Next
अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण
BOI
Wednesday, March 27, 2019 | 11:23 AM
15 0 0
Share this article:

सत्कारमूर्तींसह मागे उभे डॉ. विनय नातू, विश्वादस बापट, स्मिता परांजपे, राधिका वैद्य, श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन व अन्य पदाधिकारी

रत्नागिरी :
 ‘विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ १९३३पासून काम करत आहे. त्याचबरोबर समाजातील गुणवंतांचा सन्मान संस्था करते. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा व त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचावे हा त्यामागचा उद्देश आहे,’ असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केले.

मंडळाच्या ८६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. २७ मार्च रोजी हा कार्यक्रम झाला. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, उपाध्यक्ष विश्वास बापट, उपाध्यक्ष स्मिता परांजपे, कोषाध्यक्षा राधिका वैद्य, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे, कार्यकारिणी सदस्य केतकी जोगळेकर, अविनाश काळे, उदय गोडबोले, डॉ. संतोष बेडेकर, प्रसाददत्त गाडगीळ, अनिरुद्ध लिमये, शरद लेले, संदीप रानडे, माधव भागवत, श्रीरंग पाटणकर, प्रकाश दामले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कै. सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार निवृत्त मुख्याध्यापिका सौ. शुभांगी भावे, निवृत्त शिक्षिका प्रेमा पटवर्धन, आबलोली येथील शिक्षिका सौ. नमिता वैद्य यांना देण्यात आला. संस्कृतप्रेमी पुरस्कार डॉ. मेधा लिमये यांना, तर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार पोलिस हवालदार राजेंद्र भाटकर व संजीव बर्वे यांना प्रदान करण्यात आला. भाटकर यांचे मार्गदर्शक व निवृत्त पोलिस उपअधीक्षक भोसले यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. समशेरबहाद्दर पुरस्कार तासगाव येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेचा विद्यार्थी सौरभ जाधव याला देण्यात आला. त्याच्या वतीने नातेवाईकांनी पुरस्कार स्वीकारला.(कै.) ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहातील अक्षय कोकणे याला आदर्श विद्यार्थी म्हणून, तर (कै.) सौ. आनंदीबाई त्रिविक्रम केळकर विद्यार्थिनी वसतिगृहातील ऋचा बापट हिला आदर्श विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले. (कै.) उदय ओक यांच्या स्मरणार्थ सुशांत केतकरला हुशार विद्यार्थी पारितोषिक देण्यात आले.

संस्कृत, गणित विषयातील गुणवंतांना लोकमान्य टिळक पारितोषिक, तर (कै.) केशव जोशी व (कै.) सुलोचना जोशी यांच्या स्मरणार्थ बीए परीक्षेत समाजशास्त्र, मराठीतील गुणवंत विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले. (कै.) सत्यभामाबाई फडके निधीतून अनघा आठवले यांना अर्थसाह्य देण्यात आले. 

जीवनगौरव पुरस्कार करसल्लागार दिनकर माळी यांना प्रदान करण्यात आला. ह. भ. प. भगवानबुवा कोकरे यांचा गोपालनासाठी विशेष गौरव करण्यात आला. ५८व्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत मंडळाच्या ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकातील कलाकारांना पुरस्कार मिळाले होते. त्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. दिग्दर्शक वामन जोग, रौप्यपदकप्राप्त चंद्रशेखर जोशी, सौ. पौर्णिमा साठे यांना गौरवण्यात आले. 

महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च श्री शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मैत्रेयी गोगटे, ‘सीए’च्या परीक्षेत उत्तम यश मिळविलेला वरद पटवर्धन, पोमेंडी येथील कृषी केंद्राचे अधिकारी राजेंद्र कुंभार यांनाही मंडळाने सन्मानित केले. वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कारही या वेळी करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कार्य :

शुभांगी भावे या बियाणी बालकमंदिरच्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. प्रेमा पटवर्धन यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. नमिता वैद्य या पाटपन्हाळे हायस्कूल येथे शिक्षिका आहेत. हवालदार राजेंद्र भाटकर यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीसपदकप्राप्त झाले आहे. संजीव बर्वे हे शाळा, कॉलेजमध्ये सैनिकी जीवन, युद्ध, परमवीरचक्र पुरस्कारांची माहिती देऊन देशप्रेम जागृत करतात. 

जीवनगौरव पुरस्कारप्राप्त दिनकर माळी हे १९८४मध्ये नागपूर विद्यापीठातून बीकॉम झाले. शिक्षकी नोकरीनंतर सी. यू. हळबे यांच्याकडे त्यांनी सहायक म्हणून नोकरी केली. नंतर टप्प्याटप्प्याने एमकॉम, जीडीसीए, डिप्लोमा टॅक्सेशन लॉ व २०१०मध्ये एलएलबी केले. ह. भ. प. भगवानबुवा कोकरे हे लोटे येथील माळरानावर गोशाळेत जखमी गायींचा सांभाळ करतात. डॉ. मेधा लिमये यांनी गणितातून पदवी शिक्षण घेतले व संस्कृतमधून पीएचडी केली. सध्या त्या संस्कृत विषयात अभ्यास करत आहेत.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search