Next
गिर्यारोहकांचा महापौरांच्या हस्ते नागरी सत्कार
BOI
Tuesday, May 28, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

कांचनजुंगावर यशस्वी चढाई करणाऱ्या दहा गिर्यारोहकांचा आणि या मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांचा महापूर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

पुणे : जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई करणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेच्या दहा गिर्यारोहकांचा आणि या मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये २६ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते गिर्यारोहकांना सन्मानित करण्यात आले.

१५ मे २०१९ रोजी पहाटे गिरीप्रेमी संस्थेतील दहा गिर्यारोहकांनी मोहीम कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई केली. नागरिकांचा सहभाग असणारी ही सर्वात मोठी व सर्वात पहिली नागरी मोहीम ठरली असून,यामुळे भारताच्याच नव्हे, तर जगातील गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला गेला आहे. 

या वेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘गिरीप्रेमींनी केलेल्या  या अभूतपूर्व कामगिरीचा सर्व पुणेकरांना अत्यंत अभिमान आहे. मी गिरिप्रेमीशी अनेक वर्षांपासून संबंधित आहे, त्यांचा गिर्यारोहण क्षेत्रातील प्रवास हा विलक्षण असून, गिर्यारोहण मोहिमा यशस्वी करून पुण्याची, देशाची मान उंचावत आहेत. त्यांचा हा प्रवास असाच चालू राहू देत, यासाठी हार्दिक शुभेच्छा.’ 

उमेश झिरपे म्हणाले, ‘गिरीप्रेमीची ही मोहीम सर्वार्थाने विशेष आहे. एकाच दिवशी एकाच संस्थेतील दहा गिर्यारोहकांनी कांचनजुंगा शिखर चढणे हे गिर्यारोहण इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. ही मोहीम संपूर्ण शंभर टक्के यशस्वी झाली; तसेच सुरक्षितपणे सर्व गिर्यारोहकांनी शिखर चढाई व उतराई केली, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. सर्वांच्या पाठींब्याने, प्रायोजकांच्या खंबीर पाठबळाने व मोहीम यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचे कष्टामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली आहे.’ 


गिरीप्रेमी संस्थेने २०१२ पासून उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोच्च १४ पैकी सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. यात माउंट एव्हरेस्ट व माउंट कांचनजुंगा या शिखरांचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारे झिरपे हे भारतातील एकमेव गिर्यारोहण नेते ठरले आहेत. त्यांनी या वेळी कांचनजुंगा शिखर चढाईला आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.

या सत्कार समारंभाला पुण्यातील विविध क्षेत्रातील सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शिखर चढाई करणाऱ्या दहाही गिर्यारोहकांनी मोहिमेदरम्यानचे अनुभव कथन केले; तसेच मोहिमेचा थरार दाखविणारा लघुपटदेखील दाखविण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search