Next
किल्ले मॅरेथॉन स्पर्धेत इंग्लंडच्या महिलेची बाजी
पुण्याचा विश्वास गायकवाड आणि इंग्लडंच्या अलेक्झांड्रा मूर यांनी जिंकली सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन
BOI
Thursday, December 13, 2018 | 11:11 AM
15 0 0
Share this article:

सिंहगड –राजगड-तोरणा किल्ल्यांच्या मार्गावरील ५० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमधील पुरुष गटातील विश्वास गायकवाड आणि अलेक्झांड्रा मूर

पुणे : ‘वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन’च्या वतीने आयोजित सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्यांच्या मार्गावरील ५० किलोमीटरच्या ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेत पुरुष गटात पुण्याचा विश्वास गायकवाड, तर महिला गटात इंग्लंडची अलेक्झांड्रा मूर यांनी विजेतेपद पटकावले.

वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये धावताना स्पर्धक.महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारच्या तीन किल्ल्यांवरील मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये तब्बल ५ देश आणि भारतातील १५ राज्यांमधील एकूण ३५ शहरांतील स्पर्धक सहभागी झाले होते. पुण्यात झालेली ही स्पर्धा ‘युटीएमबी’ म्हणजेच ‘अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँक’च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत इंग्लंड, मलेशिया, फिलिपाईन्स, कॅमेरून या देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.

शारीरिक आणि मानसिक कस लागणाऱ्या या ५० किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सर्व स्पर्धकांनी विशेष मेहनत घेतली होती. मूळचा रायगडमधील रोहा गावातील असलेला आणि गेल्या सहा वर्षांपासून पुण्यात सराव करत असलेला २७ वर्षीय विश्वास गायकवाड याने अखेर बाजी मारली. त्याने ही मॅरेथॉन सहा तास २९ मिनिंटे ५४ सेकंदांत पूर्ण करून अव्वल क्रमांक पटकावला. बेंगळुरूच्या संतोष के. आणि कुर्गच्या गौरव देवय्या यांनी दुसरा क्रमांक पटकावला. या दोघांनी सात तास २२ मिनिटे ४० सेकंद अशी समान वेळ नोंदवली. तिसरा क्रमांक शिवाजी माळी याने मिळवला. त्याने ७ तास ३७ मिनिटे १२ सेकंद अशी वेळ नोंदवली. विश्वास हा इंडियन्स स्पोर्ट्स रिव्होल्यूशन येथे आदिनाथ नाईक आणि जय गोविंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यापूर्वी त्याने पुणे आणि कोल्हापूरमधील अल्ट्रा मॅरेथॉन जिंकल्या आहेत.

अलेक्झांड्रा मूरमहिला गटात इंग्लंडच्या अलेक्झांड्रा मूर हिने ८ तास ७ मिनिटे आणि १७ सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर पूजा रानी हिने ८ तास ४७ मिनिट ४६ सेकंद आणि मोनिका मेहता हिने ९ तास ८ मिनिटे अशी वेळ नोंदवत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. या वेळी संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेधे, अनिल पवार, मारुती गोळे, मंदार मते, एव्हरेस्टवीर हर्षद राव, सर्जेराव जेधे, अमित गायकवाड, समीर जाधवराव, निलेश जेधे, जिंदा सांढभोर महेश मालुसरे उपस्थित होते. अमर धुमाळ, श्रीपाल ओस्वाल, शाहरील सुलेमान, कुणाल बेदरकर,आदित्य शिंदे, बाळासाहेब सणस, सुजित ताकवणे, स्वप्निल जाधव, कैलास जेधे, दिगंबर पारगे, संतोष मोरे, सुरेश कोळी, बाळकृष्ण रसाळ, गुलाबराव रसाळ यांनी स्पर्धेचे संयोजन केले होते. 

रविवारी सकाळी सहा वाजता सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. ५० किलोमीटर शर्यत सिंहगड-राजगड-तोरणा अशी होती. ही शर्यत सिंहगड पायथ्यापासून सुरू होऊन ती गडामार्गे विंझर साखरगाव-गुंजवणे, राजगड किल्ला, संजिवनी माची मार्ग डोंगररांगेतून बुधला माची, तोरणा किल्ला करून वेल्हेमार्गे पाबे गावात समाप्त झाली.  

विश्वास गायकवाडया मुख्य मॅरेथॉनसोबत ११ किलोमीटरची शर्यत ही सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि पुन्हा पायथ्यापर्यंत अशी होती, तर २५ किलोमीटर शर्यत सिंहगड ते राजगड अशी झाली. तीन ऐतिहासिक किल्ल्यांच्या जोडलेल्या वाटेत स्पर्धकांना टेकड्या, गावे, जंगल, दऱ्याखोऱ्या अशा अनेक गोष्टींचा रोमांचक अनुभव मिळाला. सिंहगड-राजगड-तोरणा हे तीन किल्ले एकमेकांना पर्वतरांगेतून जोडले गेलेले आहेत. या पर्वतरांगेमधील रस्ते हे शिवकालीन मार्ग आहेत. पूर्वीच्या काळी या भागात शेती, गावे, वस्त्या होत्या, तसेच व्यवसाय व युद्ध देखील येथे झाली आहेत. त्यामुळे या मॅरेथॉनला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. याचबरोबर ‘एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन’ ही ‘इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन’शी संलग्न आहे. तसेच ही मॅरेथॉन युरोपमध्ये होणाऱ्या युटीएमबी म्हणजेच अल्ट्रा-ट्रेल डी-माँट-ब्लाँक २०१९साठी पात्र मॅरेथॉन होती. 

फ्रान्समध्ये होणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोत्तम माउंटन मॅरेथॉन मानली जाते. यात सहभागी होण्यासाठी आवश्यक तीन गुण एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉनमधून मिळणार आहेत. त्यामुळे पुण्यात होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली. पारितोषिक वितरण समारंभ बुद्धिबळपटू मृणाली कुंटे आणि वेल्हे तालुक्याच्या माजी सभापती निर्मलाताई जागडे यांच्या हस्ते झाला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search