Next
लोकशिक्षक संत तुकाराम
BOI
Saturday, March 03 | 04:45 PM
15 0 0
Share this story

राजा रविवर्मा यांनी काढलेले संत तुकारामांचे चित्र (स्रोत : विकिपीडिया)जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते. या निमित्ताने संत तुकारामांच्या जीवनाचा एका वेगळ्या अंगाने वेध घेणारा हा लेख...
..........
महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. बाराव्या शतकात परकीय आक्रमणांनी मृतप्राय झालेल्या महाराष्ट्राला नवसंजीवनी देऊन पुनरुज्जीवित करण्याचे कार्य या संतमंडळींनी केले. संस्कृतच्या तिजोरीत अडकून पडलेले मौल्यवान धन ज्ञानियांच्या राजाने ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीत आणले आणि महाराष्ट्रात एक प्रकारे वैचारिक क्रांतीला सुरुवात झाली. वारकरी संप्रदायाने भक्तीचळवळीच्या माध्यमातून सारा समाज पुन्हा एकदा एकसंध बनविण्याचे शिवधनुष्य लीलया उचलले आणि अठरापगड जातीजमातींची माणसं त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरीचे वाळवंटही जवळ करू लागली. ज्ञानदेवांनी रचलेल्या पायावर इमारत उभारणीचं काम संत एकनाथ, संत नामदेव, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा प्रभृतींनी केले आणि यावर कळस चढविला तो संत तुकारामांनी! सर्वसामान्य माणसाला त्याच्याच भाषेत, त्याच्याच अनुभवातून शिकवून शहाणे करून सोडणारे तुकाराम हे सार्वकालिक लोकशिक्षक ठरले. 

सर्वसामान्य संसारी व्यक्तीपासून संतपदापर्यंत आणि लोकशिक्षक म्हणून झालेला त्यांचा प्रवास विलक्षण असा आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून चालत आलेल्या संतांच्या मांदियाळीमध्ये प्रत्येकाचे स्वतंत्र, वेगळेपणाने उठून दिसणारे अस्तित्व आहे; पण या मांदियाळीतही संत तुकाराम अधिक चमकदार वाटतात. याचे कारण त्यांच्या जीवनदृष्टीतील वेगळेपणात आहे. संत ज्ञानदेवांचा आणि संत नामदेवांचा वारसा चालविताना तो फक्त शाब्दिक स्वरूपात सांभाळणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच स्वतः प्रत्यंतर घेण्याची त्यांची असोशी, जीवनप्रवाहात कायम राहून त्यांनी घेतलेला परमेश्वरप्राप्तीचा ध्यास आणि यातून घडलेला त्यांचा आध्यात्मिक प्रवास म्हणूनच चकित करणारा आहे. लौकिकाडून अलौकिकाकडे नेणारा प्रेक्षणीय स्वरूपाचा आहे. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. त्यातून लौकिकाचा अनुभव घेताना काय घ्यायचे, काय टाकायचे याकडे त्यांनी डोळसपणाने पाहिले. त्यांचा जीवनप्रवाह म्हटले तर साधासुधा. त्यामध्ये सामान्य माणसांप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षाही काकणभर अधिकच संघर्षाचे प्रसंग आहेत; पण त्यातही तुकोबा पद्मपत्राप्रमाणे अलिप्त राहिलेले दिसतात. या अलिप्ततेतून त्यांनी आत्मविकास साधला आहे. प्रपंचाकडून परमार्थाकडे जाणारा त्यांचा प्रवास म्हणूनच अलौकिक आहे. ‘तुकाराम हे मनाचे राजे होते,’ असा गौरवपूर्ण उल्लेख डॉ. रा. चिं. ढेरे करतात तो याचमुळे! स्वतःच स्वतःचा विकास करून घेणे हा त्यांचा वेगळेपणा आहे. मन माणसाला ओढाळपणे ओढत असते. त्याच्यावर नियंत्रण मिळविणे हे कठीण काम; पण संत तुकारामांनी ही अवस्था स्वतः अनुभवली. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगांमध्ये ठायीठायी दिसते. माणसाच्या मनाचे राजेपण त्याच्या विरक्तीत आहे. भविष्यकालातीत वृत्तींवर तुकोबांनी मिळविलेला विजय हे त्यांच्या मनाचे राजेपण आहे.

परमेश्वर भेटावा असा ध्यास सर्वच संतमंडळींना होता. परंतु त्याच्याशी भांडणे हा स्वभाव तुकारामांमध्येच दिसतो. त्यांचे भांडण विवेकावर आधारलेले आहे. परमेश्वर मानावा की मानू नये? मूर्ती हे त्याचे कोणते रूप, असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. हे विचारण्याचे साहस त्यांच्यात होते. त्यांचा नास्तिकतेपासून आस्तिकतेपर्यंत झालेला हा प्रवास त्यांना बावनकशी सोन्याचे रूप देतो. ‘देव पाहायासी गेलो। देव होवोनिया ठेलो॥’ असे तुकाराम म्हणतात. देव साकार स्वरूपात भेटतो ही सर्वसामान्यांमध्ये रूढ असलेली कल्पना तुकोबांनी बाजूला ठेवली आणि देव ही दर्शन घेण्याची वस्तू नाही तर आपणच प्रयत्नाने देव व्हावे लागते, हे तुकारामांनी ठामपणे सांगितले. चातुर्य आणि स्पष्टवक्तेपणा यांचा सुरेख संगम त्यांच्या या वक्तव्यात आढळतो. तुकोबांनी परमेश्वराला विवेकाच्या, चिकित्सकपणाच्या पाऊलवाटेवर आणून ठेवले.

संत तुकारामांनी आत्मसंघर्षातून आत्मविकास साधला. सुखदुःख, पापपुण्य का निर्माण झाले? परमेश्वर चराचरात भरला आहे, तर असे का, अशा मला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तू स्वतः देणार असशील, तरच ती मला हवी आहेत, असे ते परमेश्वराला खडसावतात. त्यांना एकांत हवा होता तो स्वतःशीच वाद घालण्यासाठी! आपल्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास त्यांनी आपल्याच पावलांनी पूर्ण केला, हे त्यांचे वेगळेपण आहे. त्यांनी विवेकाच्या, सत्यशोधनाच्या पिंजऱ्यात परमेश्वराला उभे केले आणि चिकित्सेच्या प्रश्नांचा भडिमार त्याच्यावर केला. त्यातून परमेश्वराचे रूप, त्याच्या अस्तित्वाचे कारण त्यांनी सर्वसामान्य माणसाला सांगितले. म्हणूनच ‘तुका झालासे कळस’ ही उक्ती त्यांच्यासाठी यथार्थ ठरते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा त्यांच्या जीवनातील उत्तरकाल आहे. लौकिक आशा-आकांक्षांपासून दूर राहून मनाच्या शक्तींचा उपयोग करता येतो, याचा तुकाराम आदर्श वस्तुपाठ आहेत. आपले मन विशुद्ध झाले, निष्कलंक, निर्वैर झाले हा शुद्ध चित्ताचा आनंद ते वर्णन करतात. मनाची ही अत्यंत तेजस्वी अवस्था त्यांनी अनुभवली आणि वर्णिली हे त्यांचे वेगळेपण आणि मोठेपण आहे. 

सामाजिक संघर्षातही त्यांनी आपली चिकित्सक वृत्ती कायम ठेवली. का व कसे हे प्रश्न विचारताना ते विचलित होत नाहीत. लोकांनी पाखंडी ठरवले, तरी ढोंगी साधूसंतांना, समाजाला ते परखडपणे प्रश्न विचारतात आणि लोकांना सत्य आवडत नाही हे माहीत असूनही ते आपल्याला पटलेले सत्य आग्रहाने लोकांपुढे मांडतात. आपण हीन जातीचे आहोत, हा संघर्षही त्यांनी उठावदारपणे मांडला. दुष्काळ, परचक्र, दारिद्र्य, विशिष्ट वर्णवर्चस्वाचा कालखंड यामुळे त्या वेळी सर्वसामान्य माणसे प्रतिकूल परिस्थितीत जगत होती. अशा वेळी तुकोबांच्या अभंगांतून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. ते आपल्याच हितासाठी काही सांगत आहेत, ही जाणीव स्पष्ट होत गेली. प्राप्त परिस्थितीत तग धरून राहणारे तत्त्वज्ञान त्यांच्या अभंगातून सामान्य माणसाला मिळाले. त्यांचे तत्त्वज्ञान सर्व कालात, सर्व परिस्थितीत दिलासा देणारेच आहे. राजकारण, पराभव यांचा स्पर्श त्यांच्या तत्त्वज्ञानात नाही. आध्यात्मिक प्रश्नांत गुंतून ते स्वतःच तो प्रश्न सोडविताना दिसतात, तेच त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. त्यांचे शेकडो अभंग लोकांनी पाठ केलेले होते. म्हणूनच इंद्रायणीच्या डोहात बुडालेले हे वैभव लोकगंगेमध्ये मात्र यशस्वीपणे तरले. चांगल्या विचारांच्या रूपात असलेला परमेश्वर असंख्य लोकांच्या मनातून, वाणीतून स्वतःचा प्रत्यय देत राहिला, हा डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लावलेला अन्वयार्थ म्हणूनच सार्वकालिक आणि सयुक्तिक वाटतो. 

समाजसुधारक म्हणूनही संत तुकारामांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ते सारे गुणविशेष त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकवटलेले होते.

दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दालन कंटकांचे॥

या उक्तीमधून त्यांच्यातील सुधारक व्यक्त होतो. त्यांचे सामाजिक कर्तृत्व हे त्यांचे महान कार्य आहे. कारुण्याने ओथंबलेले शब्द, तडफदारपणा, वीरवृत्ती आणि संघर्षाची तयारी ठेवून ते उभे ठाकलेले आढळतात. 

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन॥

यांसारख्या काव्यपंक्तींमधून मनाच्या संघर्षाबरोबरच जगाच्या संघर्षाची त्यांना असलेली जाणीव व्यक्त झाली आहे. ‘तुकाराम आणि रामदास’ या आपल्या ग्रंथात डॉ. गं. बा. सरदार म्हणतात, ‘तुकाराम हे वैश्य आणि शूद्र वर्णाचे प्रतिनिधी असल्याने त्या वर्णाच्या प्रगतीला अडथळा आणणाऱ्या मूल्यांवर त्यांनी हल्ला चढविला. अशा प्रकारच्या अभंगातून भौतिक उत्कर्षाला आवश्यक असे नैतिक बलसंवर्धन त्यांनी केले आहे.’ तुकारामांनी समाजातील अहंमन्य, अनुभवशून्य आणि वाचाळ अशा पंडितांवर शब्दांचे शस्त्र उचलले. असद्गुरू, असत्कवी, पोटासाठी उभे राहणारे कथेकरी या सर्वांना धारेवर धरले आहे. भक्तीचा बाजार मांडू पाहणाऱ्या पोटभरू संतांचा धिक्कार करताना ‘तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा॥’ असं ते कठोरपणे म्हणतात. त्यांची ही वचने ‘पाखंडखंडन’ करणारी आहेत. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, ‘लोकव्यवहाराचे बारीक निरीक्षण, मनुष्य स्वभावाचे सूक्ष्म ज्ञान, जबरदस्त आत्मविश्वास आणि तडफदार वृत्ती हे निष्ठावंत समाजसुधारकाचे गुणविशेष तुकारामांच्या ठायी होते, याची खात्री त्यांच्या अभंगांवरून पटते.’ 

...मात्र असे असले तरी त्यांची भूमिका अखेरीस तळमळीने उपदेश करणाऱ्या तत्त्ववेत्त्याची आहे. ‘महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती॥’, ‘सुख पाहता जवापाडे। दुःख पर्वताएवढे॥’, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण॥’, ‘शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी॥’, ‘साधूसंत येती घरा। तोचि दिवाळी दसरा॥’, ‘एकमेकां साह्य करू। अवघे धरू सुपंथ॥’ अशा सुभाषितपदांचे श्रेष्ठत्व लाभलेल्या असंख्य ओळी लोकांच्या कानामनात आज स्थिरावलेल्या दिसतात, याचे कारण त्यामागे असलेले अनुभवसमृद्ध, विवेकी आणि तळमळीने उपदेश करणारे तुकारामांचे मन आहे.

तुकाराम प्रत्येक क्षणी कवी म्हणूनही जागे होते. आत्मोपम्य होते. जीवनातील सुखदुःख, चढउताराचा कोणताही क्षण असो, सत्यशोधनाचा प्रवास शब्दांकित करतानाही त्यांच्यातील कवी जागा होतो.

शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोका॥

हे काव्याच्या जगातील त्यांचे सर्वांत मोठे इमान आहे. म्हणूनच त्यांच्या अभंगांना काव्यदृष्ट्या एक स्वतंत्र मोल आहे. त्यांच्या अभंगरचनेमध्ये कवी ही भूमिका सर्व अनुभवांच्या पाठीशी असलेली दिसते. काव्याच्या प्रांतातील त्यांचा हा आत्मविश्वासही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आध्यात्मिक आणि लौकिक प्रवासातील आपले सुखदुःखाचे अनुभव त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने शब्दबद्ध केले आहेत. या आत्मविश्वासामध्ये गर्व नाही; पण आत्मप्रतीती आहे. मीपणा नाही; पण आत्मविकासाचे यथार्थ प्रतिबिंब आहे. आत्माविष्कार ही त्यांच्या अभंगांची प्रेरणा आहे. ते स्वतःचे चित्रण करताना दिसत नाहीत, तर स्वानुभवाचे करतात. एक माणूस म्हणून आणि आत्मसाक्षात्कारी संत म्हणून तुकाराम आपल्या अभंगांमधून प्रतीत होत असले, तरी त्या पाठीमागची कवित्वाची प्रेरणा आपल्याला सातत्याने जाणवते. मुळातील खरा असलेला हा झरा म्हणजे एक काव्यगंगेचा ओघ आहे; मात्र हे सारे कवित्व आपले नसून, त्याचे सारे श्रेय भगवंताचे आहे, अशी जाणीव त्यांच्या अभंगांतून व्यक्त झालेली आहे.

- आपुलिया बळे नाही मी बोलत। सखा भगवंत वाचा त्याची॥
- ‘करितो कवित्व म्हणाल हे कोणी। नव्हे माझी वाणी पदरीची॥   
- माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार। मज विश्वंभर बोलवितो॥

अशा अभंगांमधून सारे श्रेय परमेश्वराला अर्पण करण्याची त्यांची जाणीव ठळकपणे दिसून येते; पण त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अभिजात रसिकता आहे. काव्याची विविध अंगे त्यांच्या अभंगवैभवामध्ये फार उत्तम रीतीने प्रतीत झाली आहेत. रस, अलंकार, तत्त्वप्रतिपादन, आत्मविश्वासपूर्ण प्रासादिक वाणी, नम्रतापूर्वक आवाहन ही सारी काव्यवैशिष्ट्ये त्यांच्या अभंगात दिसून येतात. आपण व्याकरणकार किंवा पंडित, योगी पुरुष असे कोणीही नव्हे, असे म्हणत म्हणत तुकाराम अलौकिक योग्याचे अनुभव प्रगट करतात. शास्त्री-पंडितांना साजेसे युक्तिवाद व बुद्धिसामर्थ्य प्रकट करतात. प्रसंगी परमेश्वरालाही चकित करणारे प्रश्न विचारतात आणि श्रेष्ठ अशा अलंकारांच्या उतरंडी उभ्या करून याही क्षेत्रातील आपले श्रेष्ठत्व सिद्ध करतात. 

काव्याच्या क्षेत्रातील त्यांची ही अलौकिकता काळानेच शिक्कामोर्तब करून सिद्ध केली आहे. महाकवी आणि त्याचे महाकाव्य दीर्घकाळपर्यंत लोकमानसावर अधिराज्य गाजवीत राहते. तुकोबांचे काव्यातून प्रकट झालेले, विविधतेने नटलेले अनुभवसमृद्ध जीवन, स्वतःची स्वतंत्र जीवनदृष्टी, समकालीनच नव्हे, तर भविष्यकालीन समाजजीवनही उजळून टाकणारे तत्त्वज्ञान आणि आपल्या कार्यकर्तृत्वात व साहित्यात अलिप्त राहण्याची त्यांची वृत्ती या निकषांवरून त्यांचे जनमानसावरील अधिराज्य स्पष्ट होत जाते आणि हा ‘झरा मुळाचाचि खरा’ असल्याची झळझळीत जाणीव वाचकाला करून देते.

त्यांची वाणी लवचिक आहे. तिला मेणाहून मऊ आणि वज्राहूनही कठोर होता येते. एकच एक गोडवा त्यांच्या वाणीला आणि वृत्तीला मानवत नाही. समाजातील दुष्टपणा, दौर्बल्य, दांभिकता पाहून त्यांचे मन कठोर होते. त्यांच्या भाषेतील अस्सल मराठीपणही ठायीठायी व्यक्त होताना दिसते. त्यांची भाषा साधी, सुटसटीत, सहजगम्य आहे. संस्कृतच्या आणि फारसीच्या प्रभावापासूनही ती दूर आहे. तिच्यात लालित्य नसले, तरी सफाईदारपणा आहे. कणखरपणा हा तिचा स्वभावधर्मच असला, तरी तिच्यात खडबडीतपणा नाही. तत्त्वज्ञान व काव्य यातील सांकेतिक कल्पनांपेक्षा शेती, व्यापार, युद्ध, कारागिरी अशा व्यावहारिक क्षेत्रातील कल्पना व दृष्टांत यांकडे त्यांची धाव अधिक आहे. कल्पनेच्या बाजूने काव्यमय असण्यापेक्षा विचारांच्या बाजूने ती अधिक उद्बोधक आहे. जिव्हाळा, औचित्य व ओज यामुळे त्यांची वाणी प्रभावी बनली आहे. त्यांच्या सहजोद्गारांच्या पाठीशी स्वानुभवाचे तेज आहे. त्यामुळे त्यांचे शेकडो अभंग लोकांना मुखोद्गत आहेत.

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे। ते येरा गबाळ्याचे काम नोहे॥

असा सार्थ अभिमान म्हणूनच त्यांच्या वाणीमधून व्यक्त होतो.

सर्वसामान्य माणसांना तुकारामांमध्ये आपले प्रतिबिंब दिसते. स्वतःचा विकास आपल्यालाही करून घेता येईल, असा विश्वास त्यांच्या जीवनातून मिळतो. सर्वच प्रसंगांमध्ये तुकाराम माणूस म्हणूनच राहतात; पण त्यात त्यांचा देवपणा दिसतो. जीवनातील सर्व चढउतारांमध्ये त्यांच्यातील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. जीवनातील प्रेय-श्रेय सारे परमेश्वरचरणी अर्पण करण्याची त्यांची वृत्ती सर्वस्व समर्पणाचा, विरक्तीचा एक कालातीत आदर्श समोर उभा करते. आणि म्हणूनच,

हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।
गुण गाईन आवडी। हेचि माझे सर्व जोडी।
न लगे मुक्ती आणि संपदा। संतसंग देई सदा।
तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी॥

हे त्यांनी परमेश्वराजवळ मागितलेले मागणे त्यांचा परमेश्वराप्रति असलेला उदंड विश्वास, त्यासाठीचा अखंड ध्यास, पारलौकिकाची त्यांच्या मनाला लागून राहिलेली आस आणि त्यातून ध्येयाप्रति पोहोचण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेला आत्मविश्वास या साऱ्याचे विलोभनीय दर्शन घडविते आणि संत तुकारामांना अलौकिकतेच्या पातळीवर नेऊन ठेवते!

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link