Next
‘लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला घातक नाही’
समुपदेशक माधव दामले यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Wednesday, May 22, 2019 | 11:29 AM
15 0 0
Share this article:

माधव दामले (मधोमध) यांच्याशी संवाद साधताना अ‍ॅड. प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव

पुणे : ‘समाज बांधून ठेवण्यास विवाहसंस्था आवश्यक व सक्षम आहे. विवाहसंस्थेची पाळेमुळे आपल्या संस्कृतीत घट्ट रुजलेली असून, लिव्ह इन रिलेशनशिपसारखे नवीन पर्याय विवाहसंस्था उद्ध्वस्त करू शकणार नाहीत. आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकीपणा असल्यास ‘लिव्ह इन’ची गरज भासणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत व ते सामंजस्याने अशा प्रकारे राहतही आहेत. एकाकी ज्येष्ठांसाठी ‘लिव्ह इन’ काही प्रमाणात फायद्याचे ठरत आहे; मात्र हा पूर्ण विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही,’ असे मत ज्येष्ठ समुपदेशक माधव दामले यांनी व्यक्त केले. 

करम व रंगतसंगत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लिव्ह इन- समस्या की उपाय’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अ‍ॅड. प्रमोद आडकर व सुप्रिया जाधव यांनी त्यांची मुलाखत घेतली. 

दामले म्हणाले, ‘काही एकाकी ज्येष्ठ महिलांना असे वाटते की ‘लिव्ह इन’ हा पर्याय निवडला, तर त्यांचे राहणीमान बरेच सुधारेल व त्यांना संपत्तीही मिळेल; मात्र अशा स्त्रियांचे प्रबोधन होण्याची फार गरज आहे. ज्येष्ठांचे ‘लिव्ह इन’ हे पूर्णपणे सामंजस्यावर व सोबतीच्या गरजेवर आधारीत असायला हवे. वयाच्या पन्नाशीनंतर आधीचा साथीदार सोडून गेला, तर अशा नागरिकांनी शक्य तितक्या लवकर ‘लिव्ह इन’ हा पर्याय योजून सोबत मिळवावी, ज्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य सुखकर होईल.’ 

करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर प्रास्ताविक करताना म्हणाले, ‘परिपक्वपणे ‘लिव्ह इन’ या पर्यायाकडे पाहिल्यास कुटुंबव्यवस्थेत होणारी स्त्रीची घुसमट थांबायला हातभार लागेल. विवाहसंस्थेत स्त्रियांची तीस ते चाळीस वर्षे फरफट होण्याची असंख्य उदाहरणे आजूबाजूला आहेत. एखादी स्त्री ‘लिव्ह इन’मध्ये राहिली, तर तिला बदनाम समजणे चूक आहे. स्त्रीला खरे व्यक्तिस्वातंत्र्य देऊ करायचे असेल, तर विवाहसंस्था आणि ‘लिव्ह इन’ हे दोन्ही पर्याय सजगपणे योजले जायला हवेत. 

अविवाहीत राहून किंवा ‘लिव्ह इन’मध्ये राहून वेगळी वाट जोपासणार्‍या बारा महिलांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. दुसर्‍या सत्रात झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात वर्षा कुलकर्णी, सुप्रिया जाधव, भूषण कटककर, सुनीति लिमये, सुनिता डागा, आश्लेषा महाजन, वर्षा तोडमल, सुरेखा भालेराव, अपर्णा डोळे व वैजयंती आपटे यांनी कविता सादर केल्या. मैथिली आडकर यांनी सूत्रसंचालन केले. मृण्मयी अस्वार यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search