Next
अद्भुत चित्रविश्वाची मनोरम सफर
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, August 01 | 12:45 PM
15 0 0
Share this story

मनोरंजनाच्या इतर कुठल्याही माध्यमापेक्षा सिनेमाचा आपल्यावर होणारा परिणाम विविधांगी असतो. सर्वच्या सर्व म्हणजेच नवरसांची अभिव्यक्ती सिनेमांतून होऊन गेलेली दिसते. त्यातल्या प्रत्येक प्रकारच्या रसानुसार त्याचा प्रकार म्हणजेच ‘जॉनर’ ठरतो. बोलपटांच्या गेल्या सुमारे नव्वदेक वर्षांच्या इतिहासात बहुतेक सर्व जॉनरमध्ये गाजलेले आणि आपली छाप उमटवलेले शेकडो सिनेमे आहेत. त्यातल्या प्रामुख्यानं इंग्लिश, हिंदी आणि इतर भाषांतल्या काही सिनेमांचा थोडक्यात परिचय करून देणारं ‘सिनेसफर’ हे साप्ताहिक सदर आजपासून सुरू करत आहोत. ही ‘सिनेसफर’ काहींना स्मरणरंजनाचा आनंद देईल, तर काहींना ती नव्यानं अनुभवण्याची संधी मिळेल. या सदराची पूर्वपीठिका मांडणारा हा लेख...
........................
तो एक खेळ असतो ना, ज्यात एकानं कोणताही एक शब्द उच्चारला, की समोरच्यानं तो शब्द ऐकताक्षणी मनात येणाऱ्या भावनेनुसार, उठणाऱ्या तरंगानुसार त्याला सुचेल तो शब्द सांगायचा, अजिबात वेळ न घेता. तर मग समजा, आपण हाच खेळ खेळतोय आणि मी शब्द दिलाय ‘सिनेमा’!...बघा मग त्यावर उत्तरादाखल काय काय शब्द ऐकायला मिळतात? जरा वयानं मोठी पिढी असेल तर ‘मज्जा’, ‘प्रेम’, ‘गाणी’, ‘हिरोइन’, ‘हिरो’, ‘मारामारी’, ‘धमाल’, ‘रहस्य’, ‘व्हिलन’, ‘सूड’, ‘पाठलाग’, ‘युद्ध’...वगैरे वगैरे...आणि एकदम तरुण, यंग जनता असेल, तर ‘मल्टिप्लेक्स’, ‘पॉपकॉर्न’, ‘डान्सेस’, ‘शोबिझ’, ‘प्रोमो’ असलं काही तरी कानावर पडेल. थोडक्यात काय, तर सिनेमा म्हटलं की त्याच्याशी निगडित असलेल्या आपल्या अनेक आठवणी चाळवल्या जातात, ज्याचं आपण चटकन कशाशीतरी नातं जोडू पाहतो. हा झाला आपला व्यक्तिगत अनुभव. आपण सिनेमाकडे कसं बघू आणि बघतो त्यानुसार आपली आवड ठरते किंवा ठरत जाते.

मनोरंजनाच्या इतर कुठल्याही माध्यमापेक्षा सिनेमाचा आपल्यावर होणारा परिणाम विविधांगी असतो. पुस्तकातला लेख किंवा लिहिलेलं काव्य वाचताना आपण त्यातलं वर्णन आपल्या कल्पनाशक्तीनं मनःचक्षूंसमोर उभं करून त्यातला आनंद शोधतो. याउलट सिनेमा या माध्यमावर पूर्णतः दिग्दर्शकाची हुकुमत असल्यामुळे तो जे दाखवेल तेच आणि तसंच स्वीकारून त्यातून होणारं मनोरंजन आपल्याला स्वीकारावं लागतं. यात कमी-जास्त दोन्ही शक्यता असतात. उदाहरणार्थ – साहीर, मजरूह, शैलेंद्र, शकील, हसरत यांसारख्या महान शायरांनी त्यांच्या शायरीतून, गाण्यांतून उभी केलेली प्रेम आणि प्रेमाच्या अभिव्यक्तीची आपल्या मनातली प्रतिमा आणि समोर रूपेरी पडद्यावर त्या कुण्या दिग्दर्शकाच्या आणि हिरो-हिरॉइनच्या गाणं सादर करण्याच्या पद्धतीतून साकारत असलेली प्रतिमा यात प्रचंड फारकत असू शकते. आपल्या मनातल्या प्रतिमेसमोर ते फारच क्षुल्लक वाटू शकतं आणि त्याच्या अगदी उलट उदाहरण द्यायचं तर जे. के. रॉलिंगनं लिहिलेली हॅरी पॉटरची पुस्तकं वाचताना त्यातल्या सग्गळ्या गोष्टी ‘मानवी जगापेक्षा वेगळं जादुई जग’, ‘हॉगवर्डस् शाळा’, ‘शाळेतले सरकते, हलते जिने’, ‘तो क्विडिच खेळ’, ‘मरॉडर्स मॅप’ वगैरे वगैरेची काही चित्रं आपण आपापल्या कुवतीनुसार आपल्या नजरेसमोर उभी केलेली असतात आणि तेच सगळं जेव्हा आपण क्रिस कोलंबस, माइक न्युवेल आणि डेव्हिड येट्स या दिग्दर्शकांनी साकारलेल्या सिनेमांतून पडद्यावर प्रत्यक्ष पाहतो, तेव्हा आपली अवस्था ‘स्पेलबाउंड’ झालेली असते. कदाचित आपण आपल्या कुवतीनुसार कल्पना केलेल्या दृश्यांपेक्षा समोर पडद्यावर दिसत असलेली दृश्यं कितीतरी पटींनी जास्त सुंदर, जास्त भव्य, जास्त परिणामकारक, जास्त अद्भुत असू शकतात आणि तिथेच सिनेमा या माध्यमाला आणि ती साकार करणाऱ्या त्या सर्व टीमला साक्षात दंडवत घालावंसं वाटतं!!

म्हणूनच तर सिनेमाला सर्जनशीलतेच्या बाबतीत सर्वांत परिणामकारक, पॉवरफुल माध्यम मानलं जातं. आणि गेल्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून आपल्याला मोहवणारं हे माध्यम आजपावेतो किती विषयांना स्पर्श करून गेलंय ते पाहिलं तर थक्क व्हायला होतं. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत अशा सर्वच्या सर्व म्हणजे नऊही रसांची अभिव्यक्ती सिनेमांतून होऊन गेलेली दिसते. काही काही वेळा तर एकाच सिनेमातसुद्धा हे सर्व रस अनुभवयला मिळतात (ते सिनेमे काय दर्जाचे असतात ते सांगणे न लगे!)

यातल्या प्रत्येक रसाचा आविष्कार ज्या प्रकारच्या सिनेमांतून प्रामुख्याने होतो, त्यानुसार त्या त्या सिनेमांचे जगन्मान्य गट किंवा पद्धती पडतात, ज्याला इंग्लिशमध्ये ‘जॉनर’ म्हटलं जातं. उदाहरणार्थ, शृंगार रस असणाऱ्या फिम्स म्हणजे प्रेमकथा किंवा रोमँटिक, भयानक किंवा बीभत्स रस असणाऱ्या भयानक किंवा हॉरर फिल्म्स, करुण रस असणाऱ्या सीरियस फिल्म्स, हास्यरस असणाऱ्या विनोदी किंवा कॉमेडी, अद्भुत रस असणाऱ्या चमत्कारी किंवा फँटसी फिल्म्स आणि रौद्र किंवा वीररस असणाऱ्या वॉरफिल्म्स, अॅक्शन फिल्म्स असे जॉनरचे ढोबळ प्रकार आहेत.

आपण या लेखमालेतून अशाच काही ठराविक जॉनरमधल्या काही प्रसिद्ध सिनेमांविषयी बोलणार आहोत. पहिला बोलपट येऊन आता जवळपास ९० वर्षं होत आली आहेत आणि बहुतेक सर्व जॉनरमध्ये असे गाजलेले आणि आपली छाप उमटवलेले शेकडो सिनेमे आहेत. आपण त्यातल्या प्रामुख्याने इंग्लिश, हिंदी आणि काही इतर भाषक सिनेमांचा थोडक्यात परिचय या लेखमालेतून करून घेणार आहोत. यात अर्थातच सर्वच प्रसिद्ध सिनेमांचा अंतर्भाव करणं अशक्यच आहे. तरीही गाजलेल्या आणि त्या त्या जॉनरला न्याय देणाऱ्या काही ठराविक सिनेमांविषयी नक्कीच बोलू. पुढच्या मंगळवारी, आठ ऑगस्टपासून सुरू करू या ‘वॉरफिल्म्स’ची सफर...

(‘सिनेसफर’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/YbA9uNया लिंकवर उपलब्ध असतील.)

ई-मेल : Prasanna.Pethe@myvishwa.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दीपा देशमुख About
खूप छान, प्रतीक्षेत👍
2
0
स्वाती About
खूप सुंदर मांडणी. मजा येणार हे सदर नियमितपणे वाचायला. खूप खूप शुभेच्छा तुला व तुझ्या बहारदार लेखणीला
1
1

Select Language
Share Link