Next
‘शब्दांकुरां’ना सुलेखनाचे कोंदण देणारा दिवाळी अंक
रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाने जपली आहे हस्तलिखिताची परंपरा
BOI
Monday, October 29, 2018 | 04:58 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
अलीकडे प्रत्येक जण मोबाइल, टॅब, लॅपटॉप, नाही तर कम्प्युटरवर टाइप करतो. माहिती साठवून ठेवण्यासाठी, तसेच सहज सगळीकडे पाठवणे असे त्याचे अनेक फायदे असले, तरी वळणदार अक्षराची मजा त्यात नाही, हेही खरेच. हाताने सुंदर, रेखीव लिहिण्याची सवय मोडत चालली असल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाचा हस्तलिखित दिवाळी अंकाचा उपक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैविध्यपूर्ण विषय आणि नवोदित लेखकांना संधी देणारा ‘शब्दांकुर’ हा दिवाळी अंक गेली अनेक वर्षे हौशीने हस्तलिखित स्वरूपात काढला जातो. यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन तीन नोव्हेंबर २०१८ रोजी रोजी सायंकाळी साडेचार वाजता ‘आविष्कार’ संस्थेच्या अध्यक्षा नीला पालकर यांच्या हस्ते जनसेवा ग्रंथालयात होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केले आहे. अमोल पालये यंदाच्या अंकाचे संपादक आहेत.

वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी जनसेवा ग्रंथालय नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. नवोदितांनी लिहिते व्हावे आणि त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ग्रंथालयातर्फे ‘शब्दांकुर’ हे हस्तलिखित दर वर्षी दीपोत्सवाच्या पार्श्ववभूमीवर प्रकाशित केले जाते. या अंकात कोकणातील साहित्यिकांच्या कथा, कविता, लेख, ललित, बालसाहित्य असे विविधांगी लेखन समाविष्ट केले जाते. हस्तलिखित असूनही संपूर्ण कोकणातून या अंकासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य येत असते.

हस्तलिखिताचे काम हे दीर्घ काळ चालणारे असते. विविधांगी साहित्य मागविणे, संपादक मंडळाची निवड करून साहित्याचे संपादन करणे, त्यानंतर मांडणी, हस्तलेखन, सजावट अशा टप्प्यांमध्ये अंकाचे काम होते. सुलेखनासाठी ‘जनसेवा’चे कर्मचारी, तसेच वाचक मोठ्या हौशीने योगदान देतात. त्यामुळे विविध अक्षरांचे आकर्षक नमुने या अंकात पाहायला मिळतात. हेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे. कामाची सुरुवात गणेशोत्सवातच करावी लागते. लक्षवेधी मुखपृष्ठही तयार केले जाते. दीपोत्सवाच्या आधी मान्यवरांच्या हस्ते या हस्तलिखिताचे प्रकाशन झाल्यावर हा अंक वाचकांसाठी केवळ ग्रंथालयात उपलब्ध करून दिला जातो. 

नवोदितांच्या साहित्याचा या हस्तलिखितात प्रामुख्याने समावेश केला जात असल्याने त्याला ‘शब्दांकुर’ हे साजेसे नाव देण्यात आले आहे. ‘शब्दांकुर’चे संपादक मंडळ दर वर्षी बदलत असते. संपादक मंडळाने प्रयोगशीलतेला नेहमीच महत्त्व दिले आहे. त्या अनुषंगाने विविध संकल्पना दर वर्षी या हस्तलिखितात साकारल्या जातात.

या वर्षीच्या ‘शब्दांकुर’मध्ये ‘जन्मशताब्दी नामवंतांची..’ हा विशेष विभाग असणार आहे. चालू वर्षभरात पु. ल. देशपांडे, स्नेहल भाटकर, ग. दि. माडगूळकर, शरद तळवलकर, योगाचार्य बीकेएस अय्यंगार यांसारख्या अनेकांची जन्मशताब्दी आहे. त्यांना ‘शब्दांकुर’च्या लेखकांनी शब्दांजली वाहिली आहे. ज्येष्ठ कथाकार अरविंद गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ग्रंथालयाने कोकण विभागीय कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती, यातील प्रथम चार कथा या अंकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

बोलीभाषेतील साहित्य हेही या हस्तलिखिताचे वैशिष्ट्य आहे. दुर्मीळ होत चाललेल्या बोलीभाषांचे संवर्धन व्हावे, या हेतूने ‘शब्दांकुर’ने बोलीभाषेतील साहित्याला प्राधान्याने स्थान दिले आहे. कोकणातील मालवणी, संगमेश्ववरी, आगरी अशा बोलीतील साहित्याचा यात समावेश असतो. याशिवाय बालसाहित्यालाही अंकात स्थान देण्यात येते. अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला ‘शब्दांकुर’ याही वर्षी वाचकांच्या भेटीला येत आहे. अनेक चित्रकार आणि वळणदार अक्षरांच्या लेखनिकांनी सर्वांगसुंदर अशी मांडणी केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link