Next
पाऊले (उलट) चालती पंढरीची वाट!
फुरसुंगीचे बापूराव गुंड करतात उलट वारी!
BOI
Friday, July 05, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर : दर वर्षीप्रमाणेच पंढरपूरच्या आषाढी वारीला येण्यासाठी लाखो वारकऱ्यांची पावले पंढरपूरच्या दिशेने पडू लागली आहेत. बापूराव गुंड या वारकऱ्याची गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. ते उलट चालून, म्हणजे ज्या दिशेला जायचे तिकडे पाठ करून ही वारी करतात. त्यांच्या या अनोख्या वारीचे यंदा बाविसावे वर्ष असून, आळंदी ते पंढरपूर हे २५० किलोमीटरचे अंतर त्यांनी केवळ सहाच दिवसांत पार केले आहे.  

देशात मुबलक पाऊस पडावा आणि सर्व शेतकरी बांधवांना सुख मिळावे अशी इच्छा ठेवून ही वारी करत असल्याचे ते सांगतात. बापूराव हे फुरसुंगी (जि. पुणे) येथील आहेत. त्या गावात त्यांचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. अंगात भगवा शर्ट, काळी पँट, बूट असा पेहराव असलेल्या आणि करारी नजरेच्या बापूरावांच्या मिश्याही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाला साजेशा आहेत. गळ्यात कवडीमाळ घातली असून, पाठीमागचे सहज काही दिसू नये म्हणून त्यांनी गळ्यात पत्र्याचे गोल कडे करून घातले आहे. डोक्यावर विठ्ठलाचा फोटो, तर हातात वारकऱ्यांची पताका फडकावत बापूराव झपाझप उलटी पावले टाकत रस्ता पार करतात. वाटेत कोणी आडवे येऊ म्हणून त्यांना सावध करण्यासाठी ते शिट्टीचा वापर करतात. दिवसाला ते साधारण ४०-५० किलोमीटरचा प्रवास करतात. सकाळी नऊ वाजता वेळापुरात असलेल्या बापूरावांनी केवळ नऊ तासांत पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला उलटी प्रदक्षिणा घालून आपली यंदाची वारी पूर्ण केली. त्यांना पाहायला मोठी गर्दी झाली होती.

(बापूराव गुंड यांच्या उलट वारीची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search