Next
तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचे आहे?
BOI
Friday, May 26, 2017 | 01:00 AM
15 1 0
Share this article:

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) ही संस्था देशात शास्त्रज्ञ घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तेथे प्रवेश घेण्यासाठी ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ (केव्हीपीवाय) राबवली जाते. त्या संदर्भात हे मार्गदर्शन...
.................

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपला देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे, असे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे त्यांनी तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. ते तरुणांना भावले एक थोर शास्त्रज्ञ म्हणून! प्रत्येक भारतीय त्यांना ‘मिसाइल मॅन’ म्हणूनच ओळखतो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तरुण संशोधन क्षेत्राकडे वळत आहेत.

डॉ. कलाम यांच्याच विचाराने व प्रेरणेने देशात शास्त्रज्ञ घडवण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’ (आयसर) या संस्थेची स्थापना झाली. मोहाली, भोपाळ, पुणे, कोलकाता, तिरुअनंतपुरम आणि तिरुपती येथे या संस्था आहेत. प्रत्येक ठिकाणी दोनशे विद्यार्थ्यांना बारावीनंतर प्रवेश दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेचे नाव आहे ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ (केव्हीपीवाय).

‘आयसर’मध्ये निवडक प्रज्ञावंतांची निवड होते. हे विद्यार्थी म्हणजे राष्ट्रीय संपत्तीच मानली जाते. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास आणि संवर्धन यावर संस्था लक्ष केंद्रित करते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला विविध वैज्ञानिक प्रकल्प व संशोधन, प्रयोगशाळेतील संशोधन व स्वयंअध्ययन, मनन-चिंतनातून बौद्धिक विकास, निरीक्षण व निष्कर्ष यांची जोड द्यावी, यासाठी ही संस्था प्रयत्न करते. येथे पारंपरिक अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया नसते, तर सगळे प्रगत, अद्ययावत पद्धतीने चालते. 

प्रातिनिधिक फोटो‘आयसर’मधील पाच वर्षांचे शिक्षण संपूर्णतः निवासी आहे. संशोधक संस्था म्हणून संस्थेला विद्यापीठाच्या वरचा दर्जा आहे. येथून विद्यार्थी बीएस, एमएस या पदव्या मिळवून बाहेर पडतो. येथून उच्च पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी (म्हणजेच एमएस झालेला विद्यार्थी) पीएचडीच्या समकक्ष मानला जातो. संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हणून तो देशात किंवा परदेशातही आपल्या करिअरची सुरुवात करू शकतो. 

‘आयसर’मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला पाच वर्षांसाठी पाठ्यवेतन दिले जाते. पहिल्या तीन वर्षांसाठी दरमहा पाच हजार रुपये आणि शेवटच्या दोन वर्षांसाठी दरमहा सहा हजार रुपये पाठ्यवेतन मिळते. शिवाय अभ्यासपूरक प्रकल्पाचा पन्नास ते ऐंशी हजार रुपयांपर्यंतचा खर्च संस्था करते किंवा पाठ्यवेतनात रक्कम वाढवून दिली जाते. ‘आयसर’मध्ये प्रत्येक वर्षाची शैक्षणिक फी पस्तीस हजार रुपये असून, ती विद्यार्थ्याला भरावी लागते. पाठ्यवेतानातून मिळणाऱ्या रकमेतून विद्यार्थी सरकारी फी सहज भरू शकतो. 

‘आयसर’मधील इतर सुविधा आंरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. पुण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेलगतच्या लगतच्या सव्वाशे एकर जागेतील विस्तीर्ण परिसर, वसतिगृह, ग्रंथालय, प्रयोगशाळा, अध्यापन वर्गखोल्या, अभ्यासिका, प्राध्यापक-सेवकांची निवासव्यवस्था भव्य आहे. रेखीव बगीचे, अंतर्गत रस्ते, खेळासाठी प्रशस्त मैदान, स्वच्छता, सुरक्षितता हे सारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे.

‘केव्हीपीवाय’च्या तयारीमुळे विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी आपोआप होऊन जाते. ‘सीबीएसई’च्या अभ्यासामुळे नोव्हेंबरमध्येच बारावीनंतरच्या सर्व प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा पूर्णपणे क्षमता विकास झालेला असतो. त्यातून आत्मविश्वास निर्माण होतो आणि विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोचू शकतो. यशापयशाचा विचार न करता, दहावीनंतर विज्ञान शाखेकडे जाणाऱ्या प्रत्येकाने ‘केव्हीपीवाय’चा अभ्यास करावा, म्हणजे त्यांच्या पुढील करिअरची वाटचाल अधिक सोपी होईल. 

प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा :


- श्रीकांत सुतार
(लेखक ‘आयसर’मध्ये कार्यरत आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search