Next
संस्कृतमधील येशू ख्रिस्त!
BOI
Monday, December 24, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘क्रिस्तुभागवतम्’ हे येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील महाकाव्य आहे. केरळमधील संस्कृत विद्वान आणि कवी पी. सी. देवास्सिया यांनी ते रचलेले आहे. या ग्रंथासाठी देवास्सिया यांना पाच वर्षे लागली; मात्र त्यासाठी त्यांना १९८० सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हे महाकाव्य ३३ अध्यायांमध्ये आहे आणि त्यांची संख्या येशू ख्रिस्ताच्या आयुष्याशी जुळणारी आहे, असे मानले जाते. उद्याच्या नाताळच्या निमित्ताने विशेष लेख...
..........
जन्मजात प्राचीनत्व मिरविणाऱ्या संस्कृत भाषेत जशी असंख्य पुराणे आणि पोथ्या आहेत, तसेच या भांडारात आजच्या काळातही भर पडत असते. आता हेच पाहा ना, ४०-४२ वर्षांपूर्वी या भाषेत एका नवीन ‘भागवता’ची भर पडली, तीही कोणा हिंदूच्या देवावर नव्हे तर चक्क येशू ख्रिस्ताच्या जीवनावर! होय, ‘क्रिस्तुभागवतम्’ हे येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील महाकाव्य आहे. केरळमधील संस्कृत विद्वान आणि कवी पी. सी. देवास्सिया यांनी ते रचलेले आहे. या ग्रंथासाठी देवास्सिया यांना पाच वर्षे लागली; मात्र त्यासाठी त्यांना १९८० सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हे महाकाव्य ३३ अध्यायांमध्ये आहे आणि त्यांची संख्या येशू ख्रिस्ताच्या आयुष्याशी जुळणारी आहे, असे मानले जाते. हे महाकाव्य पहिल्यांदा प्रकाशित झाले ते १९७७मध्ये.

‘एका बाजूला ख्रिस्त ही एक ऐतिहासिक व्यक्ती आहे आणि त्याचे जीवन मी प्रामाणिकपणे वर्णन केले पाहिजे; मात्र दुसरीकडे संस्कृत महाकाव्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. या नियमांनुसार कल्पनाशक्तीचा स्वैर संचार झाला पाहिजे. मला संस्कृतमध्ये बायबलचे भाषांतर करायचे नव्हते. माझी कृती खरोखरीच महाकाव्य असावे, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे फुल्टन ऑर्सलर (‘दी ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड’चे लेखक) यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी या ग्रंथाची रचना केली,’ असे त्यांनी या महाकाव्याच्या मनोगतात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘मी संस्कृत साहित्याच्या वातावरणात मोठा झालो आणि गेली साठ वर्षे संस्कृतचा विद्यार्थी किंवा शिक्षक म्हणून घालविली आहेत. संस्कृतचा संपूर्ण सांस्कृतिक वारसा अर्थातच ख्रिस्ताच्या जीवनावरील काव्यात आणता येणार नाही; मात्र सध्या आपल्या कार्यांमध्ये मतभेदांवर जोर देण्याऐवजी भिन्न संस्कृती आणि धर्मांमधील समानतेवर जोर द्यायला हवा, असे मला वाटते.’ 

या महाकाव्याच्या प्रस्तावनेत के. आर. श्रीनिवास अय्यंगार या विद्वानाने म्हटले आहे, ‘संस्कृत ही ‘मृत भाषा’ नसून जिवंत आणि अतिशय गतिशील आहे, हे या ग्रंथातून दिसून येते’; मात्र संस्कृत आणि येशू ख्रिस्ताचा संबंध अलीकडचा नाही. या दोघांच्या संबंधाचा इतिहास आपल्याला खूप मागे घेऊन जातो. निकोलस नोतोविच नावाच्या रशियन संशोधकानेही भारतात काही वर्षे अभ्यास करून ‘दी अननोन लाइफ ऑफ जीझस क्राइस्ट’ नावाचे पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक १८८७ साली प्रकाशित झाले होते. येशू ख्रिस्त ‘रेशीम मार्गा’ने भारतात आले होते आणि लडाखमधील हेमिस बौद्ध आश्रमात राहून बौद्ध धर्माचे शिक्षण घेतले, असा दावा त्यांनी केला होता. तिबेटमधील मठांमध्ये ठेवलेल्या दुर्मीळ हस्तलिखितांचा अनुवाद करून त्यांनी येशूच्या जीवनावर प्रकाश टाकला होता. लातोविचच्या नंतर राकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी अभेदानंद यांनीही १९२२मध्ये होमिज मिनिस्ट्री या भागात प्रवास केला होता. ‘तिब्बत ओ काश्मीर भ्रमण’ नावाच्या त्यांच्या बंगाली पुस्तकात त्यांनी हाच धागा पकडला आहे.

ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या चिकाटीमुळे आज जगातील जवळजवळ सर्व भाषांमध्ये बायबल उपलब्ध आहे; मात्र संस्कृतमधील बायबल हे तसे दुर्मीळ आहे. ब्रिटिश (किंवा युरोपीय) साम्राज्य विस्ताराच्या प्रारंभीच्या काळात बायबल हे संस्कृतमध्येही आले होते, हे बहुतेकांना माहीत नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी १९व्या शतकाच्या शेवटीच बायबलचे संस्कृत भाषांतर केले होते. विद्वानांमध्ये बायबल आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी असावे कदाचित. परंतु हा धर्मग्रंथ या प्राचीन भाषेत आला होता. यातील जुना करार (ओल्ड टेस्टामेंट) १८४८ साली, तर नवा करार (न्यू टेस्टामेंट) १८८६ साली तत्कालीन कलकत्त्यात प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे यातील कोणत्याही भाषांतराला इंग्रजीची जोड देण्यात आलेली नव्हती.

http://www.harekrsna.de

लुई जेकोलियत (Louis Jacolliot) या फ्रेंच संशोधक-विद्वानाने १८६९ साली एक पुस्तक लिहिले होते - ‘ला व्या दे लेझ्यूस ख्रिस्त्ना (La Bible dans l’Inde, Vie de Iezeus Christna). जेकोलियत याच्या मते, जीझस ख्रिस्त आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघे एकच होते. त्याने कृष्ण आणि ख्रिस्ताच्या जीवनातील साम्येही दाखवली आहेत. ख्रिस्ताला जीझस हे नाव त्याच्या अनुयायांनीच दिले होते आणि याचा अर्थ ‘मूलतत्त्व’ होतो, असे त्याचे म्हणणे होते. किंबहुना, ख्रिस्त हा शब्द कृष्णाचेच रूपांतर आहे, असेही त्याचे म्हणणे होते. कृष्ण-क्रिसना- ख्रिस्त अशी त्याची उपपत्ती त्याने दिली आहे.

अन् सर्वांत गंमत म्हणजे हिंदूंच्या एका धर्मग्रंथात आलेले येशू ख्रिस्ताचे वर्णन. भविष्य पुराण हा तो ग्रंथ! ‘भविष्य पुराणा’ची रचना केव्हा झाली आणि तो प्रक्षिप्त (मागाहून भर टाकलेला) ग्रंथ आहे का, यावर विद्वानांमध्ये मतभेद आहेत. परंतु बायबल वगळता येशू ख्रिस्ताचे एवढे स्पष्ट वर्णन अन्य कुठल्या ग्रंथात क्वचितच आले असेल. उज्जैनचा राजा विक्रमादित्य याच्या नातवाशी येशूची भेट झाल्याचे यात स्पष्ट म्हटले आहे. प्रतिसर्गपर्वातील चतुर्युग खंडामध्ये दुसऱ्या अध्यायात १९ ते ३४ श्लोकापर्यंत आपल्याला हे वर्णन आढळते.

विक्रमादित्यपौत्रश्च पितृराज्यं गृहीतवान् ।।
जित्वा शकान्दुराधर्षांश्चीनतैत्तिरिदेशजान्।।१८।।
बाह्लीकान्कामरूपांश्च रोमजान्खुरजाच्छठान्।।
तेषां कोशान्गृहीत्वा च दंडयोग्यानकारयत्।।१९।।
स्थापिता तेन मर्यादा म्लेञ्च्छार्याणां पृथक्पृथक्।।
सिंधुस्थानमिति ज्ञेयं राष्ट्रमार्यस्य चोत्तमम्।।३.३.२.२०।।
म्लेञ्च्छस्थानं परं सिन्धोः कृतं तेन महात्मना।।
एकदा तु शकाधीशो हिमतुंगं समाययौ।।२१।।
हूणदेशस्य मध्ये वै गिरिस्थं पुरुषं शुभम्।।
ददर्श बलवान्राजा गौरांगं श्वेतवस्त्रकम्।।२२।।
को भवानिति तं प्राह स होवाच मुदान्वितः।।
ईशपुत्रं च मां विद्धि कुमारीगर्भसंभवम्।।२३।।
म्लेंच्छधर्मस्य वक्तारं सत्यव्रतपरायणम्।।
इति श्रुत्वा नृपः प्राह धर्मः को भवतो मतः ।।२४।।
ईशमूर्तिर्हृदि प्राप्ता नित्यशुद्धा शिवंकरी।।
ईशामसीह इति च मम नाम प्रतिष्ठितम्।।३१।।
इति श्रुत्वा स भूपालो नत्वा तं म्लेंच्छपूजकम्।।
स्थापयामास त तत्र म्लेच्छस्थाने हि दारुणे।।३२।।

‘विक्रमादित्याचा नातू शालिवाहन राजा वडिलांच्या सिंहासनावर आरूढ झाला. त्याने शकांना पराजित करून चीन, तैत्तिरी लोकांना जिंकले. त्याने रोम आणि खुरुच्या वंशजांनाही पराभूत केले. होते. त्याने त्यांना कठोर शिक्षा दिली. अशा प्रकारे शालिवाहनाने म्लेंच्छ आणि आर्यांच्या देशांना विभाजित करणारी सीमा स्थापित केली. अशा प्रकारे सिंधुस्तानला महान देश म्हणून ओळखले गेले. (१८-२०)

एकदा हा राजा हिमतुंगाकडे व हूण देशाच्या मध्यभागी (हूण देश - मानसरोवराजवळ किंवा पश्चिम तिबेटच्या कैलास पर्वताजवळील क्षेत्र) गेला होता. तेथे राजाने डोंगरावर राहणाऱ्या एका साधूला पाहिले. त्याचा वर्ण सुवर्णाचा होता आणि त्याचे कपडे पांढरे होते. (२२)

‘राजा म्हणाला, ‘तू कोण आहेस?’ ‘तुम्हाला माहीत असले पाहिजे, की मी ईश्वराचा पुत्र ईशपुत्र आहे’. त्याने आनंदाने उत्तर दिले, आणि ‘कुमारी मातेचा पुत्र आहे.’ (२३)

‘मी म्लेंच्छांना धर्म समजावून सांगणारा आहे आणि मी सत्याचे पालन करतो.’ हे ऐकून राजा म्हणाला, ‘तुमच्या मतानुसार धार्मिक तत्त्वे काय आहेत?’ असा हा संवाद सुरू होऊन (२४) अखेर हा साधू सांगतो, ‘सर्वोच्च प्रभूचे सार्वकालिक शुद्ध व शुभ स्वरूप माझ्या अंतःकरणात ठेवून मी या तत्त्वांचा प्रसार म्लेंच्छांच्या प्रदेशात केला आणि अशा प्रकारे माझे नाव ‘ईशा-मसीह’ (येशू मसिह) पडले,’ असे येशू सांगतो. (३१)

अशा अनेक गमतीजमती आपल्या चहूबाजूला पसरलेल्या आहेत. या मंगळवारी, २५ डिसेंबर रोजी नाताळ साजरा करताना हे बंधही आपल्याला लक्षात ठेवायला हवेत. संकष्ट चतुर्थी आणि ख्रिस्तजन्माचा नाताळ एकत्र येत असताना हा सु‘संस्कृत’ संबंध आपण लक्षात घेऊ या! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prajakta About 209 Days ago
तुमचा प्रत्येक ग्रंथ नाविन्यपूर्ण माहितीचा खजिनाच असतो.best article.
0
0

Select Language
Share Link
 
Search