल्याची वार्ता ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. ठरल्याप्रमाणे विक्रम हळुवारपणे चंद्रावर उतरू शकला नसला, तरीही त्याचे तुकडे झालेले नाहीत; मात्र तो कललेल्या स्थितीत आहे, अशी माहिती देण्यात आली. ऑर्बायटरच्या माध्यमातून, तसेच पृथ्वीवरील केंद्रातूनही त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. 

चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बायटरने ‘विक्रम’ची ‘थर्मल इमेज’ रविवारी पाठवली होती. त्यानंतर त्यावरील कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांतून ‘विक्रम’ची नेमकी स्थिती स्पष्ट झाली आहे. ‘विक्रम’ला हळुवारपणे (सॉफ्ट लँडिंग) चांद्रभूमीवर उतरवण्याचे नियोजन होते; मात्र अखेरच्या काही क्षणांत त्याच्याशी संपर्क तुटल्याने त्यावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर काय झाले असावे, याची माहिती टप्प्याटप्प्याने हाती येत आहे. ठरवलेल्या जागेच्या जवळपासच या ‘विक्रम’चे हार्ड लँडिंग झाले आहे; मात्र तरीही त्याची मोडतोड झालेली नाही. तो सुस्थितीत आहे; मात्र कललेल्या स्थितीत उभा आहे, अशी माहिती नऊ सप्टेंबर रोजी ‘इस्रो’तर्फे जाहीर करण्यात आसुली. 

‘विक्रम’शी संपर्क प्रस्थापित करण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न अथकपणे सुरूच आहेत. ‘विक्रम’मध्ये प्रज्ञान नावाचा रोव्हर आहे. तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहिती गोळा करणार असे नियोजन होते; त्याच्याशी संपर्क प्रस्थापित झाल्याशिवाय पुढील गोष्टी करणे शक्य नाही. दरम्यान, विक्रम लँडरच्या मोहिमेचा कालावधी एक चांद्रदिवसाएवढा आहे. एक चांद्रदिवस पृथ्वीवरील १४ दिवसांएवढा असतो. त्यामुळे तोपर्यंत तरी त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे ‘इस्रो’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बायटरचा नियोजित कार्यकाळ एक वर्षाचा होता; मात्र त्यावर इंधन शिल्लक असल्याने तो कार्यकाळ तब्बल सात वर्षांचा होऊ शकतो, असे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी स्पष्ट केले आहे. ऑर्बायटर चंद्राभोवती ९० अंशांच्या कक्षेत अचूकपणे नेण्यात ‘इस्रो’ला यश आले आहे; त्यामुळे चंद्राभोवती फिरता फिरता ऑर्बायटर चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील बर्फाच्या साठ्याचे १० मीटर खोलीपर्यंत अचूकपणे मापन करू शकणार आहे, असे ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी सांगितले. 

सध्या ऑर्बायटर चंद्राभोवती १०० किलोमीटर उंचीवरील कक्षेतून फिरत आहे. त्या कक्षेतील काम झाल्यानंतर त्याचे चंद्रापासूनचे अंतर ५० किलोमीटरने कमी करण्याचेही नियोजन असल्याचे डॉ. के. सिवन यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search