Next
निखळ विनोदाच्या ‘हसऱ्या बाभळी’
BOI
Tuesday, October 02 | 11:15 AM
15 0 0
Share this story

सामान्य माणसाच्या आयुष्यात असणाऱ्या कैक प्रश्नांना, समस्यांना विसरून त्यानं काही क्षण विसाव्याचे घ्यावेत, स्वतःला हलकं करावं यासाठी विनोदी साहित्य नेहमीच आपली भूमिका बजावत आलं आहे. अशाच काही सामान्य माणसांच्या आयुष्यातील विनोदी घडामोडी हेरून, त्यांना कथास्वरूप देण्याचं काम ‘हसऱ्या बाभळी’या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक अॅड. आर. बी. मातकर यांनी केलं आहे. त्यांच्या या निखळ विनोदी कथासंग्रहाचा हा परिचय...
.............
हास्य हा शब्दच मुळात प्रसन्नता निर्माण करणारा आहे. हसणं माणसाच्या आयुष्यात श्वास भरतं. आयुष्य जिवंत ठेवतं. म्हणूनच समोरच्याला रडवणं एक वेळ सोपं असतं, परंतु त्याला हसवणं हे अवघड काम असतं, असं म्हणतात. हेच मग साहित्य, कला यांच्या बाबतीतही खरं ठरतं. विनोदी लेखण करणं किंवा विनोदी अभिनय करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी वाचकांची, प्रेक्षकांची नाड ओळखावी लागते.  

‘हसऱ्या बाभळी’ या कथासंग्रहात एकूण ३० कथा आहेत. यातील पहिल्या काही विदर्भातील ग्रामीण भागतील लोकांचं जीवन अधोरेखित करणाऱ्या आहेत. साधारणः ४० ते ५० वर्षांपूर्वी इथल्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या प्रथा-परंपरा यांचं सादरीकरण विनोदी पद्धतीनं या कथांमधून लेखकानं केलं आहे. सामान्य माणसाला रुचेल आणि पचेलही अशा प्रकारचा हलका-फुलका विनोद हाताळला गेला आहे. त्यामुळे हे विनोदी सादरीकरण कुठेही खटकत नाही. 

पुस्तकाच्या उत्तरार्धात शहरी आणि निमशहरी भागातील लोकांची जीवनपद्धती दर्शवणारं लेखन करण्यात आलं आहे. शहरी भागातील सामान्य माणूस आणि त्याच्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना यांना विनोदी पद्धतीनं शब्दबद्ध करून त्यांना कथांच्या स्वरूपात मांडण्यात लेखकाला यश आलं आहे, असं म्हणता येईल. विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख अशा मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधील लोक, त्यांचं धावपळीचं आयुष्य, कामाची ठिकाणं, घरातील गोष्टी, चाळींमधील गंमत-जंमत, उंच इमारतींमध्ये राहणारी कुटुंबं, त्यांच्या आजूबाजूला असलेलं वातावरण या सर्व गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करून त्या घटना-घडामोडींमधला विनोद शोधून काढत तो अतिशय खुसखुशीत शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न लेखकानं केला आहे. 

या सगळ्या विविध भागांतील लोकांच्या जीवनावर आधारित लेखण करताना सर्वांत महत्त्वाचा मुद्दा येतो तो भाषेचा. प्रत्येक ठिकाणच्या वर्णनात त्या त्या ठिकाणची भाषा जपण्याचा, त्या त्या ठिकाणच्या बोलीभाषेतील शब्द वापरण्याचा लेखकानं केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. विदर्भातील वऱ्हाडी, ग्रामीण भागातील खेडवळ अथवा ग्रामीण बोली आणि शहरातील लोकांची शुद्ध बोली अशा भाषांचे प्रकार अतिशय सहजतेनं लेखकानं या लेखनात हाताळले आहेत. 

एकंदरीतच दररोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून, ताण कमी करण्यासाठी एक साधन म्हणून आणि निखळ हास्याला वाट मोकळी करून देण्यासाठी म्हणून ‘हसऱ्या बाभळी’ हे पुस्तक जरूर संग्रही असावं असंच आहे. लेखक मातकर यांच्या मार्मिक भाषेतील निखळ विनोदी कथा प्रत्येकाला नक्कीच हसवतील यात शंका नाही. 

पुस्तक : हसऱ्या बाभळी
लेखक : अॅड. आर. बी. मातकर, महात्मा फुले रस्ता, मुलुंड (पूर्व), मुंबई ८१
प्रकाशन : शारदा प्रकाशन
पृष्ठे : २२७ 
मूल्य : २०० रुपये
ई-मेल : rbmatkar@gmail.com

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link