Next
थरारक विमान अपघातांची उकल
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Thursday, March 29, 2018 | 01:24 PM
15 0 0
Share this story

जगभर विविध वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि होणारे अपघात पाहिले, तर विमान प्रवास हा सर्वांत सुरक्षित असल्याची आकडेवारी आहे आणि तरीही जगभरात झालेले विमान अपघात थरकाप उडवून जातात. आंतरराष्ट्रीय नागरी विमान विशेषज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी वेगवेगळ्या चार भीषण विमान अपघातांचं विश्लेषण करून त्यासंबंधी अत्यंत तपशीलवार माहिती ‘भीषण विमान अपघात’ या पुस्तकातून आपल्यासमोर आणली आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे हे अनुभवी अपघात-अन्वेषक असून आंतरराष्ट्रीय नागरी विमान संस्थांबरोबर अनेक वर्षं कार्यरत आहेत. जगभरच्या अनेक ठिकाणच्या विमान वाहतुकीचं सेफ्टी-ऑडिट ही त्यांची महत्त्वाची जबाबदारी! ती पार पाडत असताना अनेक ठिकाणच्या विमान अपघातांचं अन्वेषण करून, त्यातून निष्पन्न झालेले निष्कर्ष आणि त्यावर आधारित शिफारशी पडताळून, त्यातल्या चुका आणि त्रुटींचं निवारण करून हवाई सुरक्षेसंबंधीच्या विविध सूचना संबंधित विमान संचालक/संस्थांना देण्याचं आणि ते त्या अचूकपणे अंमलात कशा आणतील हे पाहण्याचं काम ते करत असतात. सामान्य माणसाला याबद्दल कुतूहल असतं आणि ते शमवण्यासाठी त्यांनी या पुस्तकातून चार थरारक भीषण विमान अपघातांविषयीची इत्थंभूत आणि सखोल माहिती दिली आहे. 

पूर्वीच्या तुलनेत आता विमानप्रवास सामान्य माणसांच्या आवाक्यात आला आहे. आणि घरोघरी असणाऱ्या टीव्हीवरच्या इंग्लिश फिल्म्स आणि डिस्कव्हरीसारख्या चॅनल्समुळे विमानतळावरची लगबग, तिथला स्टाफ, कंट्रोल टॉवर, विमानांचं तंत्रज्ञान, रचना, कॉकपिट आणि तिथले रंगीबेरंगी दिव्यांचे कंट्रोल-पॅनल्स हे सर्व सामान्य माणसांना थोड्याबहुत परिचयाचं असतं. त्यामुळे या चार अपघातांची माहिती देताना डावरे यांनी फ्लाइट इन्स्ट्रुमेंट्स, नेव्हिगेशन इन्स्ट्रुमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स लँडिंग सिस्टीम, इंजिन इन्स्ट्रुमेंट्स, विमानाचा टेक-ऑफ, कंट्रोल सरफेसेस, फ्लाइट प्रोफाइल, फ्लाइट प्लॅनिंग या सर्वांची सुरुवातीला दिलेली माहिती साधारणपणे ध्यानात येते. पुढे पुस्तकात भीषण अपघातांच्या अन्वेषणासंदर्भात त्यांचा उल्लेख आल्यावर साधारणपणे डोळ्यांसमोर चित्र उभं राहायला मदतही होते. 
 
विमानात दोन पायलट असतात. फ्लाइंग पायलट आणि नॉन-फ्लाइंग पायलट. नॉन-फ्लाइंग पायलटची जबाबदारीसुद्धा किती महत्त्वाची आणि जोखमीची असते हे पुस्तक वाचून झाल्यावर लक्षात येतं आणि त्यासाठी डावरे यांनी इंग्लंडमधल्या एका हॉस्पिटलमधल्या ऑपरेशनदरम्यान नर्सने मुख्य सर्जनला दाखवलेला ठामपणा आणि बाणेदारपणाचं दिलेलं उदाहरण चपखल असंच आहे!

२३ ऑगस्ट २००० रोजी बहारीनमध्ये झालेल्या अपघातात १४३ प्रवाशांना प्राण गमवावे लागले. एक जुलै २००२ रोजी जर्मनीवर आकाशात दोन विमानांची टक्कर होऊन त्यात ७१ प्रवासी मरण पावले होते. डावरे यांनी वर्णन केलेल्या तिसऱ्या भीषण अपघातात २७ मार्च १९७७ रोजी स्पेनच्या कॅनरी बेटावरच्या धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर होऊन एकूण ५८२ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. चौथा अपघात त्यांनी सांगितलाय तो म्हणजे ३१ जानेवारी २००१ रोजी जपानवर आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता टळल्याचा - ज्यामध्ये एकूण ६७७ माणसांचे प्राण वाचले होते.  

या चारही अपघातांनंतर देशोदेशीच्या तंत्रज्ञांनी आणि निष्णात अन्वेषकांनी तत्काळ राबवलेल्या शोधमोहिमेमुळे हाताशी लागलेली त्या त्या अपघातामागची कारणं, विश्लेषण, निष्कर्ष आणि शिफारशी या पुस्तकातून उलगडतात. 

विनायक डावरे यांनी पुस्तकाची भाषा जटिल होऊ न देता आणि आवश्यक तिथे नकाशे, फोटोज, रेखाचित्रं, प्रवाशांचे/पायलट्सच्या माहितीचे तक्ते, तास-मिनिट-सेकंदासह उलगडलेला घटनाक्रम, फ्लाइट रेकॉर्डरचे डीटेल्स आणि परिशिष्टामध्ये विमान तंत्रज्ञान आणि या केसेसमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंग्लिश शब्दांचे मराठीत अर्थ दिल्यामुळे सर्वसामान्य वाचकाला पुस्तक समजायला जड जात नाही. एका वेगळ्या विषयाची माहिती देणारं हे पुस्तक जिज्ञासू वाचकांना नकीच आवडेल यात शंका नाही.  

पुस्तक : भीषण विमान अपघात 
लेखक : विनायक पुरुषोत्तम डावरे  
प्रकाशक : स्वाती जोशी, परम मित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे ४००६०२   
संपर्क : ९९६९४ ९६६३४   
पृष्ठे : २०४  
मूल्य : ३०० ₹ 

(‘भीषण विमान अपघात’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link