Next
‘‘देवबाभळी’मध्ये जुन्या-नव्या काळाची सांगड’
BOI
Saturday, July 14, 2018 | 04:09 PM
15 0 0
Share this article:

संगीत देवबाभळी हे नाटक सध्या गाजत असून, त्याचे ११७ प्रयोग झाले आहेत. या नाटकात संत तुकारामांची आवली आणि विठूरायाची रखुमाई ऊर्फ लखूबाय एवढी दोनच पात्रे आहेत. प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित या नाटकात आवलीची भूमिका साकारली आहे शुभांगी सदावर्तेनं, तर रखुमाईच्या भूमिकेत आहे मानसी जोशी. पुण्यात नुकत्याच झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाला तर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात ‘स्टँडिंग ओवेशन’ही दिले. मनाचा ठाव घेणारा विषय संगीत नाटकाच्या माध्यमातून साकारणाऱ्या दोन कलावंतांशी प्राची गावस्कर यांनी साधलेला हा संवाद...
............ 
प्रश्न : संगीत देवबाभळी नाटकातील तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल?
शुभांगी सदावर्ते : ‘देवबाभळी’ नाटकामुळे माझा व्यावसायिक रंगभूमीवर, त्याहीपेक्षा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला आहे. खरे तर मी गायिका असल्याने मी या नाटकात येऊ शकले. संगीत नाटक असल्याने गाणारी आणि अभिनय येणारी मुलगी त्यांना हवी होती. मी या आधी कधी व्यावसायिक नाटकात अभिनय केलेला नाही; पण लेखक प्राजक्त देशमुख आणि निर्माते प्रसाद कांबळी यांनी मला खूप आग्रह केला, प्रोत्साहन दिले. मी गाण्याचे शिक्षण घेतले असल्याने माझ्यासाठी यातील गाणी म्हणणे अवघड नव्हते; पण अभिनयाची बाराखडी मात्र मी यानिमित्ताने गिरवली. या नाटकामुळे मी खूप गोष्टी शिकले. मानसी रंगभूमीवर अनेक वर्षे काम करत आहे. तिनेही मला खूप मदत केली. छोट्या, छोट्या गोष्टी सांगितल्या, शिकवल्या. त्यामुळे आज खूप आत्मविश्वासाने मी ही भूमिका साकार करू शकत आहे. 

मानसी जोशी : ‘देवबाभळी’तील लखुबाय ऊर्फ रखुमाईची भूमिका म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. मी आतापर्यंत मराठी, गुजराती नाटकात कामे केली आहेत. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ या मालिकेतही मी काम केले होते. ‘डबिंग आर्टिस्ट’ म्हणूनही मी अनेक वर्षे काम करत आहे; पण मी गाते हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे प्रसाद कांबळी यांनी मला ‘एका संगीत नाटकाचे काम आहे, गाण्याची क्लिप पाठव’ असे सांगितल्यावर मी माझे एक गाणे रेकॉर्ड करून पाठवले. ते त्यांना आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना खूप आवडले आणि माझी या भूमिकेसाठी निवड झाली. मलाही वेगळे काहीतरी करायचे होते. त्यामुळे मी आनंदाने या भूमिकेसाठी होकार दिला. या नाटकातील भाषा खूप वेगळी आहे. नऊवारी साडीत वावरायचे आहे. तसेच अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या त्या काळातील स्त्रियांची जीवनशैली, वागणे, बोलणे दर्शवतात. त्यावर खूप मेहनत घ्यावी लागली. 

प्रश्न : स्त्री म्हणून तुम्ही दोघी या भूमिकांकडे कसे बघता? 
शुभांगी : या भूमिका आवली आणि रखुमाई या दोघींचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणाऱ्या आहेत. संसार नेटका करण्यासाठी धडपडणारी आवली फटकळ असली, सारखी त्रागा करत असली तरी नवऱ्यावर तिचे जिवापाड प्रेम आहे. स्वतःला विसरून ती तुकारामांसाठी, त्यांच्या संसारासाठी जगते आहे. तिची ही समर्पण वृत्ती मला झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देते. मी तिच्याशी छान ‘रिलेट’ करू शकते. 

मानसी : रखुमाईची भूमिका आजच्या काळातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते, असे मला वाटते. कारण ती प्रश्न विचारते. जे तिला पटत नाही ते मुकाटपणे करण्याऐवजी ती प्रश्न विचारते. नवऱ्याचा राग आला तर ती रुसून घर सोडून वनात जाते. आवलीला स्वतःसाठी जगण्याकरिता ती प्रोत्साहन देते. जुन्या आणि नव्या काळाची सांगड यात घातलेली आहे. त्यामुळे रखुमाई साकारताना मला ती जवळची वाटते. 

प्रश्न : नाटकाला तरुणाईचा प्रतिसाद कसा आहे?
संगीत नाटक असूनही या नाटकाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे. या नाटकाचा प्रेक्षकवर्ग केवळ मध्यमवयीन नाही, तर तरुणाईलाही हे नाटक ‘अपील’ होतेय. तरुण मुले-मुलीही येऊन नाटक आवडल्याचे सांगतात, तेव्हा खूप आनंद होतो. महिलांचा प्रतिसादही खूप चांगला आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा त्यांना आपल्याशा वाटतात. त्यांची तळमळ, विश्वास, समर्पण स्त्रीवर्गाला भावते. यातील गाणी, भाषा, नेपथ्य आवडल्याचे अनेक महिला आवर्जून येऊन सांगतात. नाना पाटेकर, श्रीराम लागू अशा अनेक दिग्गजांनी आमचे कौतुक केले. हे खूप आनंददायी आहे. त्यामुळे आम्हाला आणखी उत्तम प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. 

(‘संगीत देवबाभळी’तील कलाकार शुभांगी सदावर्ते व मानसी जोशी यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search