Next
क्रीडा क्षेत्रातील एक चमत्कार : शिरीन लिमये
BOI
Friday, March 30, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

शिरीन लिमये

ती नेटबॉल खेळते, स्नूकर-बिलियर्डसच्या स्पर्धेतही सहभागी होते, स्केटिंगमध्येही ती तरबेज आहे आणि बास्केटबॉलमध्ये तर तिने राष्ट्रीय स्तरापर्यंत आपला दबदबा निर्माण केला आहे. पुण्यातील अशा या चमत्कृतीपूर्ण खेळ करणाऱ्या खेळाडूचं नाव शिरीन लिमये. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख बास्केटबॉलपटू शिरीन लिमयेबद्दल...
......................
पुण्यातील एक चमत्कृतीपूर्ण खेळणारी क्रीडापटू अशीच खरे तर तिची ओळख करून द्यायला हवी. याला कारणही तसेच आहे. ती नेटबॉल खेळते, स्नूकर-बिलियर्डसच्या स्पर्धेतही सहभागी होते, स्केटिंगमध्येही ती तरबेज आहे आणि बास्केटबॉलमध्ये तर तिने राष्ट्रीय स्तरापर्यंत आपला दबदबा निर्माण केला आहे.  शिरीन लिमये हे या क्रीडापटूचे नाव.

शिरीन लिमयेया सगळ्या खेळांमध्ये ती उत्तम कामगिरी करत असली, तरी तिचा मुख्य खेळ ‘बास्केटबॉल’च आहे आणि त्यातील दैदिप्यमान कामगिरीच्याच जोरावर यंदा तिला शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. तिच्या कारकिर्दीत अशा काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडल्या आहेत, की त्या वाचून सर्वांनाच थक्क व्हायला होईल. शिरीन काही महिन्यांची असल्यापासून तिची आई सुवर्णा, या तिला तिच्या भावाबरोबर बास्केटबॉल कोर्टवर घेऊन जात असत. पुढे थोडी मोठी झाल्यावर ती स्केटिंगही शिकू लागली. त्याच्या जोडीला नेटबॉलचाही सराव करायची. सहाव्या वर्षापासून तिने खऱ्या अर्थाने बास्केटबॉल खेळायला प्रारंभ केला; पण त्याच वेळी त्याचा सराव संपला, की ती स्नूकर-बिलियर्डस्  खेळायला जायची.

शिरीन लिमये तिच्या कुटुंबासोबतघरातच क्रीडासंस्कृती नांदत असल्याने तिला वेळोवेळी प्रोत्साहनच मिळत गेले. तिची आई सुवर्णा या स्वतः राष्ट्रीय स्तरावरच्या बास्केटबॉलर आहेत. त्यामुळे त्याच तिच्या प्रशिक्षक आहेत. वडील विजय हेदेखील माजी राष्ट्रीय जलतरणपटू होते. तेही तिला स्पर्धेतील सहभागासाठी सातत्याने पाठींबा देत असतात. एका जिल्हास्तरीय खुल्या बास्केटबॉल स्पर्धेत या माय-लेकी एकत्र खेळल्या आहेत. शिरीनला बास्केटबॉलमध्ये अनेकदा देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले आहे आणि असेच यापुढेही मिळत राहावे, अशी तिची इच्छाही आहे, जिद्दही आहे.  खरे तर भक्कम बचाव करणे हे ध्येय प्रत्येक सामन्यात असते, असे सांगणाऱ्या शिरीनला पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातच ‘सर्वोत्तम रिबाउंडर’चा पुरस्कार मिळाला होता हे एक आश्चर्यच आहे. 

पुण्यात पीवायसी क्लबला सराव करणारी शिरीन आजवर अनेक स्पर्धा खेळली आहे, मात्र त्याव्यतिरिक्तही तिच्या वैयक्तिक आवडी-निवडीला ती महत्त्व देत असते. शिरीनने आत्तापर्यंत २६ राष्ट्रीय अखिल भारतीय स्पर्धांमधून भाग घेतला असून, त्यात दोन सुवर्ण, सात रौप्य आणि दोन कांस्य अशा पदकांची कमाई तिने केली आहे. तिने जवळपास तेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 

पुण्यात झालेल्या सोळा वर्षांखालील आशियाई स्पर्धेत तिला रिबाउंड ट्रॉफी मिळाली होती. ही तिच्या कारकिर्दीतील सर्वात आश्चर्यकारक घटना असल्याचे शिरीन मानते, कारण या स्पर्धेत अनेक प्रतिभावान खेळाडू असूनही तिच्या खेळाला सर्वाधिक पसंती मिळाली होती. स्नूकरची एकवीस वर्षांखालील खेळाडूंची एक स्पर्धा झाली होती. त्यात तिने रौप्यपदक पटकावले होते. हे पदक तिला देशाचे अव्वल खेळाडू गीत सेठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. हा क्षण कारकिर्दीतील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, असे शिरीन सांगते.

शिरीनला गाणी ऐकण्याचाही छंद आहे, शिवाय ती कथक नृत्यही शिकली आहे. जेव्हा ती नृत्याची परीक्षा पास झाली, तेव्हा तिच्या गुरूंनी तिला कथक किंवा बास्केटबॉल यापैकी एकाची निवड कर असे सांगितले आणि शिरीनने नृत्याला बाय बाय करत बास्केटबॉल हीच आपली पसंती असल्याचे सांगितले होते. आज ती भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलपटू म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तिचा निर्णय किती योग्य होता याची प्रचिती येते. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल’मधून शिक्षण घेतलेल्या शिरीनने भविष्यात क्रीडा मानसशास्त्र शाखेत प्रवेश घेत, त्यात पदवी घेण्याचे ठरवले आहे. माझ्या रक्तातच बास्केटबॉल आहे असे सांगणारी शिरीन कारकिर्दीला कलाटणी देणारा व अनुभवसंपन्न करणारा क्षण म्हणजे २०१०मध्ये झालेल्या ‘राष्ट्रकुल स्पर्धे’तील सहभाग मानते. ‘या स्पर्धेने जो अनुभव दिला, तो अन्य कोणत्याही स्पर्धेने दिला नाही’, असे ती म्हणते. 

तिची उंची पाच फूट अकरा इंच आहे, त्यामुळे खेळात जाणवणारी ही उंचीची कमतरता ती संपूर्ण कोर्ट कव्हर करण्यावर भर देत, भरून काढते. तिचा डिफेन्स तर मजबूत आहेच; पण पासिंगमध्येही ती मास्टर आहे. कोणा खेळाडूला कसे चकवायचे व चेंडू पास करत बास्केटपर्यंत कसा न्यायचा हा चमत्कार ती लिलया करते. नेटबॉलसाठी किंवा स्नूकरसाठी जेव्हा भारतीय संघात तिची निवड झाली, त्या वेळी त्यादरम्यान जर बास्केटबॉलच्या स्पर्धा नसतील, तरच ती या खेळांमध्ये सहभागी होत आली आहे. तिचे पहिले प्राधान्य नेहमीच बास्केटबॉल खेळाला राहिले आहे.

आशिया स्पर्धेत जेव्हा ती खेळत होती, तेव्हा सामना पाहणारे प्रेक्षक तिला प्रोत्साहन देत होते. सामना संपल्यावर काही प्रेक्षकांनी तिला सांगितले, की तुझ्या डोक्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. हा कारकिर्दीतला सर्वांत भावनिक क्षण होता, असे शिरीन सांगते. तिच्या या सगळ्या कारकीर्दीवर नजर टाकली, तर एक लक्षात येते की शिरीनसारख्या अशा एकाच खेळाडूमध्ये किती प्रकारचे गुण भरलेले असतात आणि हेच खेळाडू देशाचे नाव जगात उंचावून महान बनतात. शिरीनची वाटचाल त्याच दिशेने होत आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search