Next
बहरली अनोखी कंदीलपुष्पे
भारतात ६०, तर महाराष्ट्रात २७ प्रकार
प्रशांत सिनकर
Wednesday, September 12, 2018 | 12:22 PM
15 0 0
Share this article:

Ceropegia media (मेडी खरचुडी)

ठाणे :
निसर्गाने प्रत्येक फुलाला वेगळेपण दिले आहे, हे आपण अनुभवतोच. त्यापैकीच एक वेगळ्या प्रकारचे फूल म्हणजे कंदीलपुष्प. कंदिलांप्रमाणे दिसणाऱ्या या फुलांच्या भारतात ६०हून अधिक जाती असून, त्यापैकी २७ जाती महाराष्ट्रात आणि चार-पाच जाती ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यात आढळतात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत फुलणारी ही फुले सध्या या भागांतील जंगलांत, कडेकपाऱ्यांत लक्ष वेधून घेत आहेत. अलीकडे विविध कारणांनी या फुलांचा आढळ कमी होऊ लागल्याने त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

Ceropegia oculata (मोर खरचुडी)

अॅपोसायनॅसी कुळातील (Apocynaceae family) ही फुले सेरोपेजिया (Ceropegia) प्रजातीची आहेत. फुलाच्या तळाशी, देठाभोवती फुगीर लंबगोल, त्यातून वर जाणारी अरुंद नळी आणि सर्वांत वर पाकळ्यांच्या पाच खिडक्या आण त्यावरील नक्षीकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे फुलाची भुरळ माणसांनाच नाही, तर कीटकांनादेखील पडते. मधाच्या शोधात आत गेलेल्या कीटकाला पुन्हा बाहेर येण्यासाठी फूल मावळण्याची वाट बघावी लागते. सह्याद्रीच्या जंगलात, दरी-खोऱ्यांत भटकंती करताना हे फूल हमखास दिसते.

Ceropegia attenuata (सडा खरचुडी)परागीकरणासाठी मधमाशा, फुलपाखरे, माशा किंवा यांसारखे अनेक कीटक महत्वासाची भूमिका बजावतात. कीटक फुलांजवळ आकर्षित व्हावेत, यासाठी निसर्गाने काही फुलांना आकर्षक रंग दिला आहे, तर काही फुलांमधील मकरंदाचा स्वाद मोहक असतो. या सर्वांना भुलून कीटक फुलांवर घोंगावत असतात. कंदिलपुष्पांना एक वेगळ्या प्रकारचा दर्प/गंध असतो. त्याला आकर्षित होऊन कीटक फुलांवर येतात. फुलांच्या पाकळ्यावर बाहेरच्या बाजूला नळीवर कीटकाला बसण्यासाठी जागा असते आणि पुढे असणाऱ्या ठिपक्यांच्या आधारे कीटक आत जातात. परंतु आत परागकणांजवळ गेलेल्या कीटकांना पुन्हा बाहेर येण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जेव्हा फूल मलूल होते, त्या वेळीच कीटकांना पुन्हा बाहेर येता येते, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक अविनाश भगत यांनी दिली. 

Ceropegia rollae (रोली खरचुडी)दिवाळीत घरासमोर आकाशकंदील लावला जातो, तशीच काहीशी या फुलांची रचना असते. या फुलांचे रंग फारसा आकर्षक नसतात. या फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असतो आणि त्यावर लाल, जांभळ्या ठिपक्यांसोबतच रेघांची नक्षी असते. ही फुले जंगलांप्रमाणेच डोंगराच्या कडेकपाऱ्यांत आणि काही वेळा वेली अथवा झुडपांमध्ये आढळून येतात. गेल्या काही वर्षांत या फुलांचे प्रकार कमी दिसू लागले आहेत. रासायनिक शेतीमुळे परागीकरण करणाऱ्या कीटकांची संख्या कमी झाली आहे. तसेच, आदिवासी गुराखी या झाडांची मुळे कंदमुळे म्हणून खातात. ही फुले कमी होण्याची कारणे असू शकतात.

Ceropegia vincifolia (कंदील खरचुडी)मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, माथेरान, माळशेज, महाबळेश्वर परिसरात ही फुले असल्याची माहिती अविनाश भगत यांनी दिली.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search