Next
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’मुळे महाराष्ट्रातील आदिवासींच्या विकासाची संधी
राज्याच्या पर्यटन विभागाने घेतला पुढाकार
BOI
Wednesday, November 21, 2018 | 01:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या ऐतिहासिक आणि जगातील सर्वांत उंच ठरलेल्या (१८२ मीटर) पुतळ्यामुळे नर्मदेचा काठ जागतिक पर्यटन नकाशावर आला आहे. केवाडिया गावात उभारलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला अवघ्या दोन आठवड्यांत दोन लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या पर्यटन विकासाचा लाभ या परिसरातील महाराष्ट्राच्या हद्द‍ीतील शेकडो आदिवासी गावे, पर्यटनस्थळांना होणार असल्याची चुणूक दिसू लागली आहे. आदिवासींच्या आर्थिक विकासाची ही संधी साधण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी विधानभवनात या संदर्भात बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे आदी या बैठकीला उपस्थित होते.

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला उद्‌घाटनानंतर दोन आठवड्यांत तब्बल दोन लाख जणांनी भेट दिली आहे. परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. साहजिकच या पर्यटकांमुळे महाराष्ट्र-गुजरात हद्दीवरील स्थानिक हॉटेल्स, लॉज, गाइड, देवस्थाने, प्रवासाशी संबंधित लहान-मोठ्या उद्योजकांची व्यावसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा हा ओढा कायम राहणार असल्याने नंदुरबारसह महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेतील हजारो आदिवासींना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यटन खाते गतिमान झाले आहे. केवाडिया ते नंदुरबार हे अंतर सुमारे १४० किलोमीटर आहे. त्यामुळे योग्य प्रयत्न केल्यास त्या परिघातील सर्व गावांना पर्यटनवाढीचा लाभ होऊ शकतो.

या परिसरातील युवकांना पर्यटनाशी संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, गाइड तयार करणे, लघु उद्योगांना मार्गदर्शन, पायाभूत सुविधांचा आढावा घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

या परिसरात असलेल्या सातपुडा परिसरातील पर्यटनस्थळांचाही प्रचार-प्रसार करण्याची योजना आखली जाणार आहे. त्यामुळे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पाहण्यासाठी आलेला पर्यटक महाराष्ट्राच्या आदिवासी भागातील इतरही लहान-मोठी पर्यटनस्थळे पाहण्यास जाऊ शकेल आणि पर्यायाने स्थानिकांचा विकास अधिक होईल, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केल्याचे ‘महान्यूज’ने म्हटले आहे.

(‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या गीताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search