Next
या हृदयीचे त्या यंत्री - हेच भाषेचे भविष्य!
BOI
Monday, May 20, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) विकासासाठी पुढाकार घेतला असून, ओपनएआय नावाची प्रयोगशाळाही स्थापन केली आहे. याच प्रयोगशाळेच्या वतीने गद्यनिर्मिती करू शकणाऱ्या एआय प्रणालीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ही प्रणाली अगदी तंतोतंत खरे वाटेल अशा पद्धतीने खोटे समीक्षात्मक लेख, खोट्या बातम्या आणि कविताही लिहू शकते. या प्रणालीचा गैरवापर होईल या भीतीने संशोधकांना ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर विचारमंथन करणारा लेख...
.............
ही गोष्ट जानेवारी २०१७ म्हणजे साधारण अडीच वर्षांपूर्वीची. संपूर्ण जगातील माध्यमांमध्ये खळबळ उडविणारी एक बातमी त्या वेळी आली होती आणि विशेष म्हणजे बातमी देणाऱ्यांशीच संबंधित ती बातमी होती. एका रोबोट पत्रकाराने लिहिलेली पहिली बातमी त्या वेळी चीनमध्ये प्रकाशित झाली होती. झियाओ नान नावाच्या पत्रकाराने लिहिलेली बातमी एका चिनी दैनिकात प्रसिद्ध झाली होती; मात्र झियाओ ही कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती – तो होता एक यंत्रमानव, एक रोबोट. 

वसंत ऋतूच्या महोत्सवानिमित्त झालेल्या गर्दीच्या विषयावर झियाओने ३०० अक्षरांची बातमी लिहिली होती. त्यासाठी त्याला केवळ एक सेकंद लागला होता, असे या यंत्रमानवाची निर्मिती करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले होते. आपल्याकडे ४० ते ५० शब्द प्रति मिनिट असा टंकलेखनाचा वेग असलेल्या व्यक्तीलाही सहज नोकरी मिळते, हे लक्षात घेतले तर या यंत्रमानव-पत्रकाराचा वेग किती झपाट्याचा असावा याची कल्पना येते. 

झियाओ नान लघुकथा आणि मोठे वृत्तांतही लिहू शकतो, असे या प्रकारच्या यंत्रमानवाचा विकास करणारे शास्त्रज्ञ वान झियाओजुन यांनी तेव्हा सांगितले होते. वान हे पेकिंग युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. ‘वृत्तपत्राच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत झियाओ नान याच्याकडे माहितीचे विश्लेषण करण्याची अधिक क्षमता आहे आणि बातमी लिहिण्याचा त्याचा वेगही अधिक आहे; मात्र म्हणून बुद्धिमान रोबोट लवकरच पत्रकारांची जागा पूर्णपणे घेतील, असे नाही,’ असे वान म्हणाले होते. 
वान यांनी तयार केलेल्या यंत्रमानवाकडे समोरासमोर मुलाखती घेण्याची क्षमता नव्हती, उत्तरावर स्वयंस्फूर्तपणे प्रतिप्रश्न करण्याची क्षमता नव्हती किंवा संभाषणातून बातमीचा कोन शोधण्याचीही क्षमता नव्हती; मात्र ‘लवकरच वर्तमानपत्रे आणि संबंधित माध्यमांमध्ये पूरक म्हणून रोबोट काम करू लागतील,’ असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. वान यांची ती भविष्यवाणी पूर्ण होण्याचा काळ आता जवळ आला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण बातमीलेखन आणि कथालेखन इतकेच नव्हे, तर कविता लिहिण्याइतपत यंत्रमानवांची प्रगती झाली आहे. 

एलॉन मस्कजगप्रसिद्ध उद्योजक आणि टेस्ला कारचे निर्माते एलॉन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ओपनएआय नावाची कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळाही स्थापन केली आहे. याच प्रयोगशाळेच्या वतीने गद्यनिर्मिती करू शकणाऱ्या एआय प्रणालीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ही प्रणाली अगदी तंतोतंत खरे वाटेल अशा पद्धतीने खोटे समीक्षात्मक लेख, खोट्या बातम्या आणि कविताही लिहू शकते.

विशेष म्हणजे या प्रणालीची चाचणी घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेलाही ती उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र पूर्णपणे नव्हे, तर मर्यादित आवृत्तीच्या स्वरूपात. (पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) सुरुवातीला या प्रणालीची अत्यंत मर्यादित आवृत्ती जाहीर करण्यात आली होती. आता अधिक ताजी आणि कार्यक्षम आवृत्ती सादर करण्यात आली आहे; मात्र या प्रणालीच्या एकूण क्षमतेच्या मानाने ती किरकोळच म्हणायला पाहिजे. कारण या प्रणालीचा गैरवापर होईल या भीतीने संशोधकांना ग्रासले आहे. 

जीपीटी-२ असे या प्रणालीचे नाव आहे आणि तिची कार्यपद्धती आश्चर्य वाटेल एवढी सोपी आहे. यात वापरकर्ता सूचक म्हणून (प्रॉम्प्ट) काही शब्द, मजकुराचा काही भाग, लेखातील उतारा अशी सामग्री पुरवतो. त्यावरून इंटरनेटवरून जमवलेल्या माहितीच्या आधारे पुढील भागाचा अंदाज बांधण्याचे प्रशिक्षण या प्रणालीला दिलेले असते. त्यावरून ही प्रणाली तुम्हाला एखादा वृत्तपत्रीय लेख, लघुकथा किंवा कविता तयार करून देऊ शकते. आपल्याला शालेय परीक्षेत मुद्द्यांवरून गोष्ट लिहा अशा प्रकारचे प्रश्न असत, तसाच काहीसा हा प्रकार!

खरे तर आपल्याला कल्पना नसली, तरी हेच तंत्रज्ञान आपण दररोजच्या व्यवहारात वापरतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये जी प्रेडिक्टिव्ह टेक्स्ट (अंदाजात्मक मजकूर) नावाची सुविधा आहे, ती याच तत्त्वावर तर काम करते. फक्त त्यासाठी या प्रणालीला आधी काही डाटा द्यावा लागतो आणि त्यावरून ती पुढचे कार्य करू लागते; मात्र या नव्या प्रणाली स्वतःचा डाटा स्वतः मिळविण्याइतपत समर्थ आहेत आणि संशोधकांना याचीच चिंता वाटते. 

आतापर्यंत लोक म्हणत असत, की कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशील होऊ शकत नाही. कारण अंतिमतः तिची सूत्रे मानवाच्या हातीच राहणार आहेत; मात्र ‘ओपनएआय’ने सादर केलेल्या या प्रणालीने तो समज खोडून काढला आहे. ‘जीपीटी-२’ची अगदी लहान, कमी सक्षम आवृत्तीही रंजक कविता आणि कल्पनारम्य लिहिण्यासाठी पुरेशी समर्थ आहे. त्यातील अधिक क्षमतेची प्रणाली खोट्या बातम्या किंवा खोटे अहवाल किती शिताफीने निर्माण करू शकेल, हे सहज कल्पना करण्यासारखे आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच ‘बॉट्स आणि रोबोट्स’ यांच्यामुळे आपली उत्पादनक्षमता प्रचंड प्रमाणात वाढेल, यात कोणतीच शंका नाही. मानवी क्षमता आणि माणसांच्या मर्यादा अधिकाधिक वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अतिशय उपयोगी ठरते, हे आता सिद्ध झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता दिवसेंदिवस अधिक सुधारित होत आहे. औषधनिर्मितीपासून स्वच्छ ऊर्जेपर्यंत आपल्या समोरच्या काही मोठ्या समस्या हाताळण्यात यामुळे मदत होईल, अशी अपेक्षा आहे; मात्र याचसोबत संशोधकांना काळजी वाटते ती तिच्या नकोशा परिणामांची. शास्त्रज्ञांना भीती आहे ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी मन आणि यंत्र यांच्यातली स्पर्धा असणार आहे. माणसांच्या मर्यादा ओलांडणारा हा यंत्रमानव अमर्याद होता कामा नये, ही शास्त्रज्ञांच्या पुढील सर्वांत मोठी समस्या आहे. म्हणूनच ‘ओपनएआय’ने ही प्रणाली जनतेसाठी पूर्णपणे खुली न करण्याचा निर्णय घेतला. 

खुद्द मस्कनेच या संदर्भात फेसबुकचा संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला दिलेला इशारा या संदर्भात महत्त्वाचा म्हणावा लागेल. फेसबुकने केलेल्या अशा प्रकारच्या प्रयोगात बॉट्सनी (यंत्रमानवांनी) स्वतःची भाषा विकसित केली, म्हणून फेसबुकला तो प्रयोग आवरता घ्यावा लागला. त्या वेळी झुकेरबर्ग व मस्कमध्ये झालेली ऑनलाइन खडाजंगी गाजली होती. 

ही भीती वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे मनुष्याची भाषेची समज आणि ‘एआय’ची भाषेची समज खूप सारखी आहे. आपण भाषा वापरतो तेव्हा काही संबंधित संकल्पना आणि कल्पनांचे एक जाळे निर्माण करतो. त्यामुळे पुढे काय होईल (कोणता शब्द येईल) याचा आपल्याला अंदाज येतो. उदाहरणार्थ, ‘शुभ्र’ शब्द म्हटला की आपोआप आपण ‘बगळा’ किंवा ‘सदरा’ या शब्दांचा विचार करतो. या कल्पनांची सांगड आपल्या मनात घातलेली असते. ‘पाखरांचा’ असे म्हटले, की ‘थवा’ हा शब्द आपोआप येतो, ‘जमाव’ किंवा ‘गर्दी’ असे शब्द येत नाहीत. जीपीटी-२ किंवा अन्य एआय प्रणालींमध्ये हीच पद्धत वापरली जाते. अर्थात सवयीने आपण निरनिराळ्या शब्दांमध्ये जो फरक करू शकतो, तो ही प्रणाली आज तरी करू शकत नाही. उदाहरणार्थ, शेवटचा हात फिरवणे म्हणजे अंतिम रूप देणे आणि हात फिरवणे म्हणजे संकेत किंवा हालचाल करणे हा फरक आपल्याला समजू शकतो. यंत्र हे आज तरी करू शकत नाही; मात्र येत्या काळात हे होणार नाहीच असे नाही. 

म्हणूनच, ‘फक्त मानवच सर्जनशील असू शकतात’ किंवा ‘फक्त माणसांनाच काही गोष्टी समजू शकतात’ असे बोलणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. आताआतापर्यंत या हृदयीचे त्या हृदयी होणारे गूज आता यंत्रातही होऊ शकेल. त्यामुळे मनुष्यांची स्वतःची भाषा जपणे हे एक आव्हानच असेल.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search