Next
जांभरूणमध्ये ‘जाणीव’च्या स्वयंचलित नळपाणी योजनेचे उद्घाटन
BOI
Tuesday, June 25, 2019 | 11:26 AM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : जाणीव फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या तालुक्यातील जांभरूण गावातील पाथरेवाडी येथे पूर्णपणे स्वयंचलित चालणारी नळपाणी योजना पूर्ण झाली असून, त्याचे उद्घाटन रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे जगदीश पाटील, प्रसिद्ध व्यवसायिक नीलेश मलुष्टे, जांभरूण ग्रामपंचायतीचे उपसरपंच शशांक शिंदे, ‘जाणीव’चे अध्यक्ष महेश गर्दे यांच्या उपस्थितीत झाले.

‘जाणीव’ने दत्तक घेतलेल्या जांभरूण गावामध्ये गेली दीड वर्ष विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. यात पर्यावरण, शैक्षणिक, आरोग्य व पाणी टंचाई यांवर विशेष भर दिला आहे. पाथरेवाडीतील महिलांना नदीतून पिण्याचे पाणी डोंगरात घेऊन जावे लागत असल्याने त्यांचा वेळ घरातील पाणी भरण्यातच जात होता, ही बाब लक्षात घेऊन ‘जाणीव’ने पाथरेवाडी येथे लोकांचे सहकार्य आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून स्वयंचलित नळपाणी योजना साकारण्याचे ठरवले. यात ग्रामस्थांकडून विहिरीचे आणि पंपहाउसचे काम करण्यात आले. ‘जाणीव’च्या माध्यमातून संपूर्ण वीज खांबांचे कनेक्शन व स्वयंचलित चालणारी यंत्रणा बसविण्यात आली.
  

सकाळी सात वाजता पूर्णपणे स्वयंचलित मोटार चालू होते. त्याबरोबरच देशभक्तीपर गीतेही चालू होतात आणि २० मिनिटांनंतर गीतांसह ही यंत्रणा बंद होते. या वीस मिनिटांमध्ये पाथरे वाडीतील १७ घरांमध्ये मुबलक पाणी जाते. वीज नसेल तेव्हा मोटार चालू करावी लागते. वाडीतून दरमहा ठराविक रक्कम दुरुस्तीसाठी व वीज बिल भरण्यासाठी काढण्यात येत आहे. 

या उपक्रमामध्ये वीज मीटरचे काम करणारे श्री. मांडवकर, तसेच प्लबिंगचे काम करणारे शंकर स्वामी आणि श्री. शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांचा, तसेच या योजनेसाठी जमीन देणारे श्री. पाथरे यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, व्यावसायिक मलुष्टे, उपसरपंच शिंदे, ‘जाणीव’चे अध्यक्ष गर्दे यांचा गावातील ग्रामस्थांनी सत्कार केला. 


या प्रसंगी मलुष्टे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. गावातील तरुण मुले सामाजिक उपक्रमात स्वच्छेने पुढाकार घेतात हाच आदर्श इतर गावातील तरुण मुलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी अभियंता पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले करत भविष्यात असे उपक्रम संस्था आणि लोक सहभागातून राबविणे काळाची गरज असल्याचे नमूद केले; तसेच जांभरूणमधील नदीतील गाळ उपसून विविध ठिकाणी लोक सहभागातून आणि संस्थांच्या माध्यमातून चांगले बंधारे बांधून पाण्याचा योग्य वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जाणीव’चे सुशील जाधव यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘जाणीव’चे महेश गर्दे, संजय शिंदे, उमेश महामुनी, प्रशांत गांगण, अमित येद्रे, अवधूत मुळ्ये, श्रीरंग मुळ्ये तसेच जांभरूण पाथरेवाडीतील ग्रामस्थ, शशांक शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search